Bluepad | Bluepad
Bluepad
पेरावे तैसे उगवते!!
विभावरी चिटणीस
23rd Jun, 2022

Share

जगात सध्या प्रत्येक जण ओरडत आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय यावर काहीतरी उपाय केलेला केला गेला पाहिजे . संशोधनही यावर चालू आहे .
अनेक ठिकाणी भूकंप घडत आहेत. कुठे दरडी कोसळत आहेत .कुठे पावसाने ओला दुष्काळ निर्माण होतोय , तर कुठे कोरडा दुष्काळ पडतोय . का घडतंय हे सगळं ? याला कारणीभूत कोण आहे ? याचे उत्तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही कधी थांबणार हे सगळं आणि कोण थांबवणार हा प्रश्न सगळ्यांच्याच डोळ्यापुढे आहे...
तुम्ही काहीही म्हणा आम्ही झाड तोडणार म्हणजे तोडणार . काय आहे जोपर्यंत आमच्या दारातले झाड कोणी तोडून नेत नाही ना तोपर्यंत आम्ही कशाला विचार करू या गोष्टीचा ...अशीच आता मनाची विचारसरणी झालेली आहे . जंगलं नष्ट होत आहेत . प्राणी , पक्षी बेघर होतायत . कितीतरी प्राण्यांच्या जाती , जमाती नष्ट होत चालल्या आहेत. बुद्धिवादी म्हणवला जाणारा मनुष्य प्राणी स्वतःच्या स्वार्थासाठी या मुक्या जीवांचे बळी घेत चाललाय . आज हे वृक्ष मूकं पणे रडतायत , त्यांचं मूकआक्रंदन कळूनही न कळल्या सारखा वागतोय हा मनुष्य प्राणी , आणि वृक्षतोड करून फक्त पर्यावरणाचा नाहीतर संस्कृतीचाच नाश करू पाहतोय... किंबहुना करतोय म्हणलं पाहिजे .
संस्कृती काय सांगते आपल्याला ...सुसंगत धरा , सत्कर्म करा . पेरावे तसे उगवते , जशास तसे या म्हणी तर काय फक्त मुलांना गोष्टी सांगण्याकरता आहेत का हो ? की आचरणातही आणायच्या आहेत? पेरावे तसे उगवते.... चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते , तुम्ही दुसऱ्याशी जसे वागाल तसाच दुसरा ही तुमच्याशी वागतो .
खारुताईने जमिनीत लपवलेल्या एका बी पासून असंख्य वृक्ष निर्माण होतात. ज्यांच्यापासून आपलं जीवन सुखकर होतं. म्हणजे एका चांगल्या कर्माची अनेक चांगली फळ मिळतात.तर आपण एक वृक्ष लावून एक सत्कर्म करायला काय हरकत आहे ...आहो हे वृक्ष किती परोपकार करतात आपल्यावर ...सावली देतात , फळ देतात , वारा देतात , निवारा देतात तेही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आणि आपण आपण मात्र घाव घालत सुटलोय त्यांच्या मुळावरच . मग अशी त्यांची मुळं उपटल्यावर आपली मुळे जिवंत राहतील असं वाटतं का ? आपणच नाही तर आपली संस्कृती तरी कुठून राहील ?
या नंतरच्या पिढ्यांना निसर्ग चित्रा पुरता तरी शिल्लक राहील का हा प्रश्न आहेच..
मुलं , माणसं सगळे ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन जाताना दिसतील का... अंगणामध्ये दाणे टिपायला चिऊ-काऊ फक्त गोष्टीतच असणार का हो ...किलबिल गाणारे पक्षी , फुलांवर उडणारी रंगीत फुलपाखरे हे सारं सारं फक्त कवितेत आणि चित्रातच बघायचं का या नंतरच्या पिढ्यांनी ? असा विचार केला तरी डोकं सुन्न होतं ..किती भयंकर आहे हे दृश्य. आयुर्वेदाचं महत्त्व कसं जपणार , औषधी वनस्पतींमध्ये सगळ्यात बहुगुणी आहे तुळस . तुळशीवृंदावनं दारात , अंगणात उभी असायची , कधीकाळी होती असं फक्त आपल्याला वाचायला मिळणार का?
त्यामुळे आता तरी मानवानी जागं व्हावं . वृक्षतोड थांबवावी एक तरी झाड लावावं. त्याला जपावं , त्याला वाढवावं, त्याला निवारा द्यावा तर तो आपल्याला निवारा देईल . हे किती सोप्प आहे खरं तर समजायला आणि वागायला देखील.
नुसतं जागतिक पर्यावरण दिन साजरे करून , भाषण देऊन, चित्र लावून थोडीच संस्कृती जिवंत राहणार आहे ?
त्यासाठी केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे... असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वतःहा पासून या सत्कार्याची सुरुवात करावी लागेल ना... आपल्या मराठी मातीचा टिळा अभिमानानी लावायचा असेल तर त्यासाठी आपल्या काळ्या आईची सेवा केली पाहिजे . तिच्या कुशीत वृक्षारोपण करून , सत्कर्माच्या संस्कृतीचे बीज पेरले पाहिजे .
मग... लावणार ना एकतरी वृक्ष आणि जपणार ना आपल्या संस्कृतीला !!!
©️सौ. विभावरी चिटणीस
दि.२३.६.२०२२

167 

Share


Written by
विभावरी चिटणीस

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad