Bluepad | Bluepad
Bluepad
आणि लग्नात घोड्यावर चढायची हौस चांगलीच फिटली...
R
Rohit Pawar
22nd Jun, 2022

Share

आयुष्यात प्रत्येक मुलाचे एकदा तरी घोड्यावर चढण्याचे स्वप्न असते. आयुष्यात आलेले अनेक चढ चढले तरी घोड्यावर चढण्याचा आनंद हा वेगळाच असतो. यावर्षी मे महिन्यात माझ्या लग्नाचा बार उडणार होता. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. पण माझे वडील आणि माझ्यामध्ये एका गोष्टीवरून मोठा वाद झाला. मी वडिलांना म्हणालो, ‘लग्नामध्ये घोडा हवा.’ तेव्हा वडील म्हणाले, ‘एवढा मोठा घोडा झालास अजून कशाला हवा घोडा’. पण घोड्याशिवाय लग्नात मजा आणि रुबाब नाही असे म्हणून मी फुगून बसलो. तेव्हा चैनराव पप्पू कागदे यांचा ‘दिलखेचक’ नावाचा घोडा ठरवला. एकूण दहा हजार रुपये देऊन थाटात घोड्याची बुकिंग केली.

लग्नाच्या चार दिवस आधी चैनरावने मला गावातल्या शाळेत बोलवले. मला म्हणाला "बस घोड्यावर, लग्नाच्या दिवशी भीती वाटू नये, सवय व्हावी म्हणून अर्धा तास सराव करू." चैनरावने मला घोड्यावर कसे बसायचे ते सांगितले. विटकरी रंगाचा घोडा. त्याच्या डोक्यावर एक पांढरा पट्टा. सारखा शेपटी हलवत होता. घोडा चपळ, चलाख असतो म्हणून माझा हा आवडता प्राणी होता. परंतु माणूस आणि घोडा हे बिनभरवश्याचे प्राणी आहेत. कोणावर कधी कसे उधळतील हे सांगता येत नाही. तेव्हा काळजी घेतलेली बरी असते, असं म्हणून चैनरावने मला घोड्यावर बसवून शाळेच्या दोन-तीन चक्कर फिरवून आणल्या. मग त्याने विचारले, ‘आता कसं काय वाटतंय?’ मी म्हणालो, "मऊ मऊ वाटतंय. जबरदस्त! मला शिकवण्याची पण गरज नाही. एका रपेटीत रायगड गाठू शकतो आपण!"

 आणि लग्नात घोड्यावर चढायची हौस चांगलीच फिटली...

असो, लग्नाचा दिवस उजाडला. लग्न शेजारच्याच गावी होते. फेटा, शेरवानी, बाटा कंपनीचे बुट आणि घोडा! असा माझा देखणा थाट होता. दुपारचे बारा वाजले होते. मंगलाष्टक होण्यापूर्वी मंदिरात कपडे चढविण्याचा जो विधी असतो त्याला पारावर कपडे चढवणे असे म्हणतात. विधीनुसार मला पारावर कपडे चढवले गेले. चैनराव जणू माझा करवला आहे, अशा थाटात माझ्या मागेच थांबून होता. मारुतीचे दर्शन घेतले. माझ्या नकट्या करवलीने रुमालाने माझा घाम पुसला, चेहऱ्याला पावडर लावली आणि आम्ही लग्न मंडपाकडे निघायला उठलो. लग्न मंडप एक दीड किलोमीटर अंतरावर होते.

चैनरावने मला घोड्यावर बसवले. नातेवाईकामधले एक लेकरू घोड्यावर बसण्यासाठी रडू लागले. मी म्हणालो, "तुझं का घोड्यावर बसायचं वय आहे? लईच घाई करू लागलास तू!" पण त्याला माझे बोलणे थोडीच कळणार होते. चैनरावने आत्याच्या लहान पोराला पण माझ्यासमोर बसवले. माझ्या कुशीत अजून बायको आली नाही ते हे येऊन बसले. असो, एक एक पाऊल चालत घोडा पुढं जाऊ लागला. मी अधून मधून घोड्याच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवत होतो. घोड्याच्या चालण्याबरोबर मी सुद्धा हलत डूलत होतो.

बघतोय रिक्षावाला, राजा हिंदुस्तानी, दे दे प्यार दे असे गाणे वाजंत्री वाजवत होते. पुढे माझे मित्र, गावातली खूप सारी पोरं नाचत होती. नाचणाऱ्यांमध्ये काही खूप दारू पिऊन आलेले होते. अचानक आमचे पिताश्री रागारागात आले आणि सर्व पोरांना म्हणाले, "चला रे, साडे बाराचे मुहूर्त आहे. नंतर नाचा किती पण." लग्नाच्या मुहूर्तापायी वडिलांनी घोड्याला पटकन मंडपात आणायला सांगितले. चैनरावने घोड्याची चाल थोडी वाढवली. पण पुढे पोरांची भरपूर गर्दी होती. तितक्यात एका फुल प्यायलेल्या पोराने पराक्रम केला. थांबलेल्या घोड्याच्या पायाच्या मध्ये सुतळी बॉम्ब वाजवला. त्याचा आवाज झाला "धुडुम..धूम!!!!"

घोड्याने अचानक पळायला सुरुवात केली. घोडा वाट दिसेल तिकडे धावायला लागला. माझ्या समोरील आत्याचा मुलगा घोड्याच्या एका हिसक्याने खाली आदळला होता. मी मात्र घोड्याची आयाळ धरून अख्खे गाव पालथे घालत होतो. माझ्या मागे अख्खे वऱ्हाड पळत सुटले होते. मी ओरडत होतो, "अरे, थांबवा या घोड्याला…" घोडा अचानक कापसाच्या शेतातून धावू लागला. माझा एक पाय रिकीबित होता आणि दुसरा घोड्याच्या पाठीवर. कापसाच्या शेतात घोड्यावरून मी खाली आदळलो.

अख्ख्या गावादेखत माझी फजिती झाली. वडील धावत धावत जवळ आले आणि धीर द्यायचा, मला उचलायचे सोडून म्हणाले, "लावायचा का घोडा…दहा हजार गेले पाण्यात!" या सगळ्या गोंधळात माझे लग्न दोन तास उशिरा लागले आणि मधुचंद्राच्या रात्री चंद्र पाहायचा सोडून मी कंबरेला बाम लावून आराम करत झोपलो होतो. तर असा होता माझ्या घोड स्वारीचा अनुभव. जो मी जन्मात विसरणार नाही पण तुम्हाला वाचताना नक्कीच मजा आली असेल. हसा लेकहो! तुमचं काय जातंय हसायला! तसंही सगळं गाव अजून हसतंच आहे माझ्यावर..

419 

Share


R
Written by
Rohit Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad