Bluepad | Bluepad
Bluepad
महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
23rd Jun, 2022

Share

महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!
सृजनाच्या सरी
निसर्ग ज्या वेळेला कोपतो त्या वेळेला तो मागचा पुढचा काहीच विचार करत नाही अन होईल त्या पद्धतीने महाप्रलय निर्माण करून या भूमीवरील मानव संपदा आणि धनसंपदा विनाशाच्या खाईत लोटतो.त्सुनामी, महापूर,अतिवृष्टी,वादळ, गारपीट अशी त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. जेव्हा अतिवृष्टी होते आणि नद्यांना पूर येतात तेव्हा महापुरात प्रचंड प्रमाणात नुकसान होते. एक महापूर क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतो. दोन वर्षापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीला आलेला महाप्रलय आम्ही पाहिला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी केदारनाथ-बद्रिनाथला आलेला महाप्रलय आम्ही अनुभवला आहे.अब्जावधीचे नुकसान होते.लाखो लोक या महापुरात मृत्युमुखी पडतात. निसर्गाच्या या संकटात सगळं काही वाहून जाते. गावेची गावे वाहून जातात ,घरे वाहून जातात ,घरातील धनसंपदा वाहून जाते ,घरातील मुलं वाहून जातात, वाड्यात बांधलेली मुकी जनावरं वाहून जातात. झाडे वाहून जातात, निर्जीव रस्ते वाहून जातात ,रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या मोटारगाड्या वाहून जातात,अन्नधान्य वाहून जाते, शेतामध्ये हातातोंडाशी आलेला शेतमाल वाहून जातो ,बरंच काही वाहून जातं, रंगवलेलं स्वप्न वाहून जातं.
एका महापुरात प्रचंड प्रमाणात जीवित हानी होते, वित्तहानी होते. लाखो नाती या पुराच्या पाण्यात वाहून जातात. कुणाचे आई-वडील वाहून जातात, कुणाची मुले वाहून जातात ,कोणाची पत्नी वाहून जाते ,कुणाचे तान्हेबाळ वाहून जाते, म्हातारे आजी-आजोबा वाहून जातात. क्षणात पत्त्याच्या इमारती प्रमाणे गावातील बंगले कोसळतात. सरकारची आणि लोकांची धावाधाव सुरू होते. शहरं आणि गावं पाण्याखाली येतात. नेमके काय करावे हे कोणाला काही कळत नाही.
अशा महाभयंकर परिस्थितीत मात्र धर्म,जात, पंथ ,वर्ण भेद, लहानपणा- मोठेपणा सर्व विसरून काही मानवतावादी मात्र माणुसकीचा हात देऊन वाहून जाणाऱ्याला वाचवतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तेथे देवाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. एक मनुष्य जेव्हा दुसर्‍या अनोळखी माणसाच्या मदतीसाठी धावून जातो, त्या वेळेला तिथे दिव्यत्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. कोणी वाहत्या जीवाला वाचवतो. कोणी वाचवलेल्या जखमी झालेल्यांना वाचवतो. कोणी गुराढोरांचे रक्षण करतो. कोणी अन्नधान्य पुरवतो तर कोणी आरोग्य सुविधा पुरवतो. उपाशीतापाशी पोटाला दोन घास भरविण्यासाठी दहा हात पुढे येतात. हा महापूर जेव्हा घरं तोडायला पुढे येतो ,त्या वेळेला दुसरा एक माणूस माणूस म्हणून जोडायला पुढे येतो. महापुरात माणसाने जपलेली माणुसकी हाच खरा धर्म आम्हाला बरेच काही सांगून जातो.
महापुरे झाडे जाती!
तेथे लव्हाळे वाचती!
असे संत जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. या पुरात मोठमोठी झाडं वाहून जातात. वादळातही मोठी झाडं उन्मळून पडतात. मात्र पाण्यातील लव्हाळे आणि जमिनीवरील लहान लहान झाडंझुडपं मात्र शिल्लक राहतात. कारण त्यांच्यात लवचिकता असते ताठरपणा नसतो. लवचिकता हे मनुष्य जिवंतपणाचे लक्षण आहे. लवचिकता माणसाची प्रीती आणि ख्याती वाढवते. लवचिक माणसाचे जीवन आनंदमय आणि सुखमय असते. वादळात किंवा महापुरात मोठमोठाली झाड उन्मळून पडतात ,वाहून जातात.त्या तुलनेने लहान झाड काही क्षणात पुन्हा उभी राहतात. या मागचे कारण त्यांचा आवाज भव्य आकार नसून त्यांच्यामध्ये लवचिकता असते.
आपल्या जीवनात ही अशीच महापूरासारखी महाभयंकर संकटं येतात त्यावेळेला काही लोक खचून जातात. तर काही लोक या संकटातून मार्ग काढून पुन्हा उभी राहतात. परिस्थितीनुसार जीवन जगायचे ही कला ज्यांनी आत्मसात केली तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही.
मानवी जीवनात अशा काही घटना घडतात की मनुष्य हा शिक्षणाने ,संपत्तीने ,पदाने जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्यात अहंकार निर्माण होतो. अभिमानी अहंकार मीपणाला आमंत्रण देतो. बऱ्याचदा मीपणा आला की अशा व्यक्तीला विविध संकटांना सामोरे जावे लागते. होत्याचे नव्हते होते.
म्हणूनच या संसार रुपी भवसागरातून आपल्याला तरुन जायचे असेल तर विनम्रता अंगी असावी. विनयशीलता माणसाला माणूस म्हणून जीवन जगायला मदत करते.
संत म्हणतात, नम्र झाला भुता!तेणे कोंडले अनंता!!
किंवा
लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!!
येऊ द्या जीवनात संकटरूपी कितीही महापूर ...या महापुरात आम्ही लव्हाळ्यांसारखे लवचिक राहून पुन्हा एकदा ताठ मानेने उभे राहू या!

245 

Share


श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
Written by
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad