Bluepad | Bluepad
Bluepad
या ठगाने चक्क ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन विकले.
D
Devendra Sonar
22nd Jun, 2022

Share

घर विकलं जातं, फ्लॅट विकला जातो, शेतजमीन विकली जाते, हे असे खरेदी - विक्रीचे व्यवहार आपण कायम ऐकत असतो. पण चक्क ताजमहाल विकला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे का? ताजमहाल विकणाऱ्या त्या महाभागाची कहाणी वाचुया या लेखात!

या ठगाचं नाव आहे 'नटवरलाल'. पण हे ही त्याचं खरं नाव नसून टोपणनाव आहे. त्याचं खरं नाव मिथिलेश श्रीवास्तव. मूळचा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बांगरा गावातला हा पठ्ठ्या तसा ऐरागैरा नव्हताच, तर तो कायद्याचा पदवीधर होता. पण त्याला वकिली आवडत नव्हती. त्याला वेगळं काही करायचं होतं, म्हणून त्याने फसवणूक आणि चोरीचा मार्ग निवडला. नटवरलालने पहिली चोरी केली ती १००० रुपयांची. शेजाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या बँक खात्यातून हे पैसे नटवरलालने काढून घेतले होते.

या ठगाने चक्क ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन विकले.

त्यानंतर लोकांना फसवण्यातच त्याला थ्रील वाटू लागलं आणि या असूरी आनंदातूनच जन्माला आला ‘मिस्टर नटवरलाल!’ मग काय, या कौशल्याचा त्यानं चांगलाच उपयोग करायला सुरुवात केली. नटवरलालला फारसे इंग्रजी येत नव्हते. पण जे येत होतं, ते त्याला पुरेसं होतं. अधिक इंग्रजी जर का येत असतं तर कदाचित त्याच्या कारनाम्यांच्या कहाण्या भारतातच नव्हे तर परदेशातही सांगितल्या गेल्या असत्या.

तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी नटवरलालच्या शेजारच्या गावाला भेट दिली तेव्हा नटवरलालला डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याने त्यांच्यासमोर राष्ट्रपतींच्या हूबेहूब स्वाक्षऱ्या करून सर्वांनाच चकित केले. डॉ. राजेंद्र प्रसाद या करामतीने प्रभावित झाले. त्याने डॉ. राजेंद्र प्रसादांना सांगितले की, “तुम्ही एकदा आज्ञा द्याल तर मी भारताला कर्जमुक्त तर करेनच पण इतर देशांना भारताचा कर्जदार बनवू शकेन.”

नटवरलालला नोकरी करण्यात रस नव्हता. त्याला हुबेहुब सह्या करण्याची जणू अमोघ सिद्धी प्राप्त झाली होती. राष्ट्रपतींची स्वाक्षरी वापरून नटवरलालने चक्क ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकले. आजच्या काळात आपण अनेकदा ऐकतो की, असा मंत्री विकला गेला, असा अधिकारी विकला गेला. पण, नटवरलालने त्या काळात अधिकारी, मंत्र्यांसह, ५४५ सभासद असलेलं संसद भवन देखील लीलया विकले.

एकदा दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील घड्याळाच्या दुकानात पांढरा शर्ट आणि पँट घातलेला एक वृद्ध व्यक्ती घुसला आणि अर्थमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा पीए डीएन तिवारी अशी स्वत:ची ओळख करून दिली. तिवारीने दुकानदाराला सांगितलं की, “पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षातील सर्व ज्येष्ठांना समर्थनासाठी दिल्लीला बोलावलं आहे. राजीवजींनी आलेल्या लोकांना घड्याळ भेट द्यायचं ठरवलं आहे. तर मला तुमच्या दुकानातून ९३ घड्याळं हवी आहेत.” एकाच वेळी इतकी घड्याळं विकली जात आहेत म्हणून दुकानदारही लगेच तयार झाला.

दुसऱ्या दिवशी तो म्हातारा घड्याळ घेण्यासाठी दुकानात पोहोचला. दुकानदाराला घड्याळं पॅक करायला सांगून तो एका कर्मचाऱ्याला घेऊन पंतप्रधान कार्यालयात पोहोचला. तिथे त्याने कर्मचाऱ्याला ३२,८२९ रुपयांचा बँक ड्राफ्ट दिला. दोन दिवसांनंतर दुकानदाराने ड्राफ्ट बँकेत जमा केला, तेव्हा त्याला बँकेने ड्राफ्ट बनावट असल्याचे सांगितले. यानंतर दुकानदाराला समजायला वेळ लागला नाही की ती व्यक्ती दुसरी कोणी नसून भारतातील सर्वात मोठा ठग ‘नटवरलाल’ आहे. यानंतर कधी अर्थमंत्री व्हीपी सिंह यांच्या नावाने तर कधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने नटवरलाल वेगवेगळ्या शहरांमध्ये दुकानदारांची फसवणूक करत राहिला.

पोलिस या नटवरलालचा आठ राज्यांतील १०० हून अधिक गुन्ह्यांमध्ये शोध घेत होते. नटवरलालला नऊ वेळा अटकही करण्यात आली होती. त्यापैकी आठ वेळा तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. आता शा नाट्यमय घटनांवर सिनेमा आला नाही तर नवलच. अमिताभ बच्चनचा मि.नटवरलाल आणि इम्रान हाश्मीचा 'राजा नटवरलाल' असे दोन सिनेमे नटवरलालच्या कहाणीवरून प्रेरित आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
मि. नटवरलाल - https://www.youtube.com/watch?v=Plr5cide7Jk

राजा नटवरलाल - https://www.youtube.com/watch?v=p1yLxqhuo_g

स्वत: बद्दल नटवरलाल म्हणायचा, "मला माझ्या बुद्धिमत्तेवर इतका विश्वास आहे की मला कोणीही पकडू शकत नाही. ही परम परमेश्वराची इच्छा आहे. माझ्या नशिबात त्याने काय लिहिलंय माहीत नाही." १९९६ मध्ये नटवरलाल शेवटचा दिसला होता. त्यानंतर पुढे त्याचे काय झालं हे एक गूढ आहे. तुर्तास तुम्ही फार डोकं खाजवू नका, तुमच्या अवलिया मित्रांसोबत मात्र हा लेख लगेच शेअर करा.

373 

Share


D
Written by
Devendra Sonar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad