कवितेला बोलायचं असतं
काहीतरी सांगायचं असतं
शब्दांना फुटतो उमाळा
कागदांना भिजायचं असतं
अस्वस्थ करणाऱ्या अवकाशाच्या
प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं
निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांना
हृदयाला पोहचायचं असतं
चिडायचं असतं कुणावर
कुणाशी भांडायच असतं
मोगऱ्याच्या कोवळ्या कळ्यांना
केसात जाऊन बसायचं असतं
भोगलेल्या पोळलेल्या क्षणांना
सोसलेल्या वेदनेला कन्हायचं असतं
भारलेल्या गंधाळलेल्या अत्तरांना
कुपीतून सांडायचं असतं
कुणाच्या जगण्याला बळ द्यायचं
रोपट्याला बहरायचं असतं
कुणाच्या असण्याला अर्थ द्यायचा
नसण्याला विसरायचं असतं
कधी शांततेचे वारे, तापलेले निखारे
दाबलेल्या हुंदक्यांना गायचं असतं
बदलत्या जगाची बदलती गणिते
नव्या सूत्रांनी सोडवायचं असतं
© संदीप विष्णू राऊत, बुलडाणा