पंढरीच्या पांडुरंगा महाराष्ट्रात सत्तेसाठी चा खेळ चालू आहे... तुझ्या शासकीय पुजेचा मान कुणाला मिळेल माहिती नाही. पण बा विठ्ठला शेकडो किलोमीटर वरुन आपल्या शेतातील पेरणी उरकून आणि तु पाऊस पाडशील या तुझ्या वरच्या विश्वासावर मी घर सोडून तुझ्या वारीला पायी येतोय. होय, पांडुरंगा मी वारकरी बोलतोय, मला माहीती आहे तुला देखील शासकीय पुजेला कोणता मंत्री येईल यापेक्षा तुझ्या पायी येणार्या वारकर्याची चिंता असेलच. बाबा रे, सुना-लेकर-बाळ सगळे म्हणतात की, पेरणी झाली पाऊस पडत नाही आणि ह्या म्हातार् याला वारीला जायच सुचत आहे. खरय विठ्ठला हीच तुझ्या कित्येक वारकर्याची व्यथा आहे. पण आम्हा वारकर्याची तुझ्या वर श्रध्दा आहे. तु दात दिले, अन्न ही देखील अर्थात त्यासाठी अपार कष्ट करायची तयारी आहे माझी. पण बा, विठ्ठला मी आता पंढरीला यायला निघतोय, निश्चिंत होऊन तुझ्या कडे येण्याआधी एकदा वरुण राजाला पाठव. म्हणजे मी आनंदाने निघायला मोकळा... काय करणार बा, विठ्ठला तुझ्या भक्ती त तल्लीन होऊन स्वतः च्या पोराला चिखलात तुडवणारा गोरा कुंभार मी नाही... किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणून तुला शेतात राबवता येईल एवढा पुण्यवान सावता माळी ही मी नाही...मी संसारात गुरफकलेला पण तुझ्या भेटीची ओढ असलेला वारकरी आहे. पुण्यातुन उद्या मी निघणार आहे.सर्व रस्ते तुझ्या वारकर्यांसाठी मोकळे करण्यात आले आहे. आषाढी ला तुझ मुख मन तृप्त होवोस्तर बघु दे. घरी जाताना घरची ओढ लागेल तेव्हा मात्र माझ शेत शिवार हिरवगार पिकाने सजू दे... ठिक आहे तर देवा, आपली भेट होईलच की तुझ्या वैकुंठाहुन पवित्र अशा पंढरीत, तेव्हा बोलुच की... तुझ आणि माझ हे नात असच राहू दे...