Bluepad | Bluepad
Bluepad
भक्तीचे वर्म
Sharad
Sharad
22nd Jun, 2022

Share

■ तुका म्हणे....
भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती ।
तया घरी शांती क्षमा दया ।।
■भक्ती हा विवेकाचा मार्ग ....
____________________________
◆ विवेक म्हणजे निवड. ज्ञानेश्वर त्यास ‘वेगळीक’ म्हणतात . आद्य शंकराचार्य त्यास ‘वैलक्षण्य’ म्हणतात . विवेक म्हणजे सारासार विचार, योग्य-अयोग्य याची समज , विवेकबुद्धी . या विवेकातून आलेले परमार्थप्रेम , जवळीक, ती भक्ती होय. ...
◆ श्वेताश्वतर उपनिषदामध्ये भक्तीची व्याख्या ‘सहभाग, समर्पण आणि कोणत्याही प्रयत्नामध्ये असलेली आत्मीयता’ अशी केली गेली आहे. भक्ती ही मूलत: विवेकविचार आहे. किंबहुना, भक्ती साध्य करायची तर व्यक्तीच्या ठायी विवेक असायला हवा. ‘‘बहेणि म्हणे भक्ति साधावया एक। पाहिजे विवेक पूर्ण देही।।’’ भक्तीची परिणती विवेकामध्ये व्हावी, अशीच तुकोबांचीही अपेक्षा आहे.
‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा।।’
◆ आपल्या प्रत्येकाच्याच अंत:करणात असणाऱ्या विवेकाकडे गुरुपद सोपवायचे आणि आपल्या चित्ताला त्याचे शिष्यत्व पत्करायला लावायचे, अशी ही सोपी हातोटी आहे. तुकोबांनी त्यांच्या जीवनचरित्राद्वारे तेच सांगितले आहे.
◆ बुद्धी व श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे आहे. संतांनी भक्तीला सामाजिकतेचे अधिष्ठान दिले. संत कृतीप्रधान भक्तियोग जगले. त्यांची भक्ती ही जीवनदायी, जीवनोपयोगी होती. त्यांनी भक्तीला कर्म-ज्ञानाचे , विवेकाचे अधिष्ठान दिले. विवेक असेल घरात सुख शांती अनुभवता येईल.
नेमक्या या विवेकाची आपल्या जीवनात वानवा आहे. विवेकशून्य धार्मिक दांभिकता हा जीवनमार्ग होत आहे ही खंत आहे..
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे,
काय म्या पामरे जाणावे हे
ह. भ. प. शरद महाराज जोंधळे (कोल्हापूर)

168 

Share


Sharad
Written by
Sharad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad