Bluepad | Bluepad
Bluepad
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका…
P
Pravin Kadu
22nd Jun, 2022

Share

प्रत्येक माणसाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते. काही जणांनी सगळ्याच बाजूंनी आपला जम बसवलेला असतो तर काही जण संघर्ष करत असतात. संघर्ष करणाऱ्यांना अनेकदा इतरांकडून कमी समजलं जातं. हातात पैसा नाही, समाजात फारसा मान नाही म्हणत झिडकारलं जातं. पण एक वेळ अशी येते की, अशीच अतिसामान्य माणसं असामान्य असं काही तरी करुन दाखवतात आणि त्यांना नाव ठेवणारे मात्र होते तिथेच राहतात. म्हणून आयुष्यात कधीही कोणालाही कमी समजू नये. अगदी पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद असलेला समुद्रदेखील तेलाच्या थेंबांना आपल्यात बुडवू शकत नाही.

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका…

या विषयी एक कथा पाहूया. एका गरीब मुलाला एक श्रीमंत मुलगी आवडायला लागली. त्याने मोठी हिंमत करुन एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. तेव्हा ती मुलगी म्हणाली की, तुझ्या महिन्याच्या पगाराइतका माझा रोजचा खर्च आहे. आपलं नातं जमू शकत नाही. मी तुझ्यासारख्या मुलावर कधीच प्रेम करू शकत नाही. तू तुझ्या पात्रतेची मुलगी बघ. त्या मुलाला फार वाईट वाटलं आणि तो तिथून निघून गेला. दहा वर्षांनंतर ते दोघं एका शॉपिंग मॉलमध्ये एकमेकांना अचानक भेटतात. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणते, आता माझं लग्न झालं आहे आणि माझ्या नवऱ्याचा पगार दीड लाख रुपये महिना आहे. तिचं बोलणं तो फक्त ऐकत असतो. तितक्यात त्या मुलीचा नवरा तिथे येतो आणि म्हणतो की "सर, तुम्ही इथे?" आपल्या नवऱ्याचं आपल्याला मागणी घालणाऱ्या मुलाला सर म्हणणं हे ऐकून ती मुलगी आश्चर्यचकित होते. “हे माझे बॉस आहेत, १०० करोडपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक आहेत हे. तुला माहितीये? माझ्या बॉसचे एका मुलीवर प्रेम होते पण ते तिचे मन जिंकू शकले नाही आणि आजपर्यंत त्यांनी तिच्यासाठी लग्नही केलं नाही. ती मुलगी किती भाग्यवान ठरली असती जर तिने आता या माझ्या बॉसशी लग्न केले असतं तर, हो ना?” हे सगळं ऐकताना तिला खूप धक्का बसला पण ती एक शब्दही बोलली नाही. आपण कितीही यशस्वी असलो तरी आयुष्यात कोणालाही कमी समजू नये. कोणाचेही दिवस कधीही बदलू शकतात हे या कथेतून आपल्याला दिसतं.

अनेकांना स्वतःचा मोठेपणा सांगण्याची आणि इतरांना आपल्या शब्दांमधून, कृतीमधून कमी लेखण्याची सवय असते. दुसऱ्यांना कमी समजून अशी माणसं आनंद घेत असतात आणि आपण कसे उच्च स्थानी आहोत हे देखील सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा माणसांनी प्रत्येक माणसाची वेळ बदलत असते याचं भान नक्की ठेवावं. प्रत्येकाची विकासाची, प्रगतीची आपापली गती असते. जो तो त्या गतीनुसार पुढे पुढे जात असतो. काही लोकांना अतिशय कमी कालावधीत सगळं मिळतं तर काहींना छोटंसं काही मिळवण्यासाठीही खूप झगडावं लागतं. या सगळ्याचा आपल्याशी प्रत्यक्षपणे काहीही संबंध नसतो. मग त्यांना कमी समजण्याची भावना आपल्यात येते कुठून, याचा विचार आपण स्वतः केलाच पाहिजे.

एखाद्या व्यक्तीच्या सध्याच्या परिस्थितीमुळे त्याच्याकडे तुच्छतेने बघणं, आपल्या गर्वाचं प्रदर्शन भरवणं हे माणूस म्हणून आपल्याला खूप छोटं करणारं आहे. अगदी वातावरणात देखील सातत्याने बदल होत असतात. उन्हाळ्याने त्रस्त केलं की त्यावर फुंकर घालण्यासाठी पाऊस येत असतो. तसंच एखाद्या दुस्तर किंवा हलाखीच्या परिस्थितीला दूर करण्यासाठी त्याची मेहनत कामी येत असते. मेहनत करणारी माणसे आपल्या मेहनतीच्या जोरावरच आयुष्यात हवं ते साध्य करत असतात. अशा मेहनती माणसांना शब्दांचं, प्रेरणेचं बळ आपण द्यायला हवं. आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असो वा नसो हे बळ माणसांना यशाची मोठी उंची गाठायला कामी येतं. आपले शब्द इतरांना धीर देणारे असावेत. ते कधीही कोणाला कमी लेखणारे, त्यांच्यातील कमतरता दाखवणारे नसावेत. ज्या माणसाला आपण आज कमी समजत आहोत उद्या तो कदाचित आपल्यापेक्षाही उच्च स्थानी, पदावर जाऊन बसेल याचं भान आपण ठेवलं पाहिजे. जगात प्रत्येक माणसाची वेळ बदलत असते. आज यशस्वी व्यावसायिक असलेला एखादा उद्या कर्जाच्या डोंगराखाली दबल्याचं दिसून येतं. तर दुसरीकडे कर्जबाजारी असलेला एखादा प्रामाणिक व्यावसायिक सगळं कर्ज दूर करुन व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करण्यात यशस्वी होत असल्याचंही दिसून येतं. प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. त्यामुळे जीवनात कधीही कोणालाही कमी समजू नये. प्रत्येकाला समान वागणूक आपण द्यावी. यातूनच आपली माणुसकी दिसू शकते. आपल्याला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

409 

Share


P
Written by
Pravin Kadu

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad