मी स्वतः ला शोधते माझ्यामधे
काय मी धुंडाळते माझ्यामधे...
चौकटीच्या आतले जगणे इथे
एक स्त्री मन राहते माझ्यामधे...
स्वप्न बघते स्वप्न जगते रोज मी
चंद्र तारे पाहते माझ्यामधे....
तू बहर होवून येतो जीवनी
मी ऋतूनां फुलवते माझ्यामधे...
दूरवर गेला पुढे सरकत दिवस
रात्र काळी जागते माझ्यामधे....
आठवण येते तशी जाते तुझी
रोज ती गंधाळते माझ्यामधे....
ओळखीचा चेहरा दिसतो मला
मीच त्याला भेटते माझ्यामधे....
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)