Bluepad | Bluepad
Bluepad
जोडीदाराला प्रत्येक वेळी सॉरी बोलणं कसं महागात पडतं
R
Rohan Bapat
22nd Jun, 2022

Share

"सॉरी ना.. अजून किती राग धरणार आहेस? सोडून दे....”
"सॉरी बाबा, आता तू म्हणशील तसं करेन मी."
"कितीवेळा सॉरी म्हणू तूच सांग." हे असं तुम्ही नेहमी म्हणत असाल तर ते जितक्या वेळा म्हणाल, तितकेच कमी आहे लक्षात ठेवा. कारण नात्यात काहीजणांना प्रत्येकवेळी सॉरी म्हणायची सवय असते. एखादी छोटी गोष्ट जरी असेल तरी अशा व्यक्ती आपल्या जोडीदाराला राग येऊ नये म्हणून लगेच माफी मागतात. मात्र तुमची ही सवय तुम्हाला पुढे जाऊन महागात पडू शकते याचा तुम्हाला अंदाज नसतो. काहीजण चांगुलपणापोटी किंवा नात्यात वाद नको म्हणून सॉरी म्हणतात. पण इथे तुम्हाला तुमच्या या वागण्यावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे. गरज नसेल तिथे सुद्धा माफी मागू लागलात तर तुमची ही सवय तुमच्याच अंगलट येऊ शकते, हे विसरू नका.

जोडीदाराला प्रत्येक वेळी सॉरी बोलणं कसं महागात पडतं

काहीजण म्हणतील माफी मागितल्याने तर वाद संपतो, गैरसमज दूर होतात. दोन लोक मनाने जवळ येतात. या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर आहेत. त्यामुळेच आपण सॉरी म्हणतो हे देखील सत्य आहे. मात्र ते सॉरी कितीवेळा आणि कधी म्हणायचे हे सुद्धा महत्वाचे असते. बरे वाटत नाही म्हणून आपण औषध घेतो. त्या औषधाचा जास्त डोस झाला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तसेच हे पण आहे. तुम्ही जर उठ सुठ जोडीदाराला सॉरी म्हणू लागलात तर तुमच्या सॉरीला काहीच किंमत राहणार नाही. अशावेळी आपला जोडीदार आपल्याला कोणत्याही गोष्टीवरून सॉरी म्हणतो म्हणून ते तुम्हाला फार गंभीरपणे घेणार नाहीत. तिला किंवा त्याला सॉरी म्हणायची सवयच आहे असे समजू लागलीत. ही गोष्ट तुमच्या आत्मसन्मानासाठी घातक असते.

तुम्ही जर नात्यात वाद होऊ नये म्हणून स्वतःची चूक नसताना देखील माफी मागत असाल तर तुमची किंमत कमी होतेच. शिवाय नेहमी तुम्ही पुढाकार घेऊन नसलेली चूक मान्य करता यामुळे जोडीदार तुम्हाला गृहीत धरू लागतो. वाद कोणत्याही गोष्टीवरून झाला आणि चूक त्यांची जरी असेल तरी तुम्हीच सॉरी म्हणायचे, अशी अपेक्षा ते करू लागतात. आणि जर कधी तुम्ही स्वतःहून बोलायला गेला नाहीत तर मग हा वाद ते सुद्धा संपवत नाहीत. यावरून गोष्टी अहंकारावर येतात. एकदा का नात्यात अहंकार आला की ते नातं खराब होऊ लागतं. दोघांमधील प्रेम सुद्धा मग विरायला लागतं. त्यामुळे प्रत्येकवेळी माफी मागण्याची सवय मोडायचा प्रयत्न करा.

सारखे सॉरी म्हणून तुम्ही जर त्यांचे मन जिंकायचा प्रयत्न करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कायम चुकीचे असता अशी त्यांची धारणा होऊ लागेल. एकदा का त्यांच्या मनात ही गोष्ट बसली की तुमच्या सॉरीला देखील काही अर्थ उरत नाही. अशा व्यक्ती समजू लागतात की, माझा जोडीदार नेहमी चूक करतो किंवा करते आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी माफी मागतात. त्यामुळे तुमची चूक नसेल किंवा पडकी बाजू नसेल तरी देखील या टीकेचा सामना तुम्हाला करावा लागतो. ही गोष्ट तुमच्यासाठी जास्त अपमानास्पद ठरू शकते.

आपल्या सतत माफी मागण्याने जोडीदाराला आपण मनापासून दुःखी आहोत की दाखवण्यासाठी सॉरी म्हणतोय, असा संशय सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे कधी पोटतिडकीने जरी तुम्ही जोडीदाराला माफी मागितली तरी त्यांचा यावर विश्वास बसत नाही. म्हणूनच सॉरी म्हणायला देखील योग्य कारण आणि परिस्थिती असायला हवी. घाईमध्ये तुमच्या बोटाला सूरीमुळे कापलं आणि तुम्ही यावर नवऱ्याला, "सॉरी, माझ्यामुळे तुला उशीर होत आहे. डबा करायला लेट झाला." असं म्हणू लागला तर तो नवरा तुम्हाला सॉरी म्हणताय म्हणून वेड्यात काढेल. कारण त्याच्या पाच मिनिट झालेल्या उशिरापेक्षा तुमचे कापलेले बोट महत्वाचे असते. त्यामुळे आपण कधी आणि का सॉरी म्हणतोय, हे देखील जाणून घ्या. लेखात सांगितलेल्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला कळेल जोडीदाराची सतत माफी मागणे तुम्हाला कसे महागात पडते. लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.

565 

Share


R
Written by
Rohan Bapat

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad