मे महिना संपतो कधी आणि पावसाला सुरुवात कधी होते याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असते. पावसाला सुरुवात झाली की पहिल्या मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. सर्वत्र निसर्गाची किमया पहायला मिळते. सगळीकडे फक्त हिरवेगार दिसू लागते.
जस जसा पाऊस वाढत जातो तस तसे सर्वत्र पाणी साठू लागते. काही ठिकाणी गटारे साफ नसल्याने पाणी तुंबते तर काही ठिकाणी उंच सखल भाग असल्याने पाणी तुंबु लागते. मग त्यातून घरापर्यंत वाट काढणे म्हणजे एक जिकरीचे काम होते. त्यातच जर मुलबाळं किंवा सोबत वयस्कर माणसे असतील तर मग प्रथम त्यांना सुखरुपपणे घरी नेण्याची जबाबदारी आपली असते. एकदा का घरी पोहोचलो की सुटकेचा निःश्वास टाकतो. त्याचप्रमाणे कामावर गेलेली मंडळी कधी येतील, सुखरुप येतील की नाही हेही सांगता येत नाही. आपापल्या घरची मंडळी व्यवस्थित घरी आली की देवाचे आभार मानले जातात.
पण... काही वेळा मात्र पावसाचे तांडव नृत्यच जणू होते व सलग पा सहा दिवस ते चालूच रहाते. अशावेळी सर्वांचीच तारांबळ उडते. जिकडे तिकडे पूर येतात किंवा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारचा पूर २६ जूनला आलेला आपणां सर्वांना आठवतच असे.
जिकडे बघावे तिकडे फक्त पाणीच दिसत होते. कामावर गेलेली मंडळी दोन तीन दिवस तिथेच अडकून पडलेली होती. काहींनी त्यांच्या रहाण्या खाण्याची व्यवस्था केली तर काहींनी त्यांच्या घरी मेसेज देण्याचे काम केले. ठाणे, कल्याण, दिवा, वसई सगळीकडेच पाण्याची पातळी एवढी होती की काही बिल्डींगच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी घरात घुसले होते. झोपडीत रहाणा-यांचे तर काय हाल झाले असतील? किती माणसे मेली असतील? किती वाहून गेली असतील याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. कल्याणला तर वहात्या पुरामुळे जनावरे थेट घराच्या छपरांवर जाऊन अडकली होती. घरे, संसार, नवीन दुकाने, गाड्या सर्व काही वाहून गेले होते. होत्याचे नव्हते झाले होते.
अशाच प्रकारे सावित्री नदीवरचा पूल कोसळून तेथील गावांचे नुकसान न भरण्याजोगे होते. तसेच पूर्ण गावच्या गाव पाण्याखाली गेलेली देखील आपण डोळ्यांनी बघतो. मात्र काही वेळा याही स्थितीत धाडसी मुलं पाण्यात उतरुन लोकांचे जीव वाचवतात. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वयस्कर माणसे यांना सुखरुपपणे बाहेर काढून त्यांच्या खाण्या पिण्याकडे जातीने लक्ष देतात. काही संस्थांमार्फत अशा गावांना अन्नधान्य व कपडे यांचा पुरवठा केला जातो.
पण खरी जबाबदारी पूर ओसरल्यानंतर असते. कारण पूर ओसरला की सर्वत्र दुर्गंधी, कचरा पसरलेला दिसतो. सगळीकडे प्लॅस्टिकच्या कच-याचे ढीगच्या ढीग दिसतात. यावरुन लक्षात येते की आपण असे प्लॅस्टिक वापरतो जे की फक्त पाणी तुंबवायला मदत करतं. या कच-यामुळे सर्वत्र अनारोग्य पसरलेले असते. ताप, सर्दी यांबरोबरच त्वचा विकार, हगवण इत्यादी अनेक रोग डोकं वर काढतात. हे सर्व सुरळीत व्हायला वर्ष दोन वर्षे जातातच.
तसं पाहिले तर या सर्वाला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत असे माझे मत आहे. आपणच आपल्या घराबाहेर कच-याचे साम्राज्य निर्माण करतो. आपले घर आतून स्वच्छ ठेवतो पण बाहेर मात्र कचरा करतो. प्लॅस्टिक वापरतो पण त्याची योग्य विल्हेवाट लावत नाही. गड, किल्ले, नवीन गावे पहायला जातो व त्या सुंदर स्वच्छ जागी कचरा करुन येतो. काही खाल्ले की कचरा रस्त्यावरच टाकतो. काही ठिकाणी सफाई कर्मचारी देखील रस्त्यावरील पाणी जाण्याच्या होलमध्ये कचरा टाकतात त्यामुळे गटारे तुंबतात व पाणी साचत रहाते.
या सर्वांचा विचार करता प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करुन आपले घर व आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्यास सुरुवात केली पाहिजे. म्युनिसिपालटीचे कर्मचारीच साफ सफाई करतील यावर अवलंबून राहू नये.