Bluepad | Bluepad
Bluepad
त्या 'सायको'पासून कधी सुटकारा मिळेल असं झालेलं!
V
Varsha Godbole
22nd Jun, 2022

Share

"ना दौलत के पीछे ना शौहरत के पीछे, हम तो पागल हैं सनम तेरी मोहोब्बत के पीछे." पांढऱ्याशुभ्र कागदावर लाल रंगाने बहुतेक रक्तानेच लिहिलेलं हे वाक्य मी पाहिलं आणि काळजात धस्स झाले. कॉलेजला जात असताना एका लहान मुलाने मला तो कागद आणून दिला होता. मी तो प्रकार पाहिल्यावर मला चांगलाच घाम फुटला. मी रिक्षाला हात दाखवला आणि कॉलेजला गेले. माझ्या मैत्रिणीला हा सगळा प्रकार सांगितल्यावर ती हसू लागली. म्हणाली, "अगं हे असलं तर आपण सिनेमात पाहतो ना. तुझ्यासोबत खरं घडलं. काश मेरा भी कोई ऐसा मजनू हो जो मुझे अपने खून से लेटर लिखे." तिच्या या वाक्यावर आम्ही दोघी हसू लागलो आणि तो विषय तिथेच संपला.

दोन दिवसांनी मी बस स्टॉपला थांबल्यावर माझं लक्ष अचानक तिथं बाजूला असलेल्या गाडीवर गेलं. ती गाडी अनेक दिवसांपासून धूळ खात तिथेच उभी असायची. गाडीच्या मागच्या काचेवर मोठ्या अक्षरात "आय लव्ह यु पियू" असं लिहिलेलं वाचून माझी धडधड वाढली. मी पटकन फोन काढला आणि मैत्रिणीला तिथे बोलवून घेतले. त्यावेळी आम्हा दोघींना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले.

 त्या 'सायको'पासून कधी सुटकारा मिळेल असं झालेलं!

दुसऱ्या दिवशी मी माझ्या भाच्याला शाळेत सोडायला निघाले असताना मला वाटेत रस्त्यावरच पांढऱ्या रंगाने "पियू तू फक्त माझी आहेस..." हे वाचायला मिळालं. मी तशी रडूच लागले. माझा कोणीतरी पाठलाग करतंय, या भीतीने थरथर कापू लागले. भाच्याला घेऊन सरळ घरी गेले. भावाला काही सांगितले तर माझं कॉलेज बंद होईल म्हणून मी गप्प बसले.

माझ्यासोबत असं कोण करतंय मला कळायला मार्ग नव्हता. चार दिवस काहीच घडलं नाही. मात्र पाचव्या दिवशी मला पुन्हा बसस्टॉपवर फुटपाथवर फिरणाऱ्या लहान मुलाने गुलाबाचे फुल आणून दिले. मी त्याला विचारले, ‘तुला हे कोणी दिलं?’ तर त्याने मागे वळून इशारा केला. बाईकवर बसलेला एक मुलगा मला दिसला. स्पाईक हेअर, काळा गॉगल घालून बोटाने चावी फिरवत तो माझ्याकडेच पाहत होता. पण आता घाबरायचे नाही तर त्याचा सामना करायचा हे मी ठरवले. त्याला इकडे ये म्हणून बिनधास्त बोलावले.

तो लगेच गाडी वळवून आला. "काय मग, कसा वाटला आपला प्रपोज करायचा अंदाज? हाय की नाय हटके?" त्याचे हे शब्द ऐकूनच एक कानाखाली द्यावी असं वाटले. मात्र मी स्वतःला खूप शांत ठेवलं. त्याला सरळ भाषेत सांगितलं, "हे बघ माझ्या नादी लागू नकोस. असले प्रकार बंद कर. नाहीतर मी पोलिसात तक्रार देईल." आणि मी निघाले.घरी पोहचत नाही तोवर त्याचा मला फोन आला. माझा नंबर त्याला कुठून मिळाला देव जाणे. फोनवर तो एकच वाक्य म्हणाला, "असं काय करतेस, मला लव्हशिप देना." तेव्हा मला त्याची किळस आली. मी नंबर ब्लॉक केला. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. तिथून परतत असताना त्याने मला बरोबर गाठले. "मला हो म्हण नाहीतर आत्ता नस कापून घेईन" असं म्हणून त्याने ब्लेड काढले. आजूबाजूला रस्त्यावर कोणीच नव्हते. मी घाबरून गेले.

माझ्या फोनमध्ये "दामिनी" अप्लिकेशन होते. मी त्यावर क्लिक केले. मदत होईल की नाही, याची शाश्वती नव्हती पण तरीही पोलिस येईपर्यंत त्याच्याशी शांतपणे बोलत राहिले. त्याने ब्लेड टाकून दिले. जवळपास पंधरा मिनिटे त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. तितक्यात पोलिसांनी माझं लोकेशन ट्रेस केले आणि ते आले. सगळा प्रकार पोलिसांना सांगितल्यावर त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो.

त्याच्या घरच्यांना बोलावून घेतले. पुन्हा मला त्रास देणार नाही, असं त्याच्याकडून लिहून घेतले. तसेच आत्महत्येचा प्रयत्न आणि मुलीला धमकी, तिला मानसिक त्रास दिला अशा केस त्याच्यावर दाखल झाल्या. पोलिसांनी मला "काही काळजी करू नकोस! आम्ही असताना तुला आता त्रास होणार नाही.’ असं आश्वासन दिलं तसा मी सुद्धा सुटकेचा श्वास सोडला. पण शेवटी कुठे एकटी जात असेन तेव्हा मनात थोडी भीती, साशंकता वाटतेच. कधीकधी वाटतं, कुटुंबातील किंवा बाहेरील लोकं जसं मुलींना बाहेर सांभाळून रहायला सांगतात तसं मुलांना का सांगत नाहीत, कोणत्या मुलीला त्रास होईल असं वागू नये म्हणून? तुमच्याकडे आहे का या प्रश्नाचं उत्तर?

502 

Share


V
Written by
Varsha Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad