Bluepad | Bluepad
Bluepad
लहानपणीच्या घटनांचा पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो तेव्हा...
A
Apurva Gokhale
22nd Jun, 2022

Share

लग्न झाल्यानंतर आज कुठे आम्ही निवांत मोकळा श्वास घेत होतो. आत्ता सगळे पाहुणे आपापल्या घरी गेल्याने पहिल्यांदाच आम्हा दोघांना एकांत मिळाला होता. आयुष्याची एकत्र सुरुवात करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. अरेंज मॅरेज असलं तरी आमच्यातला संवादामुळे आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळख आहोत असंच वाटायचं. मी माझ्याच विचारात असताना अचानक त्याने मला हाताला पकडून अलगद जवळ घेतले. त्यावेळी माझ्या हृदयात धडधड वाढू लागली. पण ही अस्वस्थता गुलाबी प्रेमाच्या क्षणांची नव्हती. मी आतून थरथरू लागले. त्याने माझ्या कमरेत हात घालून मला किस करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला जोरात ढकलून बाजूला झाले. मी असं का केलं हे त्यालाही समजले नाही. त्याचा चेहरा पडला.

लहानपणीच्या घटनांचा पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो तेव्हा...

"सॉरी, माझं चुकलं" असं म्हणून तो मान खाली घालून बाहेर निघायला लागला. तशी मी ओकसाबोक्शी रडू लागले. आता त्याला समजले की, काहीतरी गडबड आहे. त्याने मला पटकन किचनमधून पाणी आणून दिले. मला शांत करून जवळ घेतले. त्याने काय झालं असं विचारल्यावर माझा भूतकाळ माझ्यासमोर येऊन थांबला. त्याला काय सांगू आणि कस व्यक्त होऊ मला प्रश्न पडला. तो मला समजून घेईल का? माझ्याबद्दल काय विचार करेल, मला सोडून तर देणार नाही ना असे कितीतरी प्रश्न मनात सुरु होते.

तेवढ्यात त्याने मला हलवले आणि काय झालं, असं विचारून भानावर आणले. नात्याचा पाया विश्वासावर अवलंबून हवा असेल असेल तर त्याला सत्य कळायला हवं, हे ठरवून मी माझा भूतकाळ त्याला सांगू लागले. "मी दहा वर्षांची असताना माझ्या बाबांच्या एका मित्राच्या घरी खेळायला जायचे. त्यांची मुलगी पण माझ्या शाळेत होती. आम्ही दोघी फ्रेंड्स असल्याने एकमेकींच्या घरी येणं-जाणं होतं. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या काकांनी मला जवळ घेतले. त्यांच्या मांडीवर बसवले. त्यांचा तो स्पर्श मला तेव्हाच विचित्र वाटला. मी उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले होते.

त्यानंतर काही दिवस मी त्यांच्याकडे गेलेच नाही. एकदा आई-बाबा गावाला जाणार होते. माझी परीक्षा होती म्हणून त्यांनी मला पुन्हा त्या काकांच्या घरी रहायला पाठवले. त्याच रात्री मी झोपले असताना ते आमच्या खोलीत आले. त्यांनी झोपेतच माझ्या ओठांचे चुंबन घेतले. मी घाबरून उठले. त्यावेळी त्यांनी माझे तोंड दाबून मला गप्प केले. हे मी कोणालाच सांगू शकले नाही. पुढचे दोन्ही दिवस त्यांनी माझ्यासोबत तेच केले.

लहानपणी घडलेली ही गोष्ट माझ्या डोक्यातून खूप दिवस गेली नाही. मात्र काळाच्या ओघात मी तो अनुभव विसरून गेले. आज तू माझ्या जवळ येऊन जेव्हा किस करण्याचा प्रयत्न करू लागलास तेव्हा मला ती कटू गोष्ट आठवली. मला माफ कर पण मी तुझ्यासोबत किस करताना कम्फर्टेबल नाही होऊ शकत. मला यातून सावरण्यासाठी थोडा वेळ दे. असं मी त्याला म्हणाले. त्याने सुद्धा ही गोष्ट समजून घेतली. त्यानंतर मात्र अनेकदा आमच्या दोघांना एकत्र यायचे मनात असून देखील माझ्या या भूतकाळामुळे आम्ही शरीराने एकत्र येऊ शकत नव्हतो. आमच्यात फिजिकल अटॅचमेंट नव्हती. यामुळे नात्यात त्याची कधीकधी चिडचिड व्हायची. आमच्या आयुष्यातील सुंदर रोमँटिक क्षण सुद्धा आम्ही खराब करून टाकायचो.

मला काय वाटेल म्हणून तो सुद्धा त्याच्या भावनांवर खूप कंट्रोल करायचा, या गोष्टी मला दिसत होत्या. शेवटी मी समुपदेशकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे एका नामवंत कौन्सिलरकडे गेलो. त्यांच्याशी बोलल्यावर मनावरचे ओझे उतरले . "भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा ताण मनावर असतो. मात्र त्यांना आपल्या भावनांवर किती हावी होऊ द्यायचे हे आपल्या मनावर आहे. तुम्ही जर ठरवले तर आज या क्षणाला देखील तुमचा भूतकाळ आयुष्यातून काढून टाकू शकता. मात्र त्यासाठी तुमच्या मनाची ताकद फार मोठी असावी लागते. एकदा दोघे जवळ येऊन बघा. प्रत्येक स्पर्श हा सारखा नसतो. त्याच्या स्पर्शातून तुला प्रेम आणि आपलेपणा मिळेल ज्यामुळे तू भूतकाळ विसरशील." असे जेव्हा समुपदेशकांनी सांगितले तेव्हा मी यातून बाहेर पडण्याचा निश्चय केला. त्यामुळेच आज आम्ही दोघे एका सुंदर नात्यात आमच्या प्रेमाचा पुरेपूर अनुभव घेत आहोत.

510 

Share


A
Written by
Apurva Gokhale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad