लहान असताना मला थोडं धुरकट दिसायचं. निळा, लाल, हिरवा असे रंग दिसायचेच नाही. आई बाबांच्या ही गोष्ट लक्षात आली होती तेव्हा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यावेळी यावर काहीच उपाय नाही असं सांगितलं. मी जसजशी मोठी होत गेले तशी माझी दृष्टी आणखीनच अधू होत गेली. मी सातवी आठवीला असताना, एके दिवशी सकाळी उठले तेव्हा मला पूर्ण अंधार दिसू लागला. काहीच दिसत नाहीये म्हणून ओरडून ओरडून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझी दृष्टी गेली आहे. तिथूनच माझा अंधाराचा प्रवास सुरु झाला. मी पूर्णपणे खचले होते. काठीने अंदाज घेत चालायला शिकले. कधी पडत होते तर कधी स्वतःला सावरत होते.
माझ्या शेजारी माझी एक मैत्रीण होती. तिचा एक बॉयफ्रेंड होता. मैत्रीण त्या दोघांच्या प्रेमाच्या सुंदर गोष्टी सांगायची. मलाही असंच कोणीतरी प्रेम करणारं असावं असं वाटू लागलं होतं. पण माझ्यावर कोण प्रेम करणार या विचाराने मला स्वतःचा खूप राग यायचा. मी स्वतःलाच शिक्षा करून घ्यायचे. माझं हे दुःख मैत्रिणीला समजलं होतं. चाळीतल्या वैभवला मी आवडते, तो माझ्यावर प्रेम करतो असं ती मला म्हणाली. वैभव आणि मी बोललो आणि आमच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले. मला माझं प्रेम मिळालं म्हणून खुश असायचे. आम्ही लपून छपून भेटायचो. पण मला दिसत नसल्याने कोणी बघेल म्हणून भीती वाटायची. वैभव तसा चांगला होता पण त्याच्या मित्र मैत्रिणींमध्ये तो कधीच मी त्याची गर्लफ्रेंड आहे हे सांगायचा नाही. मैत्रीण आहे अशीच ओळख करुन द्यायचा. त्यांच्या सोबत असताना माझा हातही धरायचा नाही. त्याला जणू माझी लाज वाटत होती! काही दिवसांनी कळलं की माझ्या मैत्रिणीनेच त्याला मला प्रेम मिळावं म्हणून नातं जोडण्यास सांगितलं होतं. वैभव माझं पहिलं प्रेम होता पण त्याच्या खोट्या नात्यामुळे मी खूप दुखावले होते. दरम्यान दहावीचं वर्ष खूप महत्त्वाचं असं वेळोवेळी आई अभ्यास घेताना सांगायची. आई सर्व वाचून दाखवायची आणि मी लक्षात ठेऊन उत्तरे द्यायचे. त्यामुळे मनातून प्रेमाचा विचार काढून टाकला.शाळेकडून मला मदतनीस मिळाली होती. ती मला नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत करायची. मी उत्तरं सांगायचे आणि ती लिहून काढायची. अभ्यास करताना माझ्या समोर आव्हानं कमी नव्हती पण मी चांगले टक्के आणायचे हे ध्येय ठरवलं होतं. दहावीत मला सत्तर टक्के मिळाले. सुट्टीत मी ब्रेल लिपी शिकायला सुरुवात केली होती. अकरावीला मी सामान्य कॉलेजमध्येच प्रवेश घेतला.
मी कॉलेजला जाऊ लागले होते. तिथेही मला अभ्यासासाठी मदतनीस होती. ती फक्त लेक्चर्सच्या वेळी सोबत असायची. इतर वेळी मी एकटीच. तिथे माझी कोणाशी महिना भर मैत्री झाली नव्हती. कोणी माझ्या जवळ आलं तर ते मला मदत करण्याच्या उद्देशानेच येत, सहानुभूती दर्शवत आणि निघून जात. एकदा जिना चढताना मी पायरीचा अंदाज न आल्याने पडले. तेवढ्यात एका मुलाने मला आधार देत उठवलं. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझा दुसरा हात धरला होता. त्याच्या स्पर्शाने माझ्या मनात जणू फुलपाखरंच उडू लागली होती. त्याचं नाव संकेत होतं. पहिल्याच भेटीत तो माझ्याशी खूप बोलत होता. बोलता बोलता त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. त्याचा नंबरही माझ्याकडून पाठ करुन घेतला. त्याचं ते बोलणं. मस्करी करणं याने मी हुरळून गेले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये आम्ही एकत्रच असायचो. मला संकेत आवडू लागला होता. पण काही दिवसांनी त्याच्या गर्लफ्रेंडशी त्याने माझी भेट घालून दिली. प्रेम बीम माझ्यासाठी नाही याची मला खात्री पटली होती.
बारावी पूर्ण झाल्यानंतर आईच्या हट्टामुळे मी कलावर्गांना जाऊ लागले. तिथे सर्व अंधच मुलं होती पण तिथे आम्हाला चित्रकला इ. शिकवायला येणारा जयेश माझ्याच वयाचा होता. अपघातामुळे त्याच्या एका डोळ्याला इजा झाली होती पण एका डोळ्याने त्याला स्पष्ट दिसायचं. त्याच्याशी माझे चांगले सूर जुळले त्याने मला प्रपोजही केलं आणि मी ‘हो’ म्हणाले. जयेशबद्दल मला असुरक्षितता वाटत नव्हती. आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होतो पण कधीकधी त्याचं वागणं मला वेगळंच वाटायचं. त्याचा फोन सतत व्यस्त असायचा अनेकदा तो खोटं बोलत होता असं वाटायचं. तो मला फसवत तर नाही ना म्हणून मी खूप अस्वस्थ असायचे त्याच्याकडून प्रेमाच्या शपथा घ्यायचे. पण एकदा क्लास मधल्याच मुलीने मला त्याचा कॉल रेकॉर्ड ऐकवला. तो चक्क तिच्याशी फ्लर्ट करत होता. मला दिसत नाही याचा त्याने चांगलाच फायदा घेतला होता. प्रेमावरचा माझा विश्वास पूर्ण उडाला, मी अंध असल्यामुळे माझ्यावर कोणीही मनापासून प्रेम करु शकत नाही.
माझ्या आयुष्यातला प्रेमाचा कप्पा नेहमीच रिकामा राहिला! उद्या मला कोणी तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलं तरी ती व्यक्ती माझ्यावर खरंच प्रेम करते की नाही हे देखील मी ओळखू शकणार नाही. कारण न मला त्या मुलाचे हाव भाव दिसणार न प्रेमाच्या आड लपलेला स्वार्थीपणा.... प्रेम करण्याचा आणि ते मिळवण्याचा काहीही अधिकार मला नाही असंच वाटतंय!