ग्रीष्माने तापलेल्या जमिनीला चिंब करुन नव्याने हिरवाईचं लेणं देण्याचं सृजन करणारा हा वर्षाऋतूचा काळ याचा आनंद जरुर घ्यावा...मनसोक्त हिंडा, पावसाळी पर्यटन करा...चिंब व्हा, आनंद घ्या पण सोबत निसर्गाची संपन्नता जोपासणे हे तितकेच महत्वाचे आसते हे मात्र विसरु नका. सृजन आणि संक्रमणाच्या या पावसाळ्यात ढगातून पडणाऱ्या पावसाइतकाच कवितांचाही पाऊस पडताना दिसेल... काहीच हरकत नाही कारण पावसाळा आणि कविता ह्यांचा एकमेकांशी खूप दृढ नातं आहे.
आला पाऊस मातीच्या वासात ग,पाऊस पहिला बरसून गेला, येरे येरे पावसा,पाऊस दाटलेला अशी एक ना अनेक बालगीत,भावगीत,प्रेमगीत,चित्रपट गीत ह्या पावसात लिहिली गेली आहेत असा निसर्गाला सर्वार्थाने समृध्द करणारा हा ऋतू कधी कधी रौद्र रूप देखील धारण करतो आणि ह्या निसर्गाची आणि पर्यायाने मानवाची हानी सुद्धा करतो.पावसाळ्यात वादळ,जोरदार वारे ,अतिवृष्टी आणि पूर ही संकट देखील येतात त्यामुळे मानवी जीवन विस्कळीत होऊन जातो. पूर गा देखील पावसाळ्यात हमखास पाहायला मिळणारा नैसर्गिक संकट आहे.
पूर येणे म्हणजे नेमके काय होते तर नदीचे,समुद्राचे पाणी अतिवृष्टीच्या वेळी,भरतीच्या वेळी, लाटांच्या वेळी मानवी वस्ती आणि आसपासच्या जमिनीपर्यंत पोहोचते, पाण्याची पात्रे तोडतात आणि पूर परिस्थिती निर्माण करतात. इतर नैसर्गिक आपत्तींच्या तुलनेत पुराची कारणे सुप्रसिद्ध आहेत. पूर सहसा अचानक येत नाही, तसेच काही भागात आणि पावसाळ्यात. जेव्हा नदीच्या वाहिन्या त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाहून नेतात तेव्हा पूर येतो आणि पाणी मैदानाच्या खालच्या भागात पुराच्या स्वरूपात भरते.कधीकधी तलाव आणि अंतर्गत पाण्याचे क्षेत्र क्षमतेपेक्षा जास्त पाण्याने भरलेले असतात. पूर येण्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात, जसे कि किनारपट्टी भागात वादळे, दीर्घ मुसळधार पाऊस, बर्फ वितळणे, जमिनीची पाणी शोषण क्षमता कमी होणे आणि जास्त मातीची धूप झाल्यामुळे नदीच्या पाण्यात जलोदर प्रमाणात वाढ होणे तसेच मानवाने किनारपट्टी भागात बांधकाम करणे इत्यादी कारणे आहेत.
मात्र हा पूर संपूर्ण जनजीवन विस्कळित करतो असेल नसेल त्या सर्व वस्तूंची नासधूस होते,वीज खंडित होते, अन्न धान्य खराब होतो,कपडे,अंथरूण पांघरूण भिजून जातात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते.दुर्गंधी पसरते रोगांना आमंत्रण मिळतो अशी भयावह परिस्थिती निर्माण होते.बाहेरून मदत पोहचवणे देखील अशक्य होते.पाळीव प्राणी तसेच गुरे ह्यांना देखील जीव गमवावे लागते.मात्र ह्याच काळात दिसून येते ती माणुसकी सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन मदत कार्य करतात अन्न धान्य पुरविणे औषधे पुरविणे साफसफाई करून देणे इत्यादी सेवाभावी कामे मनापासून केली जातात अशावेळी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडते.देशात अनेक भागात पावसात दरवर्षी पूर येतो.म्हणूनच कौसी नदीला बिहारचा शोक म्हणतात.ह्या नदीला नेहमी पूर येतोच आणि बिहार राज्य संकटात सापडला जातो.तसेच आसाम राज्यात देखील ब्रह्मपुत्रा नदीला दरवर्षी पूर येतो आणि तो राज्य दुःखात बुडतो म्हणून ब्रम्हपुत्रा नदीला आसामचे अश्रू म्हणतात.मात्र अशा परिस्थितीत देखील शांत आणि संयमी वागून संकटाला धीराने सामोरे जावे.त्यातून देखील मार्ग निघतो.तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात उपदेश करताना म्हणतात की,
नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही हेवा॥ १ ॥
महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ॥ २ ॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥ ३ ॥
तुका ह्मणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥ ४ ॥
महापुरात मोठं मोठे वृक्ष उलमळून पडतात पाण्यात वाहतात मात्र त्यावेळेस लव्हाळे म्हणजे गवताचे पाते वाकल्यामुळे टिकून राहतात.तद्वतच आपण प्रत्यक्ष पुरात काय किंवा जीवनात काय शांत संयमी आणि नम्रपणे राहून जीवनात यश प्राप्ती करावी.
✍️ नितीन गजानन सुर्वे (श्रीवर्धन)