सगळेच जण आपल्याला आनंदी राहा, सकारात्मक राहा असं सांगत असतात. आनंदी राहणंच म्हणजेच सकारात्मक असणं असं माझ्यासकट तुम्हालाही वाटत असेल तर जरा थांबा. कारण तुमची काहीतरी गफलत होत आहे. कारण आनंद आणि सकारात्मकता यामध्ये कमालीचा फरक आहे. हाच फरक आज या लेखातून जाणून घेऊ.
१. आनंद ही एक भावना आहे, सकारात्मकता एक मानसिकता आहे.
आनंद हा क्षणभंगुर असतो. तुमच्यासमोर तुमचा आवडता पदार्थ दिसला, तुम्हाला कोणी छान भेटवस्तू दिली तर आपण आनंदी होतो. पण ती भावना काही क्षणापुरतीच मर्यादीत असते. छान छान गोष्टी घडत गेल्या की तो आनंद द्विगुणित होतो. पण चांगला काळ सरला की आनंद कमी होत जातो तसं सकारात्मकतेचं नसतं. तुम्ही जरी दुःखात असाल, कठीण काळ चालू असेल पण तरीसुद्धा तुम्ही त्याला हसत सामोरे जात असाल तर तुमची मानसिकता सकारात्मक आहे असा त्याचा अर्थ होईल.
२. आनंद नियंत्रणाबाहेर असतो व सकारात्मकता ही निवड आहे.
कधी कधी इतक्या चांगल्या, आश्चर्यकारक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात की आपला आनंद गगनात मावत नाही. एवढा आनंद होऊन कितीतरी जणांना हर्षवायू होतो. कारण ते आपला आनंद नियंत्रणात ठेवू शकत नाही. आनंदाची कोणतीही परिसीमा माहिती नसल्याने गोष्टी हाताबाहेर देखील जातात. या उलट आपण अगदी दुःखी, आनंदी, संकटात, अपयशात असलो तरी आपण सकारात्मकता निवडू शकतो. आशावादी राहणं केव्हाही चांगलच असतं. जर आपण आशावादी राहणं निवडत असू तर कायम जगण्याची उमेद वाढत जाईल हे निश्चित. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकता ही आपली निवड हवी आणि आनंद हा नियंत्रणात असायला हवा.
३. आनंद म्हणजे ध्येय, सकारात्मकता म्हणजे स्वीकारणं.
आनंद हे माणसाचं ध्येय असतं. त्यासाठीच त्याची रोज धडपड चालू असते. परंतू एवढी धडपड करुनही हे ध्येय साध्य होतेच असे नाही. मनासारखे करिअर, जोडीदार, नोकरी या गोष्टी साहजिकच आनंद देऊन जातात पण हे ध्येय प्रत्येक जण साध्य करूच शकेल याची शाश्वती नसते. याउलट सकारात्मकता म्हणजे जर आनंद मिळाला नाही तरी आहे त्या परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करून पुढे चालत राहणं. तुम्ही आनंदी आहात की दुःखी ही मानसिक स्थिती तुमच्या स्वीकारण्यावर अवलंबून असते.
४. आनंद म्हणजे स्वभाव, सकारात्मकता म्हणजे कौशल्य.
आनंदी राहणे हा माणसाचा स्वभाव असतो. आनंदी राहणे हा मुळात एक स्वभाव आहे जो वारशाहक्का सारखाच प्रत्येकाला मिळायला हवा. उदासीनतेवर मात करण्यासाठी अशा स्वभावाचा खूप फायदा होऊ शकतो. तर याउलट प्रेरणादायी राहणं, सकारात्मकता अनुभवत राहणं हे एक कौशल्य आहे. चिंताग्रस्त स्थितीत जर आपण असू तर एक प्रकारची भीती वाटून आपले मनोबल खचते. तर ते सतत उंचावत ठेवण्यासाठी असे कौशल्यच कामी येऊ शकते.
काय मग, समजला ना आनंदी असणं आणि सकारात्मक असण्यातला फरक? मग हाच फरक तुमच्या जगण्यात सुद्धा घेऊन या. भावना आणि मानसिकता यात उत्तम ताळमेळ साधा. जीवनाला एक आकार द्या आणि एक महत्वपूर्ण, समृध्द आयुष्य जगा.