वृक्ष नाश म्हणजे संस्कृतीचा विनाश!
लेखक ऑफ द वीक
नाव गोड ठेवले विकास!
वन संपदा झाली भकास!
गुदमरतो आहे मानवी श्वास!
हानी पर्यावरणाची!!
विकासाच्या आणि प्रगतीच्या नावाखाली या जगातील आपल्या भारत देशातील, महाराष्ट्रातील आणि सर्व पर्वत वनराई वरील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. वृक्ष तोडून आपला किती विकास झाला आहे हे सांगता येणार नाही परंतु प्रचंड प्रमाणात झालेल्या आणि होत चाललेल्या वृक्षतोडीमुळे आमच्या संस्कृतीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. झोपेच सोंग आणि डोंगर घेतलेल्या माणसाला आताच जागा आले नाही तर भवितव्य अंधकारमय असेल. रस्ते आणि उद्योग धंदे नवनिर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदेची कत्तल करून माणसाने त्याच्या मृत्यूला साक्षात आमंत्रण पाठवले आहे. आमच्या निसर्गाचं आणि मानवाचा नातं हे अतूट असून जन्मो जन्मीचे ऋणानुबंध निसर्गाशी जोडलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी पासून तेवढा पर्यंत सर्व वृक्षांची पूजा केली जाते. एवढेच काय आमचे संत शेतातील भाजीपाल्याला ही देवता समाधान मानतात." कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी!"संत श्रेष्ठ सावता महाराज यांचे हे चिरकालीन विचार आमच्या संस्कृतीची जाणीव करून देतात. वृक्षप्रेमी असलेला मनुष्य आज त्याच्या जीवावर उठायला लागला आहे. त्यामुळेच विविध आपत्ती आणि संकटे वारंवार कोसळायला लागली आहे. माणसं भोग लाल सेत अडकल्यामुळे वृक्ष कत्तल करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. ज्या निसर्गाला आम्ही देवतास्वरूप मानतो त्या निसर्गावर हात घालणाऱ्या माणसाला साक्षात परमेश्वर ही माफ करणार नाही.
अनमोल आहे वृक्षसंपदा! झाली रुक्षतोड कोसळते आपदा!!आमच्या जीवनात वृक्षसंपदा मोलाची आहे. पर्यावरणाचे संतुलन आणि पर्यावरण प्रदूषण राखण्यासाठी वृक्ष देवतास्वरूप आहे.महासंत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वृक्ष आमचे जवळचे नातेवाईक आणि मित्र आहे. वृक्ष आम्हाला जी मदत करतात ती कोणीही करू शकत नाही. आम्हाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, ऑक्सीजन या सगळ्या गोष्टी पृथ्वी वरूनच मिळतात. या पृथ्वीचा अतूट हिस्सा म्हणजे वृक्षसंपदा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे आम्हाला सर्व निशुल्क उपलब्ध आहेत तरीही या उपकाराची परतफेड मनुष्य अपकारांने करतो, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून!
भ्रष्ट झाली माणसाची बुद्धी! वृक्ष तोड होऊनी होते तापमान वृद्धी!वृक्षतोड एवढी सामान्य झाली आहे की लोकांना या वृक्षतोडी बद्दल काहीच सोयरसुतक वाटत नाही. परंतु यामुळे आम्ही एका संकटाला तोंड द्यायला आरंभ केला आहे याची सोयीस्कर विसर माणसाला पडली आहे. वृक्षतोडीमुळे प्रचंड प्रमाणात तापमान वाढ झाली आहे. पर्जन्य देवतेची अवकृपा झाली आहे. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते आहे. समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात जल, वायू ,भूमी, आकाश प्रदूषण होत आहे. जंगल ऱ्हासामुळे मानवी आणि पशुपक्षी जीवन धोक्यात आले आहे. नावासाठी माणूस वृक्षारोपण समारंभ करतो पण त्याच्या संवर्धनाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतो.
चारशे वर्षांपूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी या वृक्ष संपदेला आमचे सोयरे संबोधले.
