Bluepad | Bluepad
Bluepad
माळकरी
Sachin Deulkar
Sachin Deulkar
22nd Jun, 2022

Share

ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या स्पर्शाने पावन झालेली तुळशीची माळ, फडप्रमुख गुरूसमोर होऊन गळ्यात घालून घेतली की, वारकरी संप्रदायाचा दीक्षाविधी पूर्ण होतो. *परंतु त्या माळक-याचा गळा साक्षात ज्ञानोबांच्या साक्षीने व विठ्ठलाच्या जयघोषाने,परमार्थात गुंतून पडतो.* हे प्रथम लक्षात घ्यावे.
तुळशीची माळ गळ्यात घालणे याचा गूढार्थ,आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्वावर तिलांजली देऊनही पंढरीची पायवाट,ती वारी,ती आषाढी-ती कार्तिकी चुकवायची नसते हा असतो...
*गेली हजारभर वर्षे हा वारकरी संप्रदाय जो सातत्याने जयिष्णू व वर्घिष्णू स्वरूपात विशालरूप धारण करताना दिसतो आहे, त्याचे रहस्य हे असे तुळशीच्या माळेत गुंतलेले व दडलेले आहे.*
वारकरी भक्ताने गळ्यात तुळशीचीच माळ का घालायची? रूद्राक्षाची का नको? सोने,रूपे, स्फटिक,पोवळे,मोती,पुत्रवंती, अशा आणखीही अनेक प्रकारच्या माळा,वेगवेगळ्या कामनापूर्तीसाठी वापरण्याची पद्धती असते.परंतु वारकरी संप्रदाय केवळ तुळशीच्या माळेलाच प्राधान्य देतो.त्याचे कारण काय असावे?
*तुळस म्हणजे मूर्तिमंत सात्त्विकता.तिचे दर्शनही सुखावह असते.तिचा स्पर्शसुद्धा प्रचंड ऊर्जा देतो.तिच्या नुसत्या अस्तित्वानेही वातावरणात शुद्धतेचा प्रवाह वेगाने प्रवाहित होऊन मन प्रसन्न व आनंदित होते.*
माळकरी
भारतीय संस्कृतीने तुळशीशिवाय इतर कोणत्याही लहान-मोठय़ा वनस्पतीला दैनंदिन पूजेचे-देवतेचे स्थान दिलेले नाही.
नास्तिकाला आस्तिक व अश्रद्धाला सश्रद्ध करण्याचे प्रचंड व अनुभूत सामर्थ्य फक्त आणि फक्त तुळशीतच असते,याची जाणतेपणी व साक्षेपाने नोंद घ्यावी.वड,पिंपळ व औदुंबर हे वृक्षही देवतुल्य मानले जात असले तरी,तुळशीचा दर्जा त्यांना नसतो.
शिवाय तुळस,तिचे रोप,तिचे दर्शन हे ‘सर्वजनसुलभ’ व कोठेही सहज उपलब्ध असणे हा आणखी एक तिचा विशेष.
ज्याच्या घरात,कुंडीत,बागेत तुळस व गळ्यात माळ असते.तो मनुष्य कितीही तामसी,क्रोधी, विकारवश असला तरी, तो हळूहळू क्रमश: पण निश्चितीने शांत-उपशांत,सात्त्विक,प्रसन्न, तृप्त व समाधानी झालाच पाहिजे असा आजवरचा अनेकांचा प्रत्यक्षानुभवच आहे.
सहज साध्या-सोप्या गोष्टींपासून अतिशहाणपणापायी लोकांनी आपले नुकसान व अकल्याण करू नये,म्हणून मुद्दाम हा येथे हितोपदेश केला आहे,याची नोंद घ्यावी.
वारी हे जसे साधन असते, तसेच तुळशीची माळ गळ्यात घालून घेणे हेही साधनच असते.
*माळ घातली की कृतार्थता येत नाही की,महामंत्राचा माळेवर जप केल्याने लगेच विठ्ठलदर्शनही होत नाही व होतही नसते.*
परंतु या साधनांमुळे व साधनामागार्मुळे, मनुष्यजन्माचे, ‘याचि देही याचि डोळां।’ सार्थक केलेच पाहिजे,.
आपण मनुष्य असून मनुष्यधर्माने वागून सतत व अखंडितपणे सत्कर्म-सत्कार्य केलेच पाहिजे, अशी सत्प्रेरणा मात्र निश्चित होते, याचे स्मरण असो द्यावे. *गळ्यातील तुळशीची माळच त्या सश्रद्ध वारक-याला प्रेरणा देते.*
*होईन भिकारी। पंढरीचा वारकरी।।*
*हाचि माझा नेमधर्म। अवघे विठोबाचे नाम।।*
||राम कृष्ण हरी||

190 

Share


Sachin Deulkar
Written by
Sachin Deulkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad