घरात वडीलधारी माणसे असतील तर त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. माझ्या आजीचीच गोष्ट घ्या. तिच्याकडे एक डायरी होती. ज्यात ती तिच्या आयुष्यातील छोट्या- मोठ्या गोष्टी, प्रसंग, प्रेरणादायक वाक्यं असं सगळं लिहून ठेवायची. आता ती या जगात नाही. पण तिची डायरी परवा सहजच मी चाळत होते. त्यात तीने लिहिलेले काही विचार मी या लेखाद्वारे मांडते आहे.
१. भविष्यकाळावर लक्ष द्या, भूतकाळ सोडून द्या.
आजीचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी काळचा. त्या काळी बायका नऊवारी साडी नेसायच्या. तेव्हा तंत्रज्ञानाचा विकास देखील झालेला नव्हता. तसेच आजीचे शिक्षण जेमतेम सातवी पर्यंत झालेले. तरीसुद्धा जसा जसा काळ पुढे सरकत गेला तशा सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला. काळानुसार साडीप्रमाणेच पंजाबी ड्रेसमध्ये ती लीलया वावरायची. इतकंच काय पण ती मोबाईल, कॉम्प्युटर बऱ्यापैकी शिकली. तिचे हे पुरोगामी विचार, वागणं समाजाला पटायचे नाही पण ती नेहमी एकच म्हणायची की आपण काळानुसार बदलायला हवं. भूतकाळ मागे टाकून भविष्यकाळ उज्ज्वल करायला हवा.
२. आयुष्य पुन्हा सोपे होऊ शकते.
कोरोनाच्या काळातच ती आम्हाला सोडून गेली. पण तिने त्याही काळात आम्हाला भरपूर धीर दिला. कोरोनाच्या काळात बाबा घरी होते. मला नोकरी मिळत नव्हती. यामुळे आम्ही सगळेच चिंतेत होतो. आजी मात्र आम्हाला सतत सांगायची ही वेळ देखील निघून जाईल. हा कठीण काळ जाऊन आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे सोपे होईल. फक्त आपण धीर सोडता कामा नये. आम्हाला धीर देणाऱ्या आजीला कोरोनाने ग्रासलं तेव्हा दवाखान्यात जाताना सुद्धा ती 'आयुष्य पुन्हा सोपे होऊ शकते.' हेच वाक्य बोलून गेली.
३. इतरांना तुम्ही जसे आहात तसे स्वीकारू द्या.
आपण अनेकदा लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, आपल्याला काय म्हणतात याकडे खूप लक्ष देत असतो. लोकांच्या म्हणण्यानुसार बदलण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. मात्र आपण जसे आहोत तसेच राहण्याचा प्रयत्न करायला हवा. जोपर्यंत आपल्याला स्वतःला वाटत नाही की आपण आपल्यात बदल करायला हवेत तोपर्यंत बदलता कामा नये. याच गोष्टीचा इतर लोकांना देखील हवे तसे स्वीकारू द्या.
४. जे काही तुमच्यासोबत घडत आहे ते तुम्हाला घडवेल. भलेही आत्ताची स्थिती तुम्हाला नकोशी वाटत असेल तरी.
आजीच्या आयुष्यात तसे अनेक छोटे मोठे प्रसंग घडून आले. आजोबा अचानकपणे साथ सोडून निघून गेले, तिचा मोठा मुलगा तिच्यापासून वेगळा झाला. पण त्या प्रसंगात ठाम राहिली. कपडे शिवून आपल्या मुलांचा सांभाळ केला. म्हणून परिस्थिती आपल्याला सुधारते, घडवते. प्रसंगी आयुष्य जगण्यासाठी परिपूर्ण करते. यावर तिचा विश्वास आहे. भरती नंतर ओहोटी येणारच आहे पण तोपर्यंत त्यातून तरून जाण्यासाठी चांगल्या गोष्टीची आशा कायम ठेवायला हवी.
५. सकारात्मक राहण्याचा निर्धार करा.
परिस्थिती चांगली असो किंवा वाईट त्याचे दुःख, आनंद व्यक्त करणे हे तुमच्या वृत्तीवर अवलंबून असते. थोडक्यात काय तर वाईट प्रसंग आले की आपण हताश, निराश, दुःखी होऊन जातो. तेच आनंद झाला की खुश होतो. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की सकारात्मक राहण्याचा निर्धार करायला हवा. परिस्थिती कशीही असो आपण नेहमी सकारात्मक राहण्याला प्राधान्य दिले तर आपले आयुष्य सुंदर होऊ शकते.
अशा काही रोजच्या जगण्यात येणाऱ्या गोष्टी त्या डायरीत लिहिलेल्या आहेत ज्या मला नेहमी उपयोगी पडतील आणि आजपासून त्या तुमच्याही नक्की उपयोगी येतील. तेव्हा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा व तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांमाणसांकडून कोणत्या गोष्टी शिकल्या तेही नक्की सांगा.