चाहूल लागताच तिच्या येण्याची
आनंदाच्या जागी शांतता भासली
गोडकौतुक राहिलेच बाजूला
का तर ती मुलगी आहे हो..
जिथे आशा होती आशीर्वाद आणि प्रेमाची
कुचकट बोलणी पडली पदरी
गाव निमंत्रण तर राहिलेच बाजूला
का तर ती मुलगी आहे हो..
शाळा शिकण्याची काय गरज
फिरण्या बागडण्याची, मौजेची काय गरज
शिकून तर संसारच पाहायचा आहे
का तर ती मुलगी आहे हो..
पदोपदी भेदभाव भासत आहे
हळूहळू ती लहानगी मोठी होतेय
बाहेर फिरणे मोठ्याने हसणे शोभत नाही हो
का तर ती मुलगी आहे हो..
सगळी बंधने , कर्तव्य फक्त तिच्यासाठीच बांधली
काय फक्त एका पिंजऱ्यात कोंडण्यासाठी ती जन्मली
एकीकडे स्त्री शक्तीची पूजा तर एकीकडे अन्यायी वागणूक
का तर ती मुलगी आहे हो..
तिच्याशिवाय सृष्टी नाही खरच नाही का कळत
तिने घेतलेली झेप उंच आकाशी नाही का दिसत
तिचे कर्तृत्व तिचा सन्मान सगळ काही शून्य
का तर ती मुलगी आहे हो..
पाऊलापावलांवर संघर्ष तिचा अस्तित्व उमटवण्याचा
स्वतःस सिद्ध करून नाव टिकविण्याचा
वाट पाहतेय ती तिच्यावरचे अत्याचार संपण्याची
मोकळेपणाने न घाबरता बाहेर फिरण्याची
आस आहे तिला कोणीही तिच्यावर प्रश्न नाही करणार
का तर ती मुलगी आहे म्हणून हो.......
- सिध्दी📝