Bluepad | Bluepad
Bluepad
महर्षी जमदग्नी ऋषी इतके कोपिष्ट का होते?
M
Minakshi Divekar
23rd Jun, 2022

Share

वैदिक काळात कुळाला खूप महत्त्व आहे. विविध कुळांमध्ये भृगुकुळाचा समावेश आहे. या कुळात जन्म घेणारी व्यक्ती राज्यकर्ता झाली नाही पण या कुळात महान महर्षी आणि गुरु यांनी जन्म घेतला. महर्षी भृगुंपासून परशुराम हे या कुळाचे सातवे वंशज आहेत. याच कुळात जन्म घेतला महर्षी जमदग्नी यांनी. ऋषी जमदग्नी म्हणजे महापराक्रमी परशुराम यांचे पिता होय.

महर्षी जमदग्नी ऋषी इतके कोपिष्ट का होते?

भृगुकुळाचा उल्लेख ब्राह्मणकुळ असाही केला जातो, तो या ऋषी परंपरेमुळेच. ऋषी जमदग्नी हे भृगुवंशीय ऋचिक यांचे सुपुत्र आहेत. ऋषी जमदग्नी यांचा उल्लेख सप्तर्षीमध्येही केला जातो. ऋषी ऋचिक यांचा विवाह इश्वाकू वंशातील गाधी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी झाला होता. गाधी राजाच्या पत्नीला पुत्र नव्हता. सत्यवतीलाही पुत्रप्राप्तीची आस होती. म्हणून तिने ऋचिक ऋषींशी दोघांनाही पुत्र व्हावा यासाठी चर्चा केली. ऋचिक ऋषींनी दोघींसाठी दोन चरु (खाद्यपदार्थ) तयार केले. एका चरूमुळे सत्यवतीला ब्राह्मण गुणसुत्र पुत्र तर तिच्या मातेला क्षत्रिय गुणयुक्त पुत्र व्हावा अशा पद्धतीने हे चरू अभिमंत्रीत केले होते. प्रत्यक्षात सत्यवतीच्या मातेने या चरुंची अदलाबदल केली. हे गुपित ऋचिक ऋषींना कळले, तेव्हा सत्यवतीने ‘मला ब्राह्मण गुणयुक्त पुत्र हवा’ असा हट्ट धरला. ऋचिक ऋषींनी मात्र आता ‘जे घडले आहे, त्यात बदल होणार नाही’ असे सांगितले. त्यावर सत्यवतीने प्रार्थना केली की निदान माझा नातू तरी ब्राह्मण गुणयुक्त असावा. या चरुंमुळे गाधीराजाला पत्नीच्या पोटी विश्वामित्र जन्माला आले. तर सत्यवतीला जमदग्नी यांच्यासारखा योद्धा पुत्र प्राप्त झाला.

भृगु कुलाचा मूळ स्वभाव क्षत्रिय वृत्तीचा नसल्यामुळे जमदग्नींनी आयुष्यभर तपाचरण केले. पण क्षत्रिय अंश असलेल्या चरूमुळे ते शांत स्वभावाचे न राहता कोपिष्ट झाले. जमदग्नी पुत्र असलेल्या परशुरामांमध्ये मात्र ब्राह्म आणि क्षात्र तेज दोन्ही होते. महर्षी ऋचिकांचा आश्रम आजच्या आंध्र प्रदेशात गोदावरीकाठी कोटितीर्थ येथे होता. अनेक वर्षे तेथे तपश्चर्या केल्या नंतर ऋचिक ऋषी पुढील साधनेसाठी गंगाकाठी गेले. तेथे रेणू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची कन्या होती रेणुका. ‘तुझ्या मुलीचं स्वयंवर मांड’ असा सल्ला ऋचिक ऋषींनी राजाला दिला. या स्वयंवराच्या वेळी त्यावेळचे सर्व राजे आणि इंद्रादि देवही उपस्थित होते. पण रेणुकेने जमदग्नी ऋषींची निवड करून त्यांनाच माळ घातली. त्यावेळी देवराज इंद्राकडून रेणुकेला कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू आणि अनेक दिव्य रत्ने, तसेच वस्त्रालंकार भेट म्हणून मिळाले. भृगुऋषींचे देशभर विविध भागांत आश्रम होते. ते चालविण्याची जबाबदारी जमदग्नी ऋषींवर आली होती. आजच्या कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या काठी बेळगाव-सौंदत्तीजवळ असलेल्या भृगु आश्रमात जमदग्नी आणि रेणुका येऊन राहिले. सौंदत्तीच्या आश्रमाची जबाबदारी माता रेणुका सांभाळीत असत. जमदग्नी ऋषी देशभर संचार करीत असत. जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, बृहद्भानू, बृहत्कण्व आणि भार्गवराम अशी त्यांची नावे होती.

