१७५७ : प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सिराज उद्दौला यांचा पराभव केला.
भारताच्याच नव्हे तर जगाच्या आधुनिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेली लढाई म्हणजे प्लासीची लढाई होय. बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्हने आपल्या गोटात ओढले. भारतातील अतिशय बलाढ्य व संपन्न बंगालचा प्रदेश इंग्रजांचा प्रभावीखाली गेला. प्लासीच्या लढाईतील विजयाने कंपनीला प्रचंड संपत्ती मिळाली होती आणि इंग्रजांना भारतात सत्ता स्थापन करण्यासाठी पाया रचला गेला.
१९४८: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचा जन्म.
नबरुण भट्टाचार्य हे बंगाली साहित्यातील मोठे नाव! त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेता देवी यांच्या कन्या होत्या. १९९७ साली हरबर्ट या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९४२ : दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.
दिग्गज दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सामना, सिंहासन, जैत रे जैत, एक होता विदूषक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. सत्तरच्या दशकात घाशीराम कोतवाल हे नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण ढवळून काढले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून ते गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. पटेल शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
१९०१ : क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म.
महान स्वातंत्र्य सेनानी राजेन्द्र नाथ लाहिरी यांनी काकोरी कांडात सहारनपूर लखनऊ ह्या रेल्वेत चैन ओढून थांबवली आणि या योजनेत सहभागी असणाऱ्या १० क्रांतिकारकांनी सरकरी खजिना लुटला. यासाठी भारतमातेच्या सुपुत्राला उत्तर प्रदेश मधील गोंडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. "मैं मर नहीं रहा हूँ, बल्कि स्वतंत्र भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हूँ" हे त्यांचे फासावर जातानाचे उद्गार होते.
१९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.
फ्रान्सचे महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांनी १९९८ साली फ्रान्सला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच युरो कपसह अनेक मोठे विजय मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचे योगदान होते. झिदान यांनी २००२ साली रियल माद्रिदकडून खेळताना बायर लेवरकुसेनविरुद्ध विजयी गोल झळकावून रिआल माद्रिदला युएफा चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद मिळवून दिले होते. ते फुटबॉल विश्वातील सर्वात यशस्वी कोच आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाच्या बळावर रियल माद्रिदचे युफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले होते.
१९५३: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे निधन.
महान क्रांतिकारी श्यामाप्रसाद मुखर्जी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. काश्मीरला मिळालेल्या स्वतंत्र दर्जाच्या विरोधात ते होते. त्यांनी एक देश में दो विधान, दोन प्रधान और दो निशान नहीं चलेंगे' असा नारा त्यांनी दिला होता. कलम ३७० रद्द होण्यासाठी ते वारंवार काश्मीर आणि दिल्लीला जात असत. १९ मे १९५३ रोजी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
१९८० : भारताचे ४थे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे निधन.
व्ही. व्ही. गिरी हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी असहकार आंदोलन, होम रुल चळवळीमध्ये सहभाग नोंदवला होता. गिरी ऑल इंडिया रेल्वे मेन फेडरेशनचे संस्थापक सदस्य होते. इंडियन ट्रेड यूनियन फेडरेशनचे ते दोन वेळेस अध्यक्ष होते. १९६९ साली ते भारताचे चौथे राष्ट्रपती बनले. १९७५ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९८० : इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे निधन.
इंदिरा गांधीचे सुपुत्र संजय गांधी अमेठी मतदार संघातून खासदार बनले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. हुंडा प्रथा संपुष्टात आणण्याबरोबरच शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, जातीवाद अशा अनेक कठोर कायद्यांची त्यांनी अंमलबजावणी केली. त्यामुळे जनमानसात त्यांच्या बद्दल रोष पसरला होता. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
१९९४: नाटककार, साहित्यिक वसंत शांताराम देसाई यांचे निधन.
चरित्रकार वसंत देसाई १९६० साली बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. वसंत देसाईंचे अमृतसिद्धी, संगीत विभाग, किर्लोस्कर आणि देवल, मखमलीचा पडदा अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘उपवनी गात कोकिळा’ हे त्यांचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
२०२० : डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक निलंबर देव शर्मा यांचे निधन.
निलंबर देव यांच्या चेते किश खट्टे किश मिट्ठे, रिश्ते आणि दी तपाश या कथा प्रचंड गाजल्या. त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले. डोंगरी भाषेला साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अनेक वर्षे जम्मू आणि कश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीचे सचिव म्हणून काम केले. त्यांना २०११ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.