Bluepad | Bluepad
Bluepad
या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!
A
Ashwini Kawale
22nd Jun, 2022

Share

सगळं आपल्या मनासारखं व्हावं, आयुष्यात फक्त आनंदच असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. दुःखाचा विचारही आपल्याला नको असतो. पण फक्त आनंद, मज्जा आपल्याला मानसिकदृष्ट्या कधीही सक्षम बनवत नाही. थोडेफार दुःख आले तर ते मात्र आपल्याला आतून कणखर बनवतात. त्यामुळे मनाविरुद्ध काही गोष्टी होणं, धक्के बसणंही महत्त्वाचं असतं. ते कसं त्याबद्दल या लेखातून आपण जाणून घेऊ.

१) नकार मिळायला हवा -

या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!

आयुष्यात एकदा तरी आपल्याला नकार मिळायलाच हवा. हा नकार पचवणं अर्थातच अनेकांना कठीण जातं. नकारामुळे अपमानाची भावनाही मनात तयार होते. पण एक सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आयुष्य जगायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत नकाराचा सामना करण्याची वेळ आपल्यावर नक्की यावी. जेव्हा आपण नकार मोठ्या हिंमतीने पचवतो आणि नकाराच्या कठीण अनुभवाकडे शिकवण म्हणून पाहतो तेव्हा खरोखरच आपण मानसिक, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत असतो. जेव्हा कधी आपल्याला नकार मिळतो तेव्हा नकाराचं कारण काय, आपण कुठे कमी पडलो याचा विचार आपण करायला लागतो. मग हा नकार एखाद्या नोकरीसंबंधित असेल, लग्नासंबंधी असेल किंवा आणखी काही. पण आपल्या स्वतःच्या विकासासाठी तो गरजेचा असतो.

२) अपमान व्हायला हवा -

या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!

एखाद्याने आपला अपमान केला तर आपला संताप अनावर होतो. कोणी आपला अपमान करुच कसं शकतं, ही भावना मनाला त्रास द्यायला लागते. पण अपमान होणंही गरजेचं आहे. कारण अपमान आपल्याला जगाच्या वास्तवाशी ओळख करुन देतो. सगळे आपलं फक्त कौतुकच करणारे नाही तर आपले कान टोचणारे देखील आहेत याची जाणीव आपल्याला होते. शिवाय, आपल्या कमीपणावर, अपयशावर कोणी अपमानास्पद बोललं तर ते अपयश दूर करण्याची उर्जा आपल्याला अपमानातूनच मिळत असते. अपयशावर मात करण्यासाठी पेटून उठण्याची ताकद अपमानातून मिळू शकत असल्याने अपमान होणंही फार गरजेचं असतं.

३) होणारं काम शेवटच्या क्षणी बिघडायला हवं -

या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!

एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपण तन, मन समर्पित केलेलं असतं. आता काम पूर्ण होणार असं वाटत असतानाच सगळं काही बिघडतं. अगदी पूर्ण होत आलेला पत्त्यांचा बंगला शेवटचा पत्ता ठेवताना कोसळावा तसंच. आपली सगळी मेहनत वाया गेली हा विचार करुन आपल्याला अतिशय वाईट वाटतं. पण आयुष्यातल्या अनपेक्षितपणाची खरी ओळख अशा प्रसंगांमधून आपल्याला होत असते. असे प्रसंग कामाप्रती अधिक सजगता, सावधानता आपल्यामध्ये आणतात. ऐनवेळी काम बिघडण्याचा अनुभव आपल्याला आयुष्याची खरी ओळख करुन देतात. आपण ठरवतो तसं आयुष्यात होईलच असं नाही याची जाणीव अशा अनुभवांमुळे आपल्याला होत असते.

४) प्रेमभंग व्हायला हवा -

या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!

प्रेमभंग होण्याची भावना निर्मळ, निरपेक्ष भावनेने प्रेम केलेल्या प्रत्येकासाठीच अतिशय वाईट भावना आहे. अनेकांचा माणसांवरचा, प्रेमावरचा विश्वास प्रेमभंगामुळे उडून जातो. पण माणसांची, परिस्थितीची, समाजाची खरी ओळख करुन देणारा हा अनुभव असतो. माणूस म्हणून आपण अतिशय प्रगल्भ होत जातो. इतरांना स्वीकारणं, चुका मान्य करणं, आलेली परिस्थिती बदलता येणार नाही याची जाणीव ठेवून पुढे सरकण्यासाठी प्रेमभंगाची भावना आपल्याला खूप काही शिकवते. अर्थात कोणालाच एखादी शिकवण मिळवण्यासाठी आपला प्रेमभंग व्हावा असं वाटत नसतं. पण जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा त्यातून मिळणारी शिकवण आपल्याला आयुष्यभरासाठी अनेक धडे देऊन जाते.

५) नोकरी सोडणे किंवा बेरोजगार असणे -

या 'पाच' गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजेत!

हातात असलेली चांगली नोकरी सोडणे आणि हातात नोकरीच नसणे या गोष्टी देखील आपल्याला वेगवेगळ्या बाबतीत शिकवण देत असतात. आपला चांगला जम बसलेली नोकरी सोडण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते. नोकरीचा कम्फर्ट झोन दिसत असतानाही तो पार करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. ज्याला जमतं तो मात्र आयुष्य नक्कीच धीटपणे जगू शकतो. बेरोजगारी ही तर अशी गोष्ट आहे जी आपल्याला अतिशय हतबल करते. पण तितकाच संयम ठेवायला, प्रयत्न सुरु ठेवण्याचं बळही आपल्याला देते. त्यामुळे आपण बेरोजगार जरी असलो तरी हार न मानता या परिस्थितीतून आपण काय शिकू शकतो हे पाहिलं पाहिजे.

या पाच गोष्टी अशा आहेत ज्या कधीही कोणाला आपल्या आयुष्यात व्हाव्यात असं वाटणार नाही. पण जे नकोसं असतं, जे घडू नये असं वाटत असतं त्याच प्रसंगांमधून माणूस घडत असतो. आपलं आयुष्य म्हणजे लहान मुलांच्या छान छान गोष्टी नाही तर त्याच्या कितीतरी पलीकडचं आहे याची जाणीव अशा अनुभवांमधून आपल्याला होत असते. तुमच्या आयुष्यात वरील पैकी कोणत्या गोष्टी घडल्या आहेत? आमच्या सोबत नक्की शेअर करा.
- अश्विनी कावळे

571 

Share


A
Written by
Ashwini Kawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad