Bluepad | Bluepad
Bluepad
तुम्ही भावनिकदृष्ट्या बुद्धिमान आहात का, पहा!
A
Ashwini Kawale
22nd Jun, 2022

Share

इंटेलिजंट हा शब्द आपण एखाद्या बुद्धिमान व्यक्तीबाबत सहज वापरतो, ऐकतो. पण इमोशनली इंटेलिजंट म्हणजेच भावनिकदृष्ट्या बुद्धिमान / हुशार लोकांबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यामुळे आपल्यालाही त्याबाबत फारशी माहिती नसते. म्हणूनच या लेखातून आपण भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. या लेखाच्या शेवटी तुम्ही स्वतः भावनिकदृष्ट्या बुद्धिमान आहोत का, हेदेखील ओळखता येऊ शकेल त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोकांचं वैशिष्ट्य काय असतं?
जी माणसं भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असतात ते स्वतःच्या भावनांबरोबर इतरांच्या भावनादेखील समजून घेतात. म्हणूनच भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या एखाद्याच्या भावना, तसेच इतरांच्या भावना जाणून घेण्याची, मूल्यांकन करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता अशी केली जाते. त्या क्षमतेमध्ये चार प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

तुम्ही भावनिकदृष्ट्या बुद्धिमान आहात का, पहा!

१. स्वतःच्या आणि इतरांमधील भावना अचूकपणे जाणणे.
२. तर्कशुद्ध आणि स्पष्टपणे विचार करण्यासाठी भावनांचा योग्य वापर करणे.
३. भावनिक अर्थ समजून घेणे.
४. भावनांचे व्यवस्थापन करणे.
भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोकांच्या काही प्रमुख सवयी आहेत ज्यावरुन आपण त्यांना ओळखू शकतो. तसेच या सवयी आपल्यात असतील तर आपणदेखील भावनिकदृष्ट्या बुद्धिमान आहोत असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल. त्या सवयी कोणत्या ते आता आपण पाहू.

. ही माणसं स्वतःबरोबर इतरांच्या भावनांबद्दल जागरूक असतात. कोणत्याही विचारांशी भावनांचे संतुलन त्यांना साधता येतं. इतरांच्या भावना समजून घेत इतरांवर प्रभाव कसा पाडावा व त्यांना प्रभावित कसं करावं याचंही उत्तम ज्ञान अशा माणसांना असतं.

. भावनांना हाताळणं अशा माणसांना अतिशय चांगल्या पद्धतीने जमतं. भावना या क्षणिक आहेत, काहीवेळा त्या फक्त विचारांमधून तयार झालेल्या असतात त्यामुळे त्यांच्या आहारी जाऊन कोणतंही पाऊल उचलू नये याची जाणीव अशा माणसांमध्ये असते.

. अशा माणसांकडून भावनिकदृष्ट्या चूक होतच नाही असं अजिबात नाही. पण चुकांमधून शिकण्याची क्षमता त्यांच्यात असते. कधीकधी आपण तर्कशुद्ध दृष्टिकोन बाजूला ठेवून भावनिक दृष्टीकोनातून व्यक्त होतो. याचा नंतर आपल्याला पश्चातापही करावा लागू शकतो. म्हणूनच भावनिकदृष्ट्या बुद्धिमान माणसं स्वतःच्या वर्तनाचा अभ्यास करतात आणि मगच व्यक्त होण्यावर भर देतात. अनुभवातूनही हे शहाणपण अनेकांमध्ये येतं.

. भावनिक बुद्धिमत्तेतील सर्वात महत्त्वाचे सामाजिक कौशल्य म्हणजे ऐकण्याची क्षमता. अशी माणसं चांगले श्रोते असतात. इतर व्यक्तींचं काय म्हणणं आहे, याबद्दल त्यांची काळजी या वर्तनातून दिसून येते. अशा वर्तनातून लोकांशी त्यांचा उत्तम सलोखा निर्माण होतो.

. भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोकांमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी आवश्यक मोकळेपणा दिसून येतो. नवीन लोकांना भेटण्यात आणि नवीन अनुभव घेण्याची इच्छा त्यांच्यामध्ये असते. सामाजिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकसित होण्याची इच्छा त्यांना असते.

. भूतकाळात राहणे किंवा भविष्याबद्दल काळजी करणे हे प्रतिकूल आहे याची जाणीव या लोकांमध्ये असते. स्वतःला जागरूक राहण्यासाठी आणि आता जे घडत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी आवश्यक सर्व क्षमता या लोकांमध्ये दिसून येतात.

. इतरांशी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय त्यांच्या स्वभावातली लवचिकता दाखवते. म्हणून त्यांना लवकर बदल स्वीकारता येतात. या स्वभावामुळेच ते अधिक मोकळेपणाने आणि आनंदाने जगू शकतात. कारण जिथे स्वीकारण्याची वृत्ती असते तिथे तक्रारी कमी असतात. परिणामी आनंद, समाधान जास्त असते.

. अशा माणसांना इतरांबद्दल सहानुभूती असते. दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे समजून घेत ते त्यांची काळजी घेतात. संबंध टिकवायचे असतील तर समजून घेत वागलं पाहिजे हे समजण्याची हुशारी अशा माणसांमध्ये व्यवस्थित दिसून येते.

. कम्फर्ट झोनमध्ये अडकणं हे भावनिकदृष्ट्या दुबळ्या व्यक्तीचं लक्षण आहे. म्हणूनच भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोकं स्वतःच्या विकासासाठी गरज पडेल तेव्हा लगेचच कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतात. स्वविकासासाठी जोखीम घ्यावी लागली तरी ते त्याचा धाडसाने सामना करतात.

चांगल्या भावनिक बुद्धिमत्तेमुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. अशी माणसं गैरव्यवहार, हिंसा, विघातक कृतींपासून दूर राहतात. त्याऐवजी निरोगी नातेसंबंध, सकारात्मक सामाजिक परस्परसंवाद, समाधानकारक करिअर आणि वैयक्तिक गोष्टींच्या आनंदावर त्यांचा भर असतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता ही इतर कोणापेक्षाही उत्तम असते. तुम्ही भावनिकदृष्ट्या बुद्धिमान आहात का हे तपासण्यासाठी लेखातले किती मुद्दे तुम्हाला लागू होतात हे नक्की तपासा. लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.

507 

Share


A
Written by
Ashwini Kawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad