Bluepad | Bluepad
Bluepad
‘आई’वर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वाचावा असा लेख..
S
Shambhavi Upandhye
22nd Jun, 2022

Share

"आई तुझ्यामुळे मला अवनीच्या वाढदिवसाला जाता आले नाही. जो ड्रेस मला घालायचा होता तो सापडलाच नाही. तुला समजत नाही का गं? तू का माझे कपडे इकडून तिकडे करतेस." असं म्हणून ती आईवरच राग काढू लागली. आईने तिचं कपाट आवरलं यात तिची चूक होती का? कपाटात कपडे कोंबून ठेवणारी मुले आईवरच ओरडतात. ड्रेस किंवा वस्तु नीट शोधल्या तर सापडतातच. मात्र आपण आपल्या चुकांवर पांघरून घालून प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या स्त्रीलाच दोष देतो.

मुले, नवरा, सासूसासरे, दीर, नणंद अशी घरातली अनेक माणसे असतात जी काही झाले तरी दोष बाईला देऊन मोकळे होतात. ती घर सांभाळते, तुमच्यावर लक्ष देते, तुम्हाला काय हवं नको ते पाहते हीच तिची चूक असते. कारण तिच्या या मेहनतीला कोणीच ग्राह्य धरत नाही. अनेकजण बाहेरचा राग सुद्धा घरातल्या बाईवर काढतात. नवरा ऑफिसमधून दमून आला असेल. ऑफिसच्या कामाचा ताण त्याच्यावर असेल तरी सुद्धा तो बायकोवर चिडचिड करू लागतो. ती बिचारी नवऱ्याला अशा परिस्थितीमध्ये देखील समजून घेते. मात्र मुलांना अभ्यासात कमी मार्क मिळाले तरी सुद्धा बायकोवर निशाणा साधला जातो. तू मुलांचा अभ्यास घेतला नाही म्हणून त्यांची प्रगती होत नाही असं म्हणून तिला दोष दिला जातो.

‘आई’वर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वाचावा असा लेख..

सून घरात सासूसासऱ्यांची पूर्ण काळजी घेते. त्यांची व्यवस्थित सेवा करते. मात्र असे करताना तिच्याकडून कधी कोणती गोष्ट राहून गेली तर लगेच घरातील इतर सदस्यांकडून तिला बोलले जाते. सासूला मधुमेह आहे तिला गोड खाऊ द्यायचे नाही. पण सासू जेव्हा सुनेकडे हट्ट करून किंवा तिला भावनिक होऊन मिठाई मागते तेव्हा सून इमोशनल होऊन तिला देते. आता यामुळे सासूची साखर वाढली की गोष्टीची शहानिशा न करता सुनेला ओरडले जाते. तू निष्काळजीपणे कशी काय वागू शकतेस, असं म्हणून तिला खूप काही ऐकावे लागते. आता तसं पाहिलं गेलं तर तिच्यातील भावनिक कोपरा जागा होऊन तिने बुद्धीपेक्षा मनाचा विचार केलेला असतो. अशावेळी बायका भावनिक असतात हे विसरून चालणार नाही.

तुम्ही एकदा तुमच्या घरातील लोकांचे निरीक्षण करा. दिवसभरात कोण कोण तुमच्या आईला दोष देतंय हे पहा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, ज्या गोष्टीचे आईशी घेणेदेणे नाही त्या गोष्टीसाठी सुद्धा तिला दोष दिला जातो. म्हणजे काय तर, “आई तू मला लवकर उठवलं नाहीस म्हणून मला कॉलेजला जायला उशीर झाला.” अरे बाळा पण आता तू शाळेत नाहीस तर मोठा होऊन कॉलेजला जातोस तरी सुद्धा आईनेच तुला उठवायचे का? असा प्रश्न या मुलांना विचारावासा वाटतो. रात्री मोबाईलवर जागरणं करून आपण वेळेवर उठू शकत नाही याचा दोष तिच्या माथी मारू नका.

"आई मी डाएट करत आहे माहित असून तू मला खाण्याचा आग्रह का करतेस. तुझ्यामुळे माझं वजन कमी होत नाही. माझं डाएटिंग सुरु झाल्यावरच तुला सुचत छान छान पदार्थ बनवायला." असं म्हणून ती आईच्या मागे भुणभुण करू लागते. तुमच्या तोंडावर आणि मनावर तुमचा ताबा नाही यात आईचा दोष आहे का? ती मायेपोटी तुम्हाला जेवण्याचा आग्रह करते तेव्हा नको म्हणून तुम्हाला मागे हटता येत नाही. मात्र आपली चूक लपवण्यासाठी आई सॉफ्ट टार्गेट असते हे मुलांना देखील कळलेले असते.

नवरा-बायकोला कुठे बाहेर जायचे असेल आणि तिला घरातील कामं उरकून निघायला जर थोडा उशीर झाला आणि तितक्यात पाऊस पडू लागला तर तो नवरा बायकोला दोष देत "तुझ्यामुळे पाऊस सुरु झाला!" असं म्हणू लागतो. तेव्हा अशा पुरुषांच्या बोलण्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही वेळेत जरी निघाला असता तरी वाटेत तुम्हाला पावसाने भिजवलेच असते हे त्यांना समजत नाही.

त्यामुळे प्रत्येकवेळी तिला दोषी ठरवण्यापेक्षा तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत का, हे देखील पाहणे गरजेचे असते. तुमच्यासाठी घरात दिवसरात्र एक करून ती राबत असते. मात्र तिचे कष्ट कोणाला दिसत नाहीत. उलट तिच्या नसणाऱ्या चुका काढून तिला काही ठिकाणी दोष्टी ठरवले जाते. तर असे करू नका. ही गोष्ट तुम्हाला पटली असेल तर कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

411 

Share


S
Written by
Shambhavi Upandhye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad