Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाळ्यातील पर्यटनासाठी मला आवडणारे पर्यटन स्थळ -माळशेज घाट
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
22nd Jun, 2022

Share

पावसाळ्यातील पर्यटनासाठी मला आवडणारे पर्यटन स्थळ -माळशेज घाट
लेखक ऑफ द वीक
निसर्गाची सुंदर वाट! आहे माळशेजचा घाट!
जेथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते आणि तेथे गेल्यावर घराकडे मन परत यायला नाही म्हणते अशी काही मोजकी ठिकाणं महाराष्ट्र भूमीवर आहेत त्यापैकी पर्यटकांना हवाहवासा वाटणारा माळशेज घाट एक आहे. फिटते डोळ्यांचे पारणे! तेथे तेथे नित्य पर्यटन करणे!पावसाळ्यातील नयनरम्य वातावरण डोळ्याचे पारणे फेडणारे असते. महाराष्ट्रातील बहुतेक निसर्गप्रेमी पर्यटक आज-काल माळशेज घाटामध्ये जाणे पसंत करतात. पावसाळ्यातील सर्वोत्तम आनंद देणारे ठिकाण म्हणजे माळशेज घाट होय. नगर-कल्याण मार्गावर असलेला हा दर्जेदार देखणा निसर्ग माळशेज घाट आहे. महाबळेश्वर सारखेच प्रचलित झालेले हे पर्यटन स्थळ पर्यटकांना नेहमीच खुणावते. पावसाळ्यातील येथील भटकंती करणे म्हणजे खरोखर निसर्गाची अनमोल देण आहे. असे वाटल्याशिवाय राहत नाही. गर्द हिरवळ पसरली दशदिशा! झरे वाहती गाणे गाती पल्लवीत होती आशा!हिरवेगार डोंगर रांगा ,धुक्याची दुलई पांघरलेले ढगाळ आभाळ आच्छादित प्रसन्न आकाश, नजर जावे तिकडे हिरवळ आणि कोसळणारे धबधबे, मन उल्हासित करणारे गारेगार थंड हवा, कोसळणाऱ्या धबधब्याखाली तासनतास ओलेचिंब व्हावेसे वाटते असे निसर्गरम्य ठिकाण खरोखर आनंददायी आहे.
जेव्हा पावसाळा सुरू होतो ह्या वेळेला येथे जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. भरपावसात चिंब चिंब भिजून ओले होत आनंद अनुभवण्याची उत्तम स्वर्गीय जागा म्हणजे हा माळशेज घाट आहे. स्वर्गीय सुखाची अनुभूती! नयनरम्य स्थळ जगती! माळशेज घाटात जिथे जाते! येई स्वर्गीय सुख आनंद!!नगर-कल्याण रस्त्यावरील नेत्र सुखद माळशेज घाट पर्यटकांच्या गर्दीचे केंद्र झाले आहे. याच घाटावर खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आनंददायी आहे. या माळशेज घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात येतो तर घाटाखालील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून हा प्रसिद्ध असा घाट चैतन्य निर्माण करणारा आहे. पर्यटकांची दिवसेंदिवस येथे गर्दी वाढत चालली आहे. एक दिवसाच्या सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या माळशेज घाटात आले पाहिजे.
प्राणी पक्षी हिंडती चराचरी! पाहता आनंद ये हृदय मंदिरी! निसर्ग कैसी किमया करी! अद्भुत आनंददाता!!येथील डोंगर रांगा, हरिश्चंद्रगड, घनदाट जंगल, जंगलातील प्राणी, धरणावर आलेले फ्लेमिंगो नावाचे परदेशी पाहुणे ज्याला रोहित पक्षी असे म्हणतात, आजूबाजूला असलेले हिरवे शेत, कोसळणारे धबधबे, या धबधब्यात मधून निघणारा मधुर संगित्मय आवाज खरोखर मन उल्हासित करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !पक्षीही सुस्वरे आळविती!! याची शब्दशः अनुभूती जर घ्यायची असेल तर निश्चित आपण भर पावसाळ्यात माळशेज घाटाची सफर केली पाहिजे.
पुण्याहून नारायणगाव मार्गे आपल्याला येथे येता येते. किंवा मुंबई कल्याण मुरबाड मार्गे येथे येण्यासाठी चांगला रस्ता आहे. आळेफाटा येथून माळशेज घाट जवळच आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून सुद्धां माळशेज घाटात येता येते. नाशिक हुन सुद्धा येथे येण्यासाठी मार्ग आहे.
माळशेज स्वर्गभूमी समान! निसर्ग स्थळ मनभावन! सुंदर गर्द हिरवे देखने वन! नवलाई निसर्गाची!! महाराष्ट्राचे स्वर्गभूमी आणि स्वर्गीय आनंद देणारे काश्मीर सारखेच सुंदर असे हे स्थळ खरोखर मनभावन असेच आहे. रस्त्याने चालत असताना डोंगर रांगांचे आणि हिरवाईने नटलेल्या वनराईचे चे दर्शन होते ते डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. माळशेज घाटाची विलोभनीय सुंदरता या डोंगर रांगांमध्येच आहे.
पर्यटनाचा मनाशी छन्द! भेट देता जळी स्थळी आनंद!माळशेज घाटातून नाशिक कडे येण्यासाठी सुद्धा एक मस्त रस्ता आहे. रस्त्याने येत असताना आदिवासी लोकांची लहान लहान गावे लागतात. आदिवासी लोकांची असलेली कौलारू घरं, गावाशेजारी असलेली त्यांची भाताची शेती, शेतीच्या लहान-लहान तुकड्यांवर भात लागवड करत असताना दिसणारे आदिवासी बंधू-भगिनी खरोखरच प्रेमळ आहेत.
याच परिसरातील लहान लहान विक्रेते माळशेज घाटात याठिकाणी चहा, भजी,वडे विकताना दिसतात. गरमागरम भट्टीवर ताजे ताजे भाजलेले मक्याचे कणीस, त्यावर मीठ आणि लिंबू पिळून त्याला आलेली चव पर्यटकांना हवीहवीशी आणि खावीखावीशी वाटते.
(आपण पर्यटनासाठी हजारो रुपये खर्च करतो. या पर्यटनस्थळी आदिवासी बंधू-भगिनी रानमेवा किंवा इतर खाण्यापिण्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवतात. गरज नसली तरी ते आपण त्यांच्याकडून घ्यावे. त्यांच्या चरितार्थासाठी तेवढाच आपला हातभार लागतो.)
निसर्गाने मानवाच्या आनंदासाठी जी काही योजना आखली आहे त्यापैकीच भव्य दिव्य आणि नेत्रदीपक आणि नेत्रसुखद म्हणजे माळशेज घाट आहे. माळशेज घाट मला अतिशय आवडतो. निसर्ग देवाच्या पंचतत्वाच्या रूपाचे तेथे निर्भय दर्शन होते. तर असे आहे मला भर पावसाळ्यात आवडणारे पर्यटन स्थळ माळशेज घाट!
संसाराची मना पडते भूल ,मन धावते सैराट!
आवडतो मज मन मोहित करी, जो माळशेज घाट!!
धन्यवाद!

217 

Share


श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
Written by
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad