Bluepad | Bluepad
Bluepad
काळरात्र.
A
Archana Jog
23rd Jun, 2022

Share

हॅलो आई कसे आहात पाऊस पडतोय ना तिकडे कोकणात."
"हो ग संतत धार आहे हो जर सुद्धा उसंत म्हणून नाही घेत."
"तुम्ही इकडे येताय का पुण्याला न्यायला येतो आम्ही दोघे गाडी घेऊन."
"नको ग बाई आम्ही इथे बरे आहोत. तू काळजी नको करू आणि वाटलं तर कळवेन ना मी.  बोलावून घेईन मी तुम्हाला लागलं तर."
"बाबा कसे आहेत गोळ्या वगैरे घेताय ना वेळेवर."
" हो ग बाई किती काळजी करशील.  माझी नातवंड आणि जावईबापू कसे आहेत त्यांची काळजी घे ग कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागलाय म्हणे तिसरी की काय ती लाट येणार बहुतेक."
" तुझी सांधेदुखी कितपत त्रास देतेय."
"तशी आहे पण चालायचच ग वय झालं आता.  ती मला आणि मी तिला सांभाळून आहोत."
"आज वाशीष्टी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्याची बातमी उडत उडत ऐकली तुम्ही दिवसा ढवळ्या मावशीच्या घरी जा नाहीतर पाणी भरायला लागलं  तर तुम्हाला कठीण होईल मग ."
"होय हळूहळू पाणी भरू लागलं आहे पण आपल्या घरात नाही येणार काळजी नको करू.  आलं तरी ओसरत हल्ली गाळ काढला आहे ना नदीतला."
" ते सगळं ठीक आहे पण काळजी घ्या ."
"होय ग बाई आता ठेऊ का फोन."
"हो चल बाय ठेवते फोन ."
आपल्या लेकीबरोबर लांबलचक बोलणं झाल्यावर सुनंदाबाईंनी फोन ठेऊन हुश्श केलं आणि आपल्या दुखऱ्या पायांवर हळुवार हात फिरवला .
"काय ग कालिकाचा फोन का ग. काय म्हणतेय." नानांनी विचारलं
"काय म्हणणार पावसा पाण्याच्या गप्पा ."
तिकडे पण पडतोय काग पाऊस. "
"हो तिकडे ही पाऊस आहे. पण तिला आपली काळजी वाटतेय पाणी भरलं तर आपलं काय होईल या भीतीने."
"वेडी आहे ती आपल्याकडे कशाला भरेल पाणी. उगाच आपल्याला तिकडे घेऊन जायला निमित्त."
"मी तेच म्हटलं तिला; पण न्यायला येऊ का विचारत होती."
" छे नाही हा जायचं पुण्याला.  सहा महिन्यांपूर्वी तर जाऊन आलो.  तसा गौरव पण नव्हता का विचारत. पण गौरव नको आणि कालिका पण नको.  ती त्यांच्या संसारात गुंतलेली असतात. आपण गेल्याने त्यांचं रुटीन थोडं का होईना बिघडत.  बोलत नाहीत काही पण होता होईतो मुलांना त्रास नाही द्यायचा चांगली आहेत पोर आपली ."
" त्यांना नाही हो त्रास होत आपला. आपल्यालाच कुठे घर सोडवतय. झाडामाडं आपण नसलो की पोरकी होतात ."
"खर आहे तुझं आणि खूप जगलो ग आपण आता मृत्यचं भय नाही वाटत . असली आपल्या नशिबात जलसमाधी
तर तेही स्वीकारू.  दोघे जगू एकदम आणि मरताना ही हातात हात घेऊन हसत मरण स्वीकारू."
"तुला मान्य आहे ना की जाऊया तुझ्या बहिणाबाईकडे मुक्काम ठोकायला चार दिवस."
"कशाला उगाच आपलं घर बर की आपण बरं हल्ली कुठेच जाऊ नये असं वाटतं. काय होईल ते होईल."
"पावसाने पण थैमान घातलय जणू.  माणसाला त्याच्या बेजबाबदार वागण्याच उत्तर म्हणूनच की काय पंचमहाभूतही आपली मर्यादा ओलांडू लागली आहेत. "
     बाहेर पाऊस मी म्हणत होता. हळूहळू रस्त्यावर पाणी चढू लागलं होतं . लाईट ही गुल झाले सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला.  पावसाची रिपरिप थांबत नव्हती.  मुगातांदूळाची खिचडी खाऊन आज अंमळ लवकरच निजानीज झाली.
