काळा रंग अशुभ मानतात तरीही हल्ली काळया कलरचे कपडे घालण्याचा ट्रेंड आहे त्याच्यामुळे माणूस उठावदार दिसतो पण त्या माणसाचा रंग मात्र काळा नको तो मात्र गोरा हवा .पुरुष असो किंवा स्त्री असो वर्णभेद कायमचा आहे.
आपल्या महान भारतात जेव्हा इंग्रज आले ना तेव्हा त्यांच्या गोऱ्या गोऱ्या रंगाकडे बघून भारतीय इतके पछाडले गेले की ब्रिटिशांना जाऊन काळ लोटला पण आपल्या गव्हाळ भारतीय रंगाला दुय्यम दर्जा देण्यात कोणी कमी नाही .
काळा गोरा हा भेद च मुळी अमानुष आहे. कोणाला कोणत्या रंगाचे जन्माला यावे हा कोणी स्वतः किंवा कोणाचे आई वडील किंवा कोणतीच ठरवू शकत नाही.
आपल्याकडे गो-या रंगाला खूपच महत्त्व दिले जाते. मूल गोरंच जन्माला यावं, बायको गोरीच हवी, चारचौघात आपण गोरेच दिसायला हवे ही सर्वाची अपेक्षा असते म्हणूनच तर बाजारात अशी गोरी करणारी बरीच क्रीम उपलब्ध आहेत स्त्रियांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण.. लग्नाच्या बाजारात रंगाने सावळी मुलगी म्हणजे वराकडच्या लोकांना गरिबी दूर करण्याचे माध्यम वाटते. सावळी असण्याचा मुलीच्या लग्नासाठी आई-वडिलांना मोठा हुंडा मोजावा लागतो.
गुणाने उजवी, प्रेमळ, घरकामात चलाख, सुशिक्षित, नोकरी करणारी असले कोणतेही गुण रंगाच्या स्पर्धेत गौण ठरतात. मुलगी नाकीडोळी सुरेख असेल, उंची व्यवस्थित असेल तरी रंग आधी पाहिला जातो.
‘‘काय भुललासी वरलिया रंगा’’ असे संतांचे उपदेश असले तरी हे उपदेश तोंडी लावायला आणि माना डोलवायला वापरले जातात. प्रत्यक्षात वरलिया रंगालाच जग भुललंय. नुसतं भुललंय नाही, तर या गो-या रंगाच्या अपेक्षेत-इच्छेत गुरफटलंय. यामुळे कितीतरी खरच गुणी असणा-या उच्च वर्तन मूल्य असणा-या, उत्तम गृहिणी होण्यासाठी, उत्तम आई होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण असूनही केवळ रंग काळा-सावळा या कारणाने अवहेरलेल्या मुली पाहून मन विदीर्ण होते. मुलगा काळा, नकटा, बुटका असला तरी आणि व्यसनी असला तरी त्याचे लग्न जमताना अडचणी कमी येतात आणि त्यालाही गो-याच बायकोचे स्वप्न पडते.
याला कारण आपण सर्वचजण. सर्वाचीच सदोष दृष्टी आणि अयोग्य विचार शैली. गुणापेक्षा रूपाला प्राधान्य देण्याची वृत्ती. बाह्य सौंदर्य कायमस्वरूपी टिकत नाही. काळाबरोबर शरीराचे अवस्थांतर होणारच. वेळ प्रत्येक टप्प्याच्या प्रवासात शरीराला कणाकणाने कमजोर जीर्ण, शक्तीहीन करणार. रंग जळून जाणार, केस, दात, शारीरिक आखिव-रेखीवपण कमी-कमी होत जाणार, हे मान्य व्हायला हवे. काळानुरूप वाढणारे, बहरणारे मानसिक सौंदर्य, विचारांचे धन, नात्यातला जिव्हाळा, जिभेतला गोडवा आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणार आहेत. जीवनाची कहाणी सुफळ संपूर्ण करणार आहेत. याचे भान असायला हवे.
माणसात देव शोधायची आपली संस्कृती आहे. म्हणूनच माणसात राम, गोपाळ, विठ्ठल, काळुबाई नाव देऊन देवांची नावं रुजवतो. जग देवांचे गुण आणि रंग का स्वीकारत नाही. श्यामवर्ण तो हरी.. त्याला काळा नाही म्हणायचे, सावळा विठ्ठल तो काळा विठ्ठल होत नाही. काळी आई तर काळजाच्या अगदी जवळ असते, पण काळी मुलगी नको वाटते. काळे मेघ मनावर मोहिनी घालतात. काळी रात्र हवीहवीशी वाटते. डोईवर केस काळेच असण्याचा कोण अट्टहास माणसांना. काळे नयन घायाळ करायला असावेत, पण त्या काळ्या पाषाणाच्या हृदयाला उपमा देताना काळा रंग नको वाटत नाही आणि आता.. या क्षणी पांढ-या कागदावर काळ्या शाईत असलेली अक्षरे वाचताना किंबहुना कायमच पुस्तक, वर्तमानपत्रातील काळ्या शाईने छापलेले शब्दामृत काळ्या डोळ्यांनी शोषून घेताना याच काळ्या रंगाची कधी जाणीवही झालेली नसते.
मग माणसांचा काळा रंगच डोळ्यांना का खुपतो. यात त्या माणसाचा काय दोष. उंची, रंग, चेह-याची ठेवण. या गोष्टी नैसर्गिक असतात. नैसर्गिक गोष्टी त्या विधात्याच्या अख्यात्यारीत असतात. त्याने निर्मिलेल्या निर्मितीचा अपमान करून आपण त्या निर्मिकाचा अपमान करत नाही का? दोष नसताना एखाद्याचा इतका छळ करायचा की, शेवटी छळाला कंटाळून त्यानेच गुन्हा कबूल करावा आणि म्हणावे मी काळा/काळी आहे बरं का?
तरी हल्ली बर्यापैकी काळी असो सावळी असो.... तर ती काळी किंवा ती सावळी ग... यांना समाजामध्ये एक्सेप्ट करून घेतलेल आहे आणि त्यांना मॉडेलींग क्षेत्र म्हणा अभिनय क्षेत्र म्हणा त्याच्यामध्ये वरचे स्थान दिले जात आहे. ही एक प्रकारची क्रांतीच आहे पण तरी लग्नाच्या बाजारांमध्ये मात्र त्यांचं स्थान नेहमीप्रमाणेच दुय्यम दर्जाच आहे.
तर असो सध्या एव्हढ्यावर खुश व्हावे काळया वर्णाच्या लोकांनी.
हम काले है तो क्या हुआ दिलवाले है