कशी काळनागिणी,सखे ग वैरीण झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरी,अफाट वाहे मधी
ही भा.रा.तांबेंची कविता पूराचे यथार्थ वर्णन करते. खरंच पावसाळा कितीही आल्हाददायक, हवाहवासा वाटला तरी अति सर्वत्र वर्ज्यते या उक्तीप्रमाणे पाऊस छान असतो,वाटतो पण पूर म्हणजे परिक्षा. पुरामुळे कित्येकांचे नुकसान होते,संसार वाहून जातात. होत्याचे नव्हते होते. पुराच्या पाण्यात जनावरे,गुंर-ढोरं, वाहने आणि मुख्य म्हणजे माणसं वाहून जातात गावच्या गावं ओस पडतात.
पावसाचे रौद्ररूप पूरात रुपांतरीत होते आणि माणसांना संकटाशी सामना करायला सोडून देते. पुढे कित्येक वर्षांनंतर माणूस पूर्ववत उभा राहतो.मधल्या काळात तो बराच झगडतो.पूराचे पााणी शेतात,घरात शिरु लागल्यावर आपला जीव वाचवण्यासाठी आवश्यक त्या वस्तू,सामान डोईवर घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतो.अशी जीवन जगण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहतो.
पूराचे पाणी ओसरुन गेल्यावर जीव वाचला हेच एक समाधान असते. अन्यथा पुनर्वसनाचे मोठे प्रश्नचिन्ह आणि इतर अनेक समस्या आ वासून समोर उभ्या टाकतात.तेव्हा कालपरवा पर्यंत हवाहवासा वाटणारा पावसाळा नकोसा होतो.