        रात्री बाराच्या सुमारास अचानक जाग आल्याने नाना उठले बॅटरी मारून पाहिलं तर त्यांच्या बेडच्या आसपास पाणी पाहिल्यावर त्यांनी "सुनंदा अग उठ घरात पाणी शिरलं आहे ." अस म्हणत आपल्या पत्नीला उठवायला सुरू केलं.
"अग बाई खरच की पाणी आलय घरात."
दोघेही उठून तशीच बसून राहिली हतबल पणे. काही वेळातच पाण्याची पातळी वाढली. आणि बेडवर ही पाणी आल्याने आता मात्र त्यांना परिस्थितीच गांभीर्य लक्षात आलं. तश्या घरातल्या सगळ्या वस्तू होता होइतो जमिनीपासून उंचावर ठेवलेल्या असत. कारण पूर,घरात पाणी शिरण हे त्यांना नवीन नव्हतं. क्षणभर विचार करून बॅटरी एका हातात आणि दुसऱ्या हाताने सुनंदाचा हात धरून ते स्वयंपाक घराच्या दिशेने गेले. तिला ओट्यावर चढायला मदत करून स्वतः ही वर चढून बसले. घरात सगळीकडे पाणीच पाणी झालेलं. खुर्च्या,टेबल,बेड एकेक जण जलसमाधी घेऊ लागल होत. काही वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या होत्या त्याही स्थितीत नानांना हसू येत होतं ते सुनंदाबाईंकडे पाहून. स्वतःच्या दुखऱ्या सांध्यांना विसरून आपल्या काडीकाडीने जमवलेला संसार डोळ्यांदेखत पाणीमय होताना पाहताना त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या.
        पाणी मिनिटामिनिटाला वाढतच होत आणि आता तर ओट्यापाशी येऊन देखील पोहोचलं."चला आता उभं रहावं लागणार बहुतेक."
       सुनंदाबाईंना आता फार गारवा जाणवू लागला.दोन्ही हातांची घडी करून भिंतीला टेकून त्या कश्याबश्या उभ्या राहिल्या.  आपल्या खांद्यावरची शाल हळूच नानांनी त्यांच्या अंगावर पांघरली.
" अहो अस काय करता तुम्हाला गारठा बाधेल."
"आणि सांधे कुरकुरायला लागले की काय करायचं मग हे सगळं पाणी उतरलं की किती काम पडेल माहीत आहे."
"कसलं काम नि कसलं काय जगलो वाचलो यातून तर."
"इतक्यात कसले मारतोय अजून बरच जगायचं आहे सोबत आपल्याला ."
     पाणी आता गुढग्यांना टेकू लागलं. अखंड पाण्यात उभं राहून दोघेही आता कुडकूडू लागली. नकळत नानांनी सुनंदाबाईंच्या हाताला धरलेली पकड अधिक घट्ट केली.
      कानाशी हळूच कुजबुजले  "आठवतंय का ग तुला आपण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो लग्न झाल्यावर आणि येताना पावसात चिंब भिजलो. आठवलं का ?"
सुनंदा बाईंच्या डोळ्यासमोर भूतकाळाचा पडदा क्षणभरात तरळला. किती धुंद होती ती आठवण नवीनच झालेलं लग्न, आणि टुव्हीलरवरून दोघेच कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेले. दर्शन वगैरे झालं आणि परतीच्या वाटेवर मात्र अचानक वातावरण बदललं गार वादळ वार आणि त्यासोबत पाऊस, मातीचा ओला धुंद करणारा सुगंध. पावसाने चिंब भिजायला झालेलं.  आणि हळूच उबेसाठी म्हणून  गाडीवर जरा जास्तच जवळ गेल्यावर जाणवलेला उबदार स्पर्श त्यांना अजूनही आठवत होता. त्या आठवणीने त्या स्थितीतही त्यांच्या गालावर लाली आली. हळूच त्यांनी नानांच्या खांद्यावर डोक ठेवलं. नानांनीही त्यांना जरा थोपटल्यासारखं केलं. पण मनात पुढे काय हा प्रश्न होता. कारण पाणी वाढतच होत . बायकोच मनोबल टिकून राहण्यासाठी तिला गतकाळातील गोड आठवणीत काही काळासाठी नेऊन ठेवलं पण भविष्य तर काळोखात हरवून गेलं होतं.                                                      .   
