Bluepad | Bluepad
Bluepad
पूर
धनश्री अजित जोशी
23rd Jun, 2022

Share

 पूर
आठवतंय दादांचे गाठोडं ओवरीत टाकून शिपाई निघून गेले.एकदम काय झाले ते कळलेच नाही .
लोळागोळा झालेले दादाकाका आजही आठवतात.काकूची शुध्द हरपली..मोठ्या आईने टाहो फोडला. घरात एकच गडबड उडाली.मनूकाकी येऊन आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेल्या.
नंतरचे कित्येक दिवस काकांना शुध्द नव्हती.रोज वैद्य घरी येत असत. दरम्यान आईला बरं नव्हते . रोज पोलीस पाटील चौकशीला घरी येत. पुण्यातल्या काकांना कळलं तसं ते गावी आले..इतर उचलून काही मदत करणं शक्य नाही .म्हणून माझी जबाबदारी त्यांनी उचलली..त्यांच्याबरोबर पुण्याला आलो.
काकांचं घर वाड्यातले.काकां तसे प्रेमळ पण संतापले की जमदग्नींचा अवतार ..कडक शिस्तीचे.थोडंसुध्दा इकडचं इकडे खपायचं नाही. सगळ्यांना एक नियम. उलटून बोलणे , आवाज चढवणे..काय बिशाद होती..श्रीधरला तर अस्स धारेवर धरत..म्हणता सोय नाही.
पावसाचे दिवस होते.त्यावर्षी बराच पाऊस झाला..मुठेला पुर आला..पाणी वाढलंय म्हणून लवकर शाळा सोडली तशी आम्ही मुले मुले गेलो..ओंकारेश्वराला..पाणी बघायला.
बरंच पाणी आलं होते. बरीच गर्दी जमली होती पाणी बघायला.तरूण मुले साहस म्हणून पाण्यात उड्या मारत होती आम्ही दोघेही पट्टीचे पोहणारे..काय एकदम मनात आले..नजरा नजर झाली, मित्रांच्या हातात दप्तराची पिशवी देऊन हातात हात घालून एकदम पाण्यात उडी घेतली..पाण्याला चांगलीच ओढ होती.
 पूर
दम टिकवताना दमछाक होत होती..त्यातही मजा वाटत होती.कसेबसे किनार्याला लागलो.
इकडे मित्रांची काळजीने भंबेरी उडाली होती. आम्ही आलो तशी सगळ्यांना हुश्श झाले .
घरी यायला बराच उशीर झाला..शाळा लवकर सोडण्याची बातमी आधीच घरी पोचली होती.
घरी येतो तो ,घरासमोर ही गर्दी , अजून कसे आलो नाही म्हणून सगळे काळजीत . वाड्यातली मंडळी घरासमोर जमलेली.
आम्ही नखशिखांत भिजलेले , धापा टाकत घरात शिरलो. काकू रडत होती.काका शोधायला मंग्याला घेऊन बाहेर पडलेले.
आम्हाला बघताच तिचा बांध फुटला .,"अरे किती काळजी करायची?. कुठे होतात रे, हे काय हा काय अवतार करून घेतलात ? "
कोणीतरी जाऊन काकांना शोधून घरी आणले.तोपर्यंत आम्ही कपडे बदलून खायला बसलो होतो.
काका घरी आले ते संतापलेले..त्यांच्या कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. त्यांनी एक जळजळीत कटाक्ष आमच्यावर टाकला..काकूने नजरेत त्यांना शांत रहायला सांगितले. आता आमची काही खैर नाही याची जाणीव झाली.
खाणे होताच क्षणी..काकांची हाक आली." श्रीधरा , श्रीरंगा..कुठे उलथला होतात? शाळा कधी सुटली? "
श्रीधर काही तरी बोलणार एवढ्यात कोपर्‍यातली छडी काकांनी हाती घेतली आणि त्याला बडवायला सुरवात केली.,
." बाबा..मारू नका ना."
"म्हणे मारू नका, चांगलं फोडून काढलं पाहिजे."
" काका..पुन्हा.." मी मध्ये पडलो तशी मला ही तडाखे बसले .
" काही बोलू नका .सगळं समजलंय मला , वेळीच फोडून काढले नाही तर मिर्या वाटेल डोक्यावर , काय गरज होती..पाणी बघायला जायची? गेलांत तर गेलात.पुरात उड्या घेतल्यात..अरे काही झाले असते..तर रे..आम्ही काय केले असते..रे.तुझ्या बापाला काय उत्तर दिले असते? श्रीरंगा .." असे म्हणून हातातली छडी फेकून देत काकां रडू लागले.
काय करावे आम्हाला सुधरत नव्हते..एकदम पुढे झालो.." रडू नका ना काका , परत नाही असे करणार ."
" बाबा , बाबा रडू नका ना, चुकलो मी .." श्रीधर ने काकांचे पाय धरले.तशी काकांनी आम्हा दोघांना जवळ घेतलं .मायेने पोटाशी धरलं .
त्यांचा तो स्पर्श आजही आठवतोय.
" ऐकलेत का..संध्याकाळ झाली , देवाजवळ दिवा लावा आणि गुळ ठेवा. आज रात्री जेवायला शिरा होऊ दे."
असे म्हणून काका हसले तशी सगळ्यांनाच बरं वाटले.
रामरक्षा झाली. जेवणं झाली. पावसाने धुमाकूळ घातला होता. थांबायचे नाव नाही. अश्या पावसाची मला सवय होती..
घरासमोर ठेवलेल्या कासंडीत पागोळ्यांचे पाणी भरत होते. त्याच्याखाली हात धरून उभा होतो.एकदम गाव आठवले..अखंड कोसळणारा पाऊस आठवला . आईची आठवण झाली..मोठी आई..बाबा..आजोबा ..ते .कौलारू घर.परिसर .सगळे डोळ्यासमोर उभे राहिले..
आज पुराच्या पाण्यात काही झाले तर ?
विचाराने बाहेर पडणारा पाऊस म्हणता म्हणता डोळ्यावाटे जरूर लागला.
" काय रे श्रीरंगा , डोळ्यात पाणी .बाळ घरची आठवण येतीय का? "
काकूने जवळ घेऊन विचारले .तशी तिच्या कुशीत शिरून डोळ्यातील पाण्याला वाट मोकळी करून दिली..तिच्या पाठीवरून फिरणार्या हातात आईचा स्पर्श शोधत राहिलो..
.
 पूर

180 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad