म्हणतात ना, "संघर्षा पुढे परिस्थीतीही माघार घेते" हे अगदी खरं आहे. परिस्थीती किती ही हलाखीची असू दे, ज्याच्याकडे संयम आणि कष्ट करण्याचं बळ आहे तो नक्कीच ध्येयाच शिखर गाठु शकतो, फक्त प्रयत्नांना कष्टाची जोड द्यावी लागते मग असाध्य ते साध्य नक्कीच होऊ शकतं.
अश्या हलाखीच्या परिस्थीतीतून ध्येयाच्या शिखरापर्यंत पोहचलेल्या एका व्यक्तीमत्वाचा रविवारी मला अप्रत्यक्षरित्या काही काळ सहवास लाभला.. ते व्यक्तीमत्व म्हणजे अहमदनगरच्या सुकन्या पी. एस.आय सीमा किंकार मँम! थोडक्यात पार्श्वभुमी सागांयचीच झाली तर, त्यांचे वडील व्यसनाधीन, आणि आई घराचा गाडा पुढे चालवण्यासाठी थोडीफार शेती करते तर कधी मोलमजुरी करते. मोठ्या भावाने परिस्थीती अभावी शिक्षणातुन काढता पाय घेतला परंतू शिक्षणाची आवड असल्यामूळे सीमा यांना भरपूर शिकवीण्याची मनी प्रबळ इच्छा!
पी. एस. आय सीमा यांनी प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण केलं तर पदवी पुण्यातील हडपसरमधील एस. एम कॉलेज मध्ये कला शाखेतून पूर्ण केली.
एम. पी. एस. सी देण्याचं स्वप्न तसं तर शालेय जीवनापासुनच बघितलं होत परंतु खरा प्रवास तर पदवीच्या दुसर्या
वर्षापासुनच सुरु झाला. मोठ्या भावाची खबींर साथ आणि शाळा-कॉलेजमधील शिक्षकाचं वेळोवेळी लाभलेलं मार्गदर्शन त्यामुळे कोचींग क्लास लावण्याची गरज भासली नाही असं त्या म्हणाल्या.
जीवनाच्या प्रवासामध्ये कितीही वाटसरू सोबतीला भेटले तरी प्रवास हा स्वतःलाच करावा लागतो. अगदी हेच ध्यानात घेऊन, परिस्थीतीकडे सकारात्मकतेने बघुन, त्यातच रात्रीचा दिवस करून अवघ्या दोनच वर्षात त्यांनी त्यांच ध्येय साध्य करून दाखवलं. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी स्वत: अनुभवण्यापेक्षा काही गोष्टी इतरांच्या अनुभवातूनही शिकता येतात.अगदी असंच,त्यांच्या एम.पी.एस.सी च्या प्रवासामध्ये त्यांनी यशस्वी व्यक्तींच्या झालेल्या चुका समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या चुका आपल्याकडून कश्या टाळता येतील यावर त्यांनी भर दिला.वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शनाच्या वेळी त्यांनी त्यांच्या चुका आम्हास सागिंतल्या जेणेकरुन त्या चुका आमच्याकडुन होऊ नयेत.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम नेहमी त्यांच्या भाषणातून सांगायचे, "माणसाने स्वप्न नेहमी मोठी बघावीत" अगदी याचप्रमाणे सीमा यांचही स्वप्न डी. वाय. एस.पी होण्याचं होत परंतू काही गोष्टी आपल्याला हव्या असल्या तरी त्या मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी निराश न होता, हे मोठं स्वप्न थोडसं बाजुला सरकावून प्रथम परिस्थीतीला उत्तर देण्यासाठी त्यांनी पी.एस.आय ही पोस्ट मिळवली.
तसं पाहिलं तर अश्रु आणि घामाची चव चाखली तर अगदी सारखीच असते मग आपण नक्की कोणती चव चाखायची हे ज्यांच त्यानं ठरवायचं.. असा अमूल्य बोध त्यांच्या प्रवासातुनच शिकायला मिळाला
ज्यावेळी त्या त्याचां तो प्रेरणादायी जीवनप्रवास आमच्यासमोर मांडत होत्या त्यावेळी माझ्या डोळयातून नकळत अश्रु वाहु लागले.मला वाटलं कदाचीत त्यांचेही डोळे पाणावले असतील म्हणुन मी स्क्रीनचा ब्राइटनेस थोडा वाढवून पाहिला, परंतु व्यर्थ ,, माझा अंदाज पुर्णपणे खोटा ठरलेला, यशाच शिखर गाठण्यासाठी केलेली मेहनत आणि परिस्थीतीशी दोन हात करण्यासाठी केलेल्या कष्टाच्या घामाची चव त्यांनी चाखली होती. त्यामुळे फक्त आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावने अशक्यच!
सकारात्मकता आणि ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छाशक्ती, त्याचबरोबर प्रयत्नांना कष्टाची जोड देत त्यांनी त्याचं ध्येय साध्य केलं. हे त्याच्यांकडे पाहताचक्षणी लक्षात येतं.
परिस्थीतीला दोष देऊन अश्रु गाळण्यापेक्षा, तिच्यामध्ये बदल करण्यासाठी कष्टाचा घाम गाळला तर असाध्य ते साध्य होऊ शकते... हे तर त्यांचा जीवनप्रवासच सांगुन जातो .
त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास प्रत्येकास नकारात्मकतेकडून सकारात्मकडे जाण्यासाठी भाग पाडेल असाच आहे...
🖋🖋कु.मयुरी ढेबे
ज्ञानदीप कॉलेज खेड,रत्नागिरी .