दिनेश राणे हा एका गावात राहणारा कॉन्ट्रॅक्टर. मुख्यतः घर बांधून देणे हे त्याच काम. गावातील बरीचशी घरे त्याने बांधली होती व बाहेरची काम पण तो घेत असे. पण एकदा अस झालं की त्याने बांधलेलं एक घर पावसात कोसळलं. दिनेशला मात्र वाटू लागले की त्याच्यामुळेच घर कोसळले. त्याने नीट बांधकाम केले नाही म्हणून अस झालं.
याचा परिणाम असा झाला की तो पुढे नवीन काम तो घेईनासा झाला. त्याच्या मनात ही एक गोष्ट बसलेली होती आणि त्यामुळे त्याला अस वाटत होत की परत मी घर बांधून दिलं तर कोसळेल, खराब होईल. म्हणून तो कामालाच जात नव्हता. तो खूप दिवस असाच घरात बसून होता म्हणून त्याचा मित्र जो त्याचा सहकारी होता तो त्याला भेटायला आला.
त्याने दिनेश ला काम न करण्याचे कारण विचारले तेव्हा दिनेश म्हणाला, "मी काय म्हणून नवीन घर बांधून देऊ? पाहिलस ना मी आधी जे घर बांधून दिले त्याची की अवस्था झाली पावसात? माझ्यामुळे त्यांचे किती नुकसान झाले. मी काही परत हे काम करणार नाही. परत काही वाईट घडले तर मीच दोषी होणार."
त्यावर त्याचा मित्र म्हणाला, "अरे दिनेश, तू स्वतः म्हणतोस की त्यावेळी पाऊस होता आणि तू ज्या घराबद्दल बोलत आहेस त्याला बांधून पण तशी बरीच वर्ष झाली होती आणि हे एकच घर नाही जे पावसात कोसळलं अशी अनेक घर आहेत ज्यांची थोडीफार पडझड झाली. मग तू एकटाच कसा दोषी होशील सांग पाहू? या सर्व गोष्टींचाही तू विचार केला पाहिजे."
"अजून एक गोष्ट जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण खराब झालेली, तुटलेली वीट वापरतो का?" दिनेश म्हणाला नाही. मित्राने याचे कारण विचारल्यावर दिनेश म्हणाला, "आपण घराचा पाया या तुटक्या विटांच्या आधारे बांधला तर घर कसं नीट तयार होईल लगेच कोसळेल." त्याच्या या बोलण्यावर मित्र म्हणाला, "अगदी बरोबर! जस तुटक्या विटांवर घर नीट उभारल जात नाही. तसच तु जे काही विचार करत आहेस त्यातून काही चांगल होतय का? हे अस डोक्यात घेऊन की परत मी बांधलेले घर तुटणार, तू नवीन काम घेतलच नाही. यातून काही चांगल झाल का? "
दिनेश ने यावर विचार केलाच नव्हता. तो तर फक्त स्वतः ला दोष देत बसला होता. तेही त्याची पूर्णपणे चूक नसताना. पण आता मित्राने हे सर्व सांगितल्यावर त्याला याची जाणीव झाली व तो काही दिवसांनी पुन्हा त्याच्या नवीन कामाला लागला.
आपल्या आजूबाजूलाही अनेकदा अशा काही गोष्टी घडत असतात ज्यामधे आपण स्वतः ला जास्त काही संबंध नसताना दोष लावत बसतो. पण अस न करता त्यावेळी आणि काय काय झालं होत तेही विचारात घेतलं पाहिजे आणि आपल्या विचारांची बांधणी नीट केली पाहिजे.