आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे, असे अनेक लोक अनेक ठिकाणी मोठ्या अभिमानाने सांगतात. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे अनुभवी लोकांचे बोधपर वचनही प्रसिद्ध आहे. पण आज प्रत्यक्षात असं दिसतय का? तर नाहीच. दुर्दैवाने आज वरील सद्वचन पूर्णपणे उलटे-पालटे झाले आहे.
एक गावकरी स्वत:च्या मुलांबद्दल सांगत होता. त्याचा मोठा मुलगा खूपच हुशार होता. त्याला जिल्हा कार्यालयात नोकरी मिळाली. गावकरी मोठ्या अभिमानाने गावात सांगत होता, " अहो, पगाराच्या तिप्पट त्याची वरची कमाई आहे ".दुसरा मुलगाही हुशारच होता. तो डॉक्टर झाला. तिस-याला औषधाचे दुकान काढून दिले. चौथा सुमार बुद्धीचा होता. तीनदा मँट्रिक नापास झाला. म्हणून त्याला शेतीत टाकले. याचाच अर्थ जे बुध्दिमान असतील त्यांनी सरकारी नोक-या कराव्यात, डॉक्टर इंजिनीअर व्हावे, दुकान मालक व्हावे. पण जे बुध्दीने कमी असतील त्यांनी शेती करावी, असा विचित्र समज आज सर्वत्र आढळतो. तो चुकीचा आहे, आत्मघातकी आहे, देशघातकी आहे. हाच समज लग्नाच्या बाजारातही रूढ झालेला आहे. 'शेतकरी नवरा नको गं बाई 'असच आज फक्त शहरातल्याच मुली नव्हे तर खेड्यातल्याही मुलींचे विचार पक्के झाले आहेत.
पण विचार करा की, कुणीच शेतीकडे वळलं नाही, कष्ट केले नाहीत. तर अन्नधान्य कसे पिकेल? सजीवांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील ? पोटाला अन्न नाही तर मग दुसरी नोकरी, मग ती पाच सहा आकडी पगार देणारी असली तरी करू शकणे शक्य होईल का हो? शरीराला पोषक आहार मिळाला तरच ते शारीरिक, मानसिक व बौद्धिक रित्या समर्थ होईल. मग शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे, हे पटले ना?
शेती हा सर्वप्रकारे सर्वश्रेष्ठ उद्योग आहे. कृषीवल हा कर्मयोगी आहे. त्याचे जीवन बहुधा शांत, सौम्य, न्यायी आणि ईश्वर निष्ठ असते. म्हणूनच एका कवीने म्हटले आहे, ---शेतकरी हो शेतकरी । सर्व जगाचे पोटभरी ।
कष्टांची नच तमा धरी । दृढ श्रद्धा ईश्वरावरी ।
शेतक-या जे अवगणती । आत्मघात आपुला करती ।
कृतघ्न अन्यायी असती । मान न ते कृषका देती ।।
असा हा शेतीचा व्यवसाय अनेक कारणांनी सर्वश्रेष्ठ आहे. त्यातील काही ठळक कारणे ---
1). शेतकरी हा कर्मयोगाचा आदर्श आहे.
2). साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचे तो प्रतीक आहे.
3)तो नित्य निसर्गाच्या सान्निध्यात राहतो.
4). निसर्ग त्याचा गुरू, मित्र- सखा, सोबती, आणि उपकारकर्ता असतो.
5). शेतीमध्ये शास्त्रे, कला, संशोधन आणि प्रत्यक्ष जीवन या चारही गोष्टी एकवटल्या आहेत.
6). शेती हा नवनिर्माणक्षम व्यवसाय आहे.
7).तो अनेक उद्योग व्यवसायाचा आधार आहे.
8). शेती म्हणजे ईश्वराचे स्वरूप! अर्थात शेती म्हणजे ईश्वराशी नित्य आणि निकट संबंध.
9). शेती म्हणजे ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग यांचा मधुर संगम.
10). शेती म्हणजे घाम गाळणे आणि परिश्रमाचे खाणे.
11). शेती म्हणजे स्वावलम्बन.
12).शेती म्हणजे अनेकांना कामाला लावणे, एकजुटीची अाणि सहकार्याची प्रेरणा!
13). शेती म्हणजे गोवंशावरील अपार प्रेम! गोमाता, भूमाता आणि जलदेवता यांची भक्ती म्हणजे शेती!
अशी ही शेती म्हणजे भारताचे वैशिष्ट्य आहे तसेच वैभव आहे. पण आज मात्र शेतकरी दीन झाला आहे. सर्वांगाने परावलंबी झाला आहे. बी-बियाणे, पाणी, विजेचा पंप, शेतमजूर, शेकराखण, मालाची विक्री, बाजारभाव या सर्व बाबतीत तो परतंत्र झाला आहे. प्रत्येक विषयात त्याला छळले, पिळले जात आहे. समाज, शासक, नोकरवर्ग हे सर्वच आज शेतक-याच्या मुळावर उठले आहेत. नको ती शेती असे म्हणतच शेतक-यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
खरं पाहिलं तर आमच्या येथील सर्व ऋषीमुनींनी शेती केली आहे. विविध प्रयोग करून सुधारणा घडवून आणल्या आहेत. महाराज जनकाने स्वत: नांगर हाती धरला होता. दादोजी कोंडदेवांनी छ. शिवाजी महाराजांच्या हातून सोन्याचा फाळ बसवलेला नांगर फिरविला होता.
आमची हीच आकांक्षा असली पाहिजे की आजची सर्व अव्यवस्था नाहीशी होऊन शेतीत सोने पिकले पाहिजे. शेतक-याला त्याचे खरे स्थान मिळाले पाहिजे. खेडी समृद्ध झाली पाहिजेत. आपली सर्व शक्ती, बुध्दी आणि धनसंपत्ती आपण शेतीकडे लावली पाहिजे, असे जेव्हा सर्व भारतीय समजू लागतील तेव्हाच भारताला सगळ्या जगात अद्वितीय स्थान लाभेल. तरच सुजलाम् सुफलाम् भारतमातेचे आमचे स्वप्न साकार होईल.
***************************