पाणी आता कंबरेपर्यंत आलं होत. घर बंदिस्त दार उघडावे तर ते शक्य नव्हतं बाहेरही पाणीच पाणी. फक्त वाट पहाणे हेच हातात होत. एकतर मृत्यू किंवा पाणी ओसरल्यावर तिथून सुटका हे दोनच पर्याय होते.
         पहाटे चार वाजलेले काही वेळातच उजडणार होते. अख्खी रात्र पाण्याच्या भीतीच सावट रुंजी घालत होत. फोन लाईट सगळं बंद हातात एक बॅटरी तेव्हडी होती. ती शेजारच्या लोकांच्या खिडकीवर मारून काही मदत मिळते का हा प्रयत्न त्यांनी केला पण त्यांचीही तीच अवस्था असणार .
          आपल्या पत्नीची सांधेदुखी आणि हे ओलात उभं राहणं काय सहन कराव लागत असेल याची त्यांना कल्पना होती. आता त्याही अवस्थेत अति थकव्यामुळे खांद्याचा आधार मिळाल्याने नुकताच डोळा लागलेला. हिची ढोपर दुखत असणार पण ही सांगणार आहे थोडीच.
       हे पाणी ओसरायला हवं होत खर म्हणजे  पण ते वाढतच होते.  मुखात रामनामाचा जप सतत चालू होता कारण ती त्यांना सवय होती. त्यांनी ती लावूनच घेतली होती. आता वाचण फक्त त्याच्याच हातात आहे . ही एकच आशा होती.  आता लॉफ्ट
वर चढून बसावं की काय हा विचार त्यांच्या मनात आला पण सावित्रीबाईंना  वर कस घ्यावं हा प्रश्न होताच. 
       रामाच्या हवाली सगळ्या चिंता करून केवळ त्याच्या नामस्मरणात आपल चित्त एकाग्र करून ते पुढे जे घडेल ते पहाणे हेच हातात होत.
           बघता बघता बाहेर उजाडू लागलं नाही म्हटलं तरी पाणी वाढत नव्हतं तर ओसरू लागलं होतं. पायांना हाताला आणि साऱ्या अंगाला रग लागली होती.
त्याही परिस्थितीत आपण आणि आपली पत्नी दोघांना सावरण्याची धडपड सुरू होती. आशा एकच होती ती  सुटकेची.
       शेजाऱ्यांना कळलं होतं की दोघे आत अडकली आहेत. ते त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेल्यामुळे सुरक्षित होते. ह्यांना ही सावध करायचा त्यांनी होता होईतो प्रयत्न केला. पण ह्यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे ह्यांच काय झालं हे कळलं नव्हतं. फक्त ह्यांनी बॅटरी मारल्यामुळे जो प्रकाश दिसला त्यावरून ते किचन कट्ट्यावर असणार अशी त्यांना कल्पना आली होती.
          पाणी आलं तसच झपाट्याने उतरु ही लागलं आणि हळूहळू पूर्णपणे सगळं परत मोकळं झालं. पण जाताना असत्याच नसत करून गेलं. आठच्या सुमारास कोणीतरी येऊन दोघांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणीही हलवलं चांगले उबदार कपडे आणि पोटात गरम चहा नाष्टा गेल्यावर जरा हायस वाटलं. अनुभवलेली रात्र ही कायम लक्षात रहाणार होती. ती रात्र काळरात्र बनून आली होती. केवळ नानांसाठी नाहीतर वाशिष्ठीच्या आसपास पसरलेल्या पसरलेल्या चिपळूण शहर  आणि इतर गावांमध्ये हाहाकार मजला होता. एका रात्रीत सगळं होत्याच नव्हतं झालं होतं. सावित्री बाईंनी तर बोलणंच सोडलं होत. त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता .डोळे फक्त लेकरांच्या वाटेकडे लागले होते.
      
    
    

337 

Share


A
Written by
Archana Jog

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad