पूर म्हणजे गावात आलेले नद्यांचे पाणी, पूर म्हणजे घरांचे नुकसान, पूर म्हणजे मानवाची जीवितहानी, पूर म्हणजे निसर्गाचा कोप, पूर म्हणजे सर्वकडे दुष्काळ असे अनेक कारणे आहेत पूरामुळे निर्माण होणारी. कारण जेव्हा पूर येतो तेव्हा नद्या, समुद्र तुडुंब भरून वाहतात आणि ते पाणी गावात शिरून गावाचे नुकसान करतात
मला आठवतोय तो दिवस, खूप वर्षांपूर्वी म्हणजे 1989 साली रोहा अष्टमी येथे आलेला तो पूर! माझे वडील तेव्हा रोहा येथे बॉम्बेडाइंग या कपड्याच्या मोठ्या कंपनी मध्ये कामाला होते. दमखाडी रोहा येथे आमची एक छोटी रूम होती.चार खोल्यांची एक चाळ होती ती. ते पावसाळ्याचे दिवस होते. आणि पावसाळ्यात नेहमी रोहाच्या जवळ असणारी नदी भरून ते पुराचे पाणी संपूर्ण रोहा शहरातील जवळच्या गावात शिरकाव करायचे. खरं तर पूर येण्याची कारणे पण तशीच आहेत. सर्वानी जिकडे तिकडे पाणी येण्याच्या जागेवर भराव केले होते. त्यामुळे ते पाणी वाट दिसेल तिकडे घुसत होते. आमची रूम खालीच असल्याने पाणी आत रूम मध्ये यायला लागले होते. तेव्हा आमच्या बाजूला असणाऱ्या स्थायिक लोकांनी आमच्या चारही रूम मधील सर्वांना त्यांच्या बंगल्याच्या माडीवर राहायला सांगितले. कारण पाणी रूम च्या छताला लागले होते. आमच्या सर्व रूम बंद करण्यात आल्या होत्या. दोन दिवस पाणी कमी व्हायचे नाव नव्हते. त्या दोन दिवस आम्हाला सर्वांना चांगलाच उपवास घडला. नाही बोलायला त्या दोन दिवसात सरकार कडून हँलीकॅप्टर ने लोकांपर्यंत काही ना काही खाऊ मात्र पुरवला जात होता.
रस्त्यावरील गाड्या देखील पुराच्या पाण्यात वाहून जात होत्या. खूप गाड्यांचे नुकसान झाले होते. तर जी माणसे पुराच्या पाण्यात अडकली होती त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होते. गावातील काही तरुण मुले आणि सरकारची माणसे ही शक्य होईल त्या परीने या लोकांना वाचवण्यासाठी धडपड करत होते. सर्व कडे एकच चर्चा होती की, रोहा आणि नागोठणे वाहून गेले. पण अखेर दोन दिवसांनी पूर ओसरला आणि लोकांच्या जीवात जीव आला. जेव्हा पाणी सर्व कमी झाले तेव्हा आम्ही आमची रूम उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्या पाण्यामुळे घरातील सर्व सामान कपाट वैगरे हे दरवाजावर येऊन बसले होते. आणि आतील सर्व सामानाची व अन्य धान्याची नासाडी झाली होती. हा पुराचा अनुभव आम्हाला चांगलाच महाग पडला.
पुरामुळे उपवास घडला,
एक मोठा अनर्थ टळला......
नासुन गेले अन्यधान्य,
आम्ही मात्र झालो शून्य.......
गाड्या, घरांची लागली वाट,
सर्व जण फिरू लागले मोकाट.......
नद्या सर्व पुराने वेढल्या,
जमिनीही तेथे पाण्याने गाढल्या.....