जमदग्नीचा शाब्दिक अर्थ आहे अग्निला भस्म करणारा. महाभारतात जमदग्नी यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते ती म्हणजे ऋषी जमदग्नी एकदा सुर्यदेवावर खूप नाराज झाले कारण सुर्याची दाहकता त्यांना सहन होत नव्हती. सुर्यदेवाला भयभीत करण्यासाठी त्यांनी आकाशात बाणांचा वर्षाव केला. सुर्यदेव एका ब्राह्मणाच्या रुपात ऋषी जमदग्नी यांना भेटायला आले आणि त्यांनी दोन वस्तू ऋषी जमदग्नी यांना दिल्या. त्या दोन वस्तू म्हणजे पादत्राणे आणि छत्री. या दोन्ही गोष्टींचा वापर केल्यामुळे उष्णतेची दाहकता कमी होते. आपल्याकडे दान करताना पादत्राणे आणि छत्री दान द्या असे सांगतात.

ऋषी जमदग्नी यांचा स्वभाव कोपीष्ट होता. या संदर्भात एक प्रचिलीत कथा सांगितली जाते. हिमालयातील निरमुंड म्हणून आज प्रसिद्ध असलेल्या स्थानी जमदग्नींचा आश्रम होता. पत्नी रेणुकेसह ते या आश्रमात राहत होते. माता रेणुका नदीवर स्नानासाठी गेली असताना तिथे तिने गंधर्वांची जलक्रीडा पाहिली. त्या नादात तिला आश्रमात परतायला उशीर झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमदग्नी ऋषींनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा केली. आपल्या पुत्रांना त्यासाठी ऋषींनी बोलावले. कोणताही पुत्र हे कृत्य करायला तयार नव्हता पण आज्ञाधारक महापराक्रमी परशुरामाने पित्याची आज्ञा ऐकताच क्षणाचाही विचार न करता मातेचा शिरच्छेद केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी परशुरामांना दोन वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे पहिल्या वराने त्यांनी माता आणि बंधूंना जिवंत करा अशी प्रार्थना केली. या घटनेची स्मृती रेणुकामातेला राहू नये असा दुसरा वर मागितला.

दैह्य वंशाचा महापराक्रमी राजा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन महिष्मतीत राज्य करत होता. ऋषी जमदग्नी यांना भेटण्यासाठी तो त्यांच्या आश्रमात आला. राजाने ऋषींच्या आश्रमात कामधेनू गाय पाहिली. तिची किर्ती ऐकल्यावर त्याने कामधेनूची मागणी ऋषींकडे केली. जमदग्नी ऋषींनी नकार दिला तेव्हा राजाने कामधेनू बळजबरीने नेली. या घटनेमुळे आश्रमाचे वैभवच नाहीसे झाले. ही घटना समजताच परशुरामांनी थेट महिष्मती नगरीत जाऊन कार्तवीर्यास युद्धाचे आव्हान दिले आणि राजाचा पूर्ण पराभव करून त्याचा वध केला. कार्तविर्याच्या वधाचा सूड उगविण्यासाठी त्याच्या पुत्रांनी जमदग्नी यांच्या आश्रमावर हल्ला केला. सर्व प्रकारची अस्त्रे आणि विद्या येत असूनही शस्त्र हाती न धरण्याच्या नियमामुळे या युद्धात जमदग्नी ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त झाला. कार्तवीर्याच्या पुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. महापराक्रमी परशुराम यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते क्रोधीत झाले. त्यांच्या मातेने पृथ्वी निःक्षत्रिय कर अशी आज्ञा केली. तेव्हा महापराक्रमी परशुराम यांनी उन्मत्त झालेल्या २१ क्षत्रिय राजांचा संपूर्ण पराभव केला. तसेच आपल्या पित्याची हत्या केलेल्या कार्तविर्याच्या पुत्रांचाही वध केला. जेव्हा कधी वैदिक काळात भृगुकुळाचा उल्लेख केला जातो तेव्हा महर्षी जमदग्नी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.

433 

Share


M
Written by
Minakshi Divekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad