विद्या विनयेन शोभते!
लेखक ऑफ द वीक
विद्या ददाति विनयम्!
विद्या विनयेन शोभते!!
असे संस्कृतचे सुप्रसिद्ध वचन आहे. याचा अर्थ विद्या ही मनुष्याला विनय प्रदान करते आणि विद्या हीच विनयाने सुशोभित होते. अगदीच लहानपणापासून शाळेच्या भिंतीवरील हा सुविचार जणू शब्द अलंकार आहे. अंगी कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतानाही ज्ञानवंत मनुष्य हा खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन जगत असतो. नेमके आज काल काय झाले आहे की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारी माणसं थोडासाही पैसा आला किंवा थोडेसे ही ज्ञान मिळाले की अहंकारात बुडून जातात. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ असा गर्विष्ठपणा चा अहम आणि वहय त्यांच्यात निर्माण होतो. मी एकमेव श्रेष्ठ असून जगातील सगळे लोक माझ्यापेक्षा लहान आहे हा अहंकार माणसाला रसातळाला नेतो. सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे एका ठिकाणी म्हणतात,ज्या वेळेला आपण कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात पडतो त्या वेळेला शरीर तर निमित्तमात्र असते परंतु खरा गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता ही तर माणसाच्या स्वभावात असते. अशा स्वभावातूनच त्या माणसाला आपण जवळचे करतो आणि त्याची संगत जर मिळाली तर ती आपल्याला हवीहवीशी वाटते.हे अगदी खरे आहे.
माणसाने सदासर्वदा धनाची श्रीमंती असो किंवा ज्ञानाची श्रीमंती असो नेहमी विनयशील राहिले पाहिजे. विनय हा एक सद्गुन आहे आणि विनयशीलता म्हणजे ज्ञान होय. या जगात वावरत असताना लोक तर राजाला सुद्धा नावे ठेवतात इतकेच काय देवाला सुद्धा नावे ठेवायला लोक मागे पुढे पाहत नाही. म्हणून आपल्याला जरी कोणी नावे ठेवले तरी आपण नेहमी लोकांचा आदर करावा. आपल्या अंगी विनयशीलता असेल तर ते चांगल्या माणसाचे लक्षण आहे. माणसाने नेहमी नंबर किंवा विनयशील असणे म्हणजे हा त्याचा कमीपणा नसतो तर ती एक प्रकारची मोठी दैवी संपत्ती असते. ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान नसून विष आहे. परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता आणि विनयशीलता जन्म घेत असेल तर ते ज्ञान खऱ्या अर्थाने अमृत होय. विनयशील रुपी अमृत्कुंभ आपल्याजवळ असेल तर जग आपल्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही.
संस्कृत मध्ये एक सुंदर असे सुभाषित आहे.
दूष्कुलम चापी विदुषी देवैरपि ही पुज्यते!
याचा अर्थ मनुष्य कोणत्याही सामान्य कुळात किंवा परिवारात जन्माला आला असला परंतु तो ज्ञानी ,विद्वान ,सुशिक्षित, सुसंस्कारित ,बुद्धिमान, शीलवान, नीतिवान, विनयशील असेल तर देवतांकडून सुद्धा त्याचा सन्मान आदर कौतुक आणि पूजा केली जाते.
संत कबीरदासजी महाराज एक सुंदर असा दोहा आम्हाला सांगतात. महाराज म्हणतात,
ऊँचेपानी ना टिके , नीचे ही ठहराय |
नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय ||
कबीर महाराज सांगतात की मनुष्याकडे नम्रता हा गुण असेल तर तो सोन्याच्या दागिन्यांनीही शोभून दिसत नाही त्याहून अधिक पटीने तो नम्रता या दागिन्याने मनुष्य शोभून दिसतो. नम्रता अंगी बाळगल्याने प्रत्येक काम होते. त्यांनी यासाठी एक उदाहरण येथे या दोह्यामध्ये दिलेले आहे. एखाद्या उंच स्थानी पाणी कधी ही टिकत नाही. पाणी हे कधीही उताराकडेच पळते. मग हे पाणी पिण्यासाठी तुम्हाला खाली वाकूनच पाणी प्यावे लागेल .जर तुम्ही ती नम्रता अंगी नाही घेतली तर तुम्हाला तहान तशीच मारावी लागेल. तुम्हाला पाणी पिण्यासाठी मिळणारच नाही. नम्रतेने मनुष्याचे प्रत्येक काम होते.
याचा अर्थ असा आहे की मनुष्याच्या बोलण्यात गोडवा, वागण्यात विनयता आणि शुद्धता असायला पाहिजे. जर अशी नम्र विनंती माणसाजवळ नसेल तर तो कितीही विद्वान झाला आणि त्यांनी कितीही पदव्या प्राप्त केल्या, ब्रह्मज्ञानानेयुक्त कितीही ग्रंथ लिहिले तरी समाज त्याला मान्यता देत नाही. माणसाची विद्वत्ता ही त्याच्या श्रीमंतीत, गाडी किंवा बंगल्यात नसून ती त्याच्या विनयशील वृत्तीत आणि भाषिक सौंदर्यात दडलेली असते. म्हणूनच मनुष्य खऱ्या अर्थाने नम्रता नामक सुंदर सालंकृत असेल तर त्याचे जीवन हे उच्च असते. कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा गर्व नसलेला मनुष्य हा नेहमीच समाजात प्रिय असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्ञान आणि नम्रता यांचा सुरेख संगम म्हणजे माणसाने प्राप्त केलेले खरे शिक्षण होय. नम्रतेची शिवाय ध्यानाला शोभा येत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की शिक्षणाच्या मुळाशी विनय येता असते. विनयशील आणि नम्र जीवन मनुष्याला उच्च पदावर नेण्याचे सामर्थ्य ठेवते. नम्र भाव असून प्रेमळ वृत्ती अंगी जर असेल तर ती व्यक्ती लोकप्रिय झाल्याशिवाय राहत नाही. आत्यंतिक प्रेमामुळे लोक या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात प्रेम अर्पण करतात. आणखी महत्त्वाचे म्हणजे विनयशील ते मुळे किरकोळ स्वरूपाचे मतभेद असतील तर ते दूर होऊन त्या ठिकाणी प्रेमभाव निर्माण होतो.
म्हणून पाण्याच्या बुडबुड्यासारखे जीवन असलेल्या मानवी व्यवहारात नेहमी नम्र अभाव असला की त्याची सर्वत्र पूजा होते.