Bluepad | Bluepad
Bluepad
एक वेगळी आत्मकथा - मक्याच्या कणसाची !
कु. जान्हवी विद्याधर दाबके
कु. जान्हवी विद्याधर दाबके
22nd Jun, 2022

Share

एक वेगळी आत्मकथा - मक्याच्या कणसाची !
पावसाळा जसा सुरू की काही गोष्टी सगळीकडे दिसायला लागतात , सगळीकडे चिखलाचे पाणी , सगळीकडे हिरवाई आणि महत्त्वाची गोष्ट - चहा आणि मक्याचे कणीस विकणारे लोक !
अशाच एका पावसाळ्यात भर पावसात भिजत भिजत गरमागरम कणीस खाताना सहज कोणीतरी हाक मारली म्हणून इकडे तिकडे बघितले. कोणीच दिसेना. बरं, आजूबाजूची माणसेही आपापल्या कामात मग्न होती. मग लक्षात आले , ज्याला हातात घेऊन खाते आहे तेच माझ्याशी बोलत आहे.
' अग, घाबरु नको, मी मक्याचं कणीसच बोलत आहे. आता तू म्हणशील हे माझ्याशीच का बोलतंय? तर ऐक, जी माणसं संवेदनशील असतात त्यांच्याशीच निसर्गातील घटक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तर हा, मी काय सांगत होतो - मी मूळचा औरंगाबाद जवळच्या एका गावातला . माझा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात झाला. पण मी आणि माझ्या भावंडांनी त्याचे नशीब उजळले.
पांडुरंगाच्या कृपेने त्या वर्षी पुरेसा पाऊस आणि छान हवामान राहिले आणि मी चांगल्या किमतीला विकलो गेलो तेही एका चांगल्या मोठ्या विक्रेत्याला.
पण मग दुर्दैवाने मला आणि माझ्या भावंडांना वेगळं केलं गेलं आणि मी आलो या गाडीवाल्या माझ्या नवीन मालकाकडे. पूर्वी मला हे माझ्याच सवंगड्याना शेगडीवर, निखाऱ्यावर धरतात , भाजतात हे पाहून फार भिती वाटली. झालं, आपलं जीवनच संपलं असं वाटलं.
पण नंतर एकदा आमचा मालक त्याच्या मित्राशी बोलत असताना मी ऐकलं. तो म्हणत होता - ही एव्हढी कणसं विकली गेली म्हणजे लेकीच्या आवडीचे कपडे घेता येतील, गौरी - गणपतीसाठी... मग मीही सुखावलो की आपल्यामुळे कोणाचं तरी पोट भरत आहे, कोणाच्या तरी इच्छा पूर्ण होणार आहेत.
एक वेगळी आत्मकथा - मक्याच्या कणसाची !
आता मी तुझ्याशी हे बोललो पण मलाही बरं वाटलं की कोणीतरी माझं ऐकून घेतलं. पण एक विनंती आहे. आता मका काय किंवा काही अन्नपदार्थ काय , ते विकत घेताना घासघीस करु नको. कमी पैशात घेणं तुमच्यासाठी सोपं असलं तरी त्यावर कोणाचं तरी पोट आहे हे कायम लक्षात ठेव.
हे ऐकून लगेच मला भाजी मंडईत भाव करणाऱ्या एक ओळखीच्या काकू आठवल्या आणि कमी किमतीत चांगला माल गेला यामुळे नंतर नाराज झालेल्या भाजीवाल्या मावशींचा पडलेला चेहराही दिसला.
मी त्या कणसाने वेळीच माझे डोळे उघडले म्हणून त्याला अगदी मनापासून thank you म्हणायला गेले आणि म्हणणार इतक्यात मला मला खरंच कोणीतरी हाक मारली , ती माझी आई होती आणि तेव्हा मी भानावर येऊन पाहिलं तर समोरच्या कणीस वाल्या माणसाने घरी शिजवून खायला नेण्यासाठी म्हणून मला हवं असलेलं स्वीट कॉर्न च कणीस माझ्या हातात ठेवलं.
- कु. जान्हवी विद्याधर दाबके

320 

Share


कु. जान्हवी विद्याधर दाबके
Written by
कु. जान्हवी विद्याधर दाबके

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad