Bluepad | Bluepad
Bluepad
साबणापासून सुरुवात करत कोलगेट कशी बनली टॉपची कंपनी?
A
Anuradha Godbole
23rd Jun, 2022

Share

आपल्या दिवसाची सुरुवात ज्यापासून होते ते नाव म्हणजे कोलगेट. लोक ब्रशला टूथपेस्ट न लावता 'कोलगेट' लावतात. इतकी लोकप्रियता या उत्पादनाने कशी मिळवली? कशी स्थापन झाली ही कंपनी? कुणी केली? हे सगळं जाणून घेऊया या लेखामध्ये.

विल्यम कोलगेट हे मूळचे इंग्लंडमधील. त्यांचे वडील शेतकरी होते. पण नंतर, हे कुटुंब अमेरिकेतील मेरीलँड येथे स्थलांतरित झाले. तिथे वडील मित्रांच्या साथीनं विल्यम मेणबत्त्या आणि साबण बनवू लागले. दुर्दैवाने दोन वर्षांनंतर काहीच ज्ञान नसल्यामुळे मोठा तोटा झाला आणि त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे कोलगेट कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली. तेव्हा १६ वर्षांच्या विल्यम यांनी घर सोडून काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते छोटी मोठी कामं करू लागले.

साबणापासून सुरुवात करत कोलगेट कशी बनली टॉपची कंपनी?

१८०४ मध्ये, विल्यम न्यूयॉर्कला पोहोचले आणि एका साबणाच्या कारखान्यात काम करू लागले. त्यांनी त्या कारखान्यात राहून व्यवसायाचे तंत्र आणि पद्धती शिकून घेतल्या. कारण त्यांनी तोच व्यवसाय चालवायचा ठरवला होता. २ वर्षे तिथे काम केल्यानंतर, भूतकाळात कोणत्या चुका झाल्या व त्या कशाप्रकारे झाल्या आणि नुकसानीची कारणे काय, हे विल्यम यांनी शिकून घेतले.

१८०६ मध्ये एका छोट्या भाड्याच्या खोलीत त्यांनी स्वतःचा साबणाचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. याचे नाव ‘विल्यम कोलगेट अँड कंपनी’ ठेवलं. लवकरच हा साबणाचा व्यवसाय अधिकाधिक यशस्वी होऊ लागला. लवकरच विल्यमनी एक छोटा कारखाना सुरू केला. दुर्दैवाने, त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. आजारामुळे अनेक वर्ष ते व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. त्यामुळे व्यवसायाचे नुकसान झाले. पण ते कामावर परतल्यानंतर त्यांनी विक्री आणि नफा दुप्पट केला.

विल्यम यांचा दानधर्मावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पन्नातील बराचसा भाग दान केला. हळूहळू ते एकूण उत्पन्नाच्या ५०% रक्कम दान करत होते. २५ मार्च १८५७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विल्यम यांचा व्यवसाय त्यांच्या तीन मुलांनी हाती घेतला आणि ही कंपनी पुढे नेली. त्यांनी १८७३ मध्ये कंपनीची पहिली टूथपेस्ट बाजारात आणली, जी आजच्या सारखी ट्यूबमध्ये उपलब्ध नव्हती तर एका बाटलीमध्ये उपलब्ध होती.

परंतु कालांतराने कोलगेटचे पॅकेजिंगदेखील बदलत गेले आणि १८९६ पासून ही टूथपेस्ट ट्यूबमध्ये उपलब्ध झाली. केवळ साबण बनवणाऱ्या कंपनीने नंतर टूथपेस्ट, परफ्यूम, शेव्हिंग क्रीम बनवायला सुरुवात केली. १९२८ नंतर या कंपनीने ‘पामोलिव्ह’ सोबत उत्पादने बनवायला सुरु केली व त्यानंतर कंपनीचं नाव 'कोलगेट पामोलिव्ह' असं ठेवलं गेलं.

कोलगेट अमेरिकेत सुरुवातीपासूनच अव्वल स्थानावर आहे. कोलगेट एकापाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढतच मिळवत राहिले. पण या यशाच्या मार्गात कोलगेटसाठी पहिलाच अडसर ठरला ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ नावाची कंपनी. या कंपनीने फ्लोराइड असलेली टूथपेस्ट बाजारात आणली. ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’च्या या हालचालीमुळे कोलगेटच्या अडचणी वाढल्या.

कोलगेटला यावर मात करायला बराच वेळ लागला तोपर्यंत "प्रॉडक्ट अँड गॅम्बल" अमेरिकेची नंबर वन टूथपेस्ट बनली होती. ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ला त्यांच्या यशाचा इतका अभिमान होता की कोलगेटला मागे टाकण्यासाठी त्यांनी क्रेस्टच्या बाजारात आणखी ५२ उत्पादने लाँच केली. प्रत्येक ब्रँडचे स्वतःचे काही खास गुण असतात. प्रॉडक्ट अँड गॅम्बलची अनेक उत्पादने असल्याने कोणते उत्पादन घ्यावे, अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाली. या कारणास्तव लोकांनी कोलगेटचा हात हातात घेतला.

कोलगेटने १९९२ मध्ये 'कोलगेट टोटल' बाजारात आणली आणि दातांमधील पोकळी, हिरड्यांच्या समस्या यांपासून मुक्ती व दातांची स्वच्छता या उत्पादनातील तीन गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केले. या टूथपेस्टमध्ये बदल घडवून आणताच कोलगेट पुन्हा एकदा अमेरिकेत नंबर वन झाला. आज कोलगेटने आपले जाळे जगभर पसरवले आहे. आज जगातील दर १०० पैकी ६५ घरांमध्ये कोलगेटचा वापर केला जातो. आजच्या काळात जगभरात हजारो लोक या कंपनीत काम करतात. कोलगेट हा सध्याच्या घडीला जगातील नंबर वन टूथपेस्ट ब्रँड आहे.

भारतात, कोलगेटने टीव्ही जाहिरातींसाठी बॉलीवूड सेलिब्रिटींना ब्रँड ॲम्बेसिडर बनवले आहे. जगात असं म्हटलं जातं की, हार मानली नाही तर मेहनत व्यर्थ जात नाही आणि प्रयत्न करणारे कधीच हार मानत नाहीत. प्रयत्न करण्यासाठी कोलगेटचं घोषवाक्यही आपल्याला तेच सांगतं, 'स्माईल करा आणि सुरुवात करा.'

412 

Share


A
Written by
Anuradha Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad