शांत हो किती धडपडशील कशासाठी हा अट्टहास
भूतकाळाच्या इंगळ्या. डंख मारून मारून रक्तबंबाळ करत आहेत अरे
त्या जीवघेण्या वेदना तो त्रास होतोय का सहन
वर्तमानही हवा तसा प्रतिसाद देत नाहीये
आणि भविष्य अरे काय शोधतो आहेस मृगजळ आहे रे ते
वर्तमानच स्थिर नाहीये तर भविष्याचे धागेदोरे कसे सापडतील
परिस्थितीचे हिंस्र श्वापद कधीही झडप घालेल अरे
मग काय होईल मृत्यू छे एवढ्या सहजासहजी सुटका नाहीये
ते ढकलून देईल तुला काळ्याकुट्ट अंधारात
अंधाराची भीती नाही वाटत
अरे तो अंधार आहे नैराश्याचा ती गुफा आहे नैराश्याची
तो बघ अति विचारांचा राक्षस आ वासून उभा आहे
त्या गुफेला शेवट नाही तो प्रवास संपणारच नाही
मग होईल अवस्था अश्वधाम्या सारखी
रक्तबंबाळ झालेले शरीर घेऊन फक्त जिवंत प्रेत होऊ होऊन जगणे
कधी होईल याचा शेवट येईल का कृष्ण म्हणेल का पार्थ
नाही येणार कृष्ण नाही म्हणणार पार्थ का?
कारण तू कर्ण आहेस होय कर्ण च आहेस तू
प्रचंड ताकद आहे तुझ्यात असामान्य कौशल्य आहे
गरज आहे फक्त ते सिद्ध करून दाखवण्याची
कोणाला अरे कोणाला काय स्वतःलाच
कशाला हवेत दुर्योधनाचे उपकार नकोच
इथे कोणीच नाहीये अर्जुनही नाही आणि कृष्णही नाही
कौरव नाहीत आणि पांडव ही नाहीत
हे महाभारत तुझ आहे
त्या कुरुक्षेत्राच्या मैदानात तुझी लढाई तुझे युद्ध तुझ्याशी च आहे
तुझा शत्रू तूच आहेस आणि मित्रही
जिंकणार आहे तूच आणि हरणार ही तूच आहेस
पण तुला हरायचं नाहीये
तुला जिंकायचा आहे आणि स्वतःचा स्वतंत्र साम्राज्य उभा करायचा आहे
तुला जिंकावच लागेल होय तुला जिंकावच लागेल.