महाराज म्हणतात,
वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥३॥
हरीकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥५॥
या पृथ्वीतलावरील जेवढी काही वृक्ष आहेत वेली आहेत, जेवढे काही वनचर पशु आहेत ते सर्व आमचे सोयरे आहेत आणि सुस्वर कंठाने आळवणारे पक्षी देखील आमचे जिवलग आहेत. जास्त प्रकारचे वृक्ष वेली ,वनचर, पशू-पक्षी हे वनात आढळतात आणि वनात एक वेगळेच सुख आहे. तेथे एकांतही आहे व आम्हाला एकांतवासाची खूप आवड आहे. तेथे गेले की मग कोणत्याही प्रकारचा गुणदोष आपल्या अंगी येत नाही.वनामध्ये आकाशाचे मंडप आणि पृथ्वी आमचे आसन आहे. तेथेच आम्हाला खूप करमते.कधी कधी तर आम्ही तेथे आनंदाने क्रीडा ही करतो, म्हणजेच खेळ खेळतो. देह निर्वाहाकरता आमच्याजवळ गोधडी व पाणी पिण्यास एक कमंडलू आहे आणि वेळेची ज्ञान करून देण्याकरता आम्हाला वाऱ्याच्या गतीवरून वेळेचे ज्ञान होते. हरिकथा हे आमचे भोजन आहे .त्याचा आम्ही विस्तार करू आणि हरिकथेची वेगवेगळे प्रकार करून आम्ही आवडीने सेवन करू. जगद्गुरुतुकाराम महाराज म्हणतात वनात आम्ही एकटे असल्यामुळे आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो आणि परमार्थ विषयी आम्ही आमच्याशी संवाद साधून चर्चा करत असतो.
वनराई आहे महान! मानवा तू याचे मोल जाण! वृक्ष लागवडीची घे आण! राखण्या पर्यावरण!!वृक्ष आणि वनसंपदेचे हे महत्त्व आम्ही जाणले पाहिजे. दुष्काळाचे चटके आम्हाला भाजून काढत आहे. न येणारा पाऊस आम्हाला भावी संकटाची जाणीव करून देत आहे. आम्ही रस्त्याने चालताना किंवा आराम करण्यासाठी, भर उन्हात गाडीला सावलीत लावण्यासाठी झाडे शोधतो. या झाडांची सावली आम्हाला घ्यायची असेल तर आम्ही झाडे लावली पाहिजे. वृक्ष आमचे सोयरे आहेत. त्यापासून आम्हाला फळे-फुले, छाया आणि प्राणवायू मिळतो. वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे हे आमचे प्राधान्यक्रमाने कार्य राहिले पाहिजे. झाडांचा कोणताही भाग निरुपयोगी नाही. फळे आणि फुले त्वरित लाभ देणारे आहे. त्याचे खोड घरबांधणीसाठी, कागद निर्माण करण्यासाठी उपयोगी येते. पालापाचोळा नैसर्गिक खत निर्माण करून कसदार जमीन तयार करायला मदत करतो. झाडांच्या मुळा जमिनीची धूप थांबवतात. या निसर्गातील जवळ जवळ सर्वच वनस्पती या औषधी युक्त आहे त्यामुळे माणसाला विविध आजारांपासून मुक्ती मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे की वृक्षसंपदा आमच्या जीवनात किती महत्वाची आहे. म्हणूनच वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. रुक्ष संपत्ती पासून आम्हाला विविध गोष्टी प्राप्त होतात. जेथे वृक्षाची छाया आहे तिथे निसर्गाची माया अनुभवायला येते. जेथे उत्तम वृक्ष वल्ली आहेत तेथे निरामय काया राहते. सजीवांचे अस्तित्व पर्यावरणावर अवलंबून आहे. करावी वृक्षसंपदा जोपासना! तीच आहे आमच्या संस्कृतीची उपासना! जागे होई रे वेड्या मना! करी काही आता तू!!म्हणूनच वृक्षांची जोपासना ही आमच्या संस्कृतीचे उपासना आहे. रुक्ष नाश म्हणजेच संस्कृतीचा विनाश होय.
आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि अखिल मानव जातीच्या सुखासाठी, प्राण्यांना जीवदान देण्यासाठी वृक्ष लागवडीचा संकल्प करू या. करू एक सर्व संकल्प! न ठेवता मनात विकल्प! वृक्ष लागवड प्रकल्प! घेऊ हाती सारेजण!!