वागायचे तरी कसे ?
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे संत वचन शिरोधार्य असले तरी व्यवहारात ९९ टक्के माणसे तसे वागत नाहीत. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तसेच माणसांचे असतं. आपण माणसंही मनात एक ठेवतो आणि बाहेर वेगळे दाखवतो, वेगळे बोलतो. माणूस माणसाला नेमकं ओळखू शकत नाही. त्यामुळे कोणाशी कसं वागायचं हा मोठाच प्रश्न असतो. फक्त कुटुंबाच्या बाहेरच्या मोठ्या परिघात वावरतांना ही अडचण जाणवते असे नाही, घरातही एकमेकांशी कसं वागावं हा मोठा प्रश्न असतो. लहान मुलांना मोठी माणसं कधी म्हणतात,' घोड्या! एवढा मोठा झाला आहेस, तुला एवढंही कळत नाही का?', तर कधी म्हणतात ,'तू अजून लहान आहेस बाळा, तुला यातलं काही कळणार नाही.' कधी घोड्या तर कधी बाळा! बिचाऱ्या मुलांची नेहमीच पंचाईत.आपण लहान आहोत की मोठे आहोत हेच कळत नाही. त्यांनी वागायचं तरी कसं?
वास्तविक हा प्रश्न फक्त लहान मुलांपुरताच मर्यादित नाही.
वेगवेगळ्या भूमिका जगताना प्रत्येकालाच हे प्रश्न पडतात व उत्तरे शोधून त्याप्रमाणे वागताना तारेवरची कसरत करावी लागते.
पिंडे पिंडे मतिर्भिन्न: या न्यायाने दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतातच. त्यातही कोणी मोठे असतात, कोणी लहान असतात. कधी पिढ्यांचे अंतर असते, तर कधी समवयस्कातही वैचारिक अंतर असते. कोणी कुणा पुढे झुकावं हा गहन प्रश्न असतो कारण अहंकार सगळ्यांनाच असतो. त्यात बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे ही महत्त्वाचेच.
त्यामुळे कितीही चांगले वागायचे ठरवले तरी सगळ्यांची मर्जी आपण राखू शकत नाही. त्यामुळे व्यवहाराला धरुन, तारतम्याने व समंजसपणे वागावे. या बाबतीत एक तत्व फार उपयुक्त ठरते. ते की मोठ्यांशी वागताना लहान व्हावे आणि लहानांशी वागताना मोठे व्हावे. म्हणजे असे की मोठ्यांशी वागताना बोलण्या- वागण्यात नम्रता असावी. त्यांचा आदर ठेवावा. तुमचे शिक्षण कितीही जास्त असले तरी मोठ्यांचा जीवनानुभव जास्तच असतो. लहानांशी वागताना मोठे व्हावे याचा अर्थ हुकूमशाही किंवा वर्चस्व गाजवणे नाही तर वडिलकीच्या नात्याने वागावे, मार्गदर्शन करावे, समजून घ्यावे, समजावून सांगावे व क्षमाशील असावे.
आता या 'मोठ्या वर्गात ' घरातील व बाहेरील सर्वच मोठे आले. तसेच केवळ माहेरचे नव्हे तर सासरचेही. या सर्वांशीच एक समान वागणूक हवी. पुष्कळदा काय होतं आई वडील रागवले तर मुलींना चालते पण सासू सासरे रागवलेले चालत नाही.
लहानांशी वागताना मोठे होऊन वागावे. या 'लहान वर्गात'ही घरचे,बाहेरचे सगळेच लहान यायला हवेत आणि सर्वांना समान वागणूक असावी. एक अगदी घरगुती उदाहरण बऱ्याचदा बघायला मिळते की मुलगी माहेरी आली की आईला वाटते मुलीने आराम करावा आणि सुनेने सगळे काम करावे, नणंदेचा चांगला पाहुणचार करावा. मुलीला चार दिवस आराम मिळावा. असे वाटण्यात गैर काहीच नाही. पण आपली मुलगी सासरी राबराबून थकते तशीच सूनही आपल्या घरातील कामाने थकत असेल असेही सासूच्या भूमिकेतून वाटायला हवे.
प्रत्येकाचे वर्तन वैयक्तिक आणि सामाजिक या दोन भागात विभागलेले असते आणि ते वेगवेगळे असते. सामाजिक जीवनात आपण शिष्टाचार पाळणारे, कर्तव्यदक्ष असतो. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. सहकाऱ्यांशी जुळवून घेतो. चुका झाल्यास सॉरी म्हणतो. अनेकदा आभार मानतो.
पण हे शिष्टाचार कुटुंबात वागताना आपल्याही नकळत लुप्त होतात. बाहेर जगाला जो मनाचा मोठेपणा दाखवतो, तो कुटुंबात वागताना आपण का दाखवू नये? त्यात आपल्याला संकोच का वाटावा? बाहेर आपण आपल्या मनाला मुरड घालून सभ्यतेने योग्य तसेच वागतो. वैयक्तिक जीवनात आपली भूमिका वेगळी असते.
अर्थात ही तत्वे आदर्श तर आहेतच, तरीही प्रत्यक्षात
असे वागणे अजिबात सोपे नाही. पण अवघड असले तरी अशक्यही नाही. नेहमी मोठे किंवा लहान होऊनच वागायचे तर स्वतःच्या मनासारखे कधी वागायचे हा प्रश्न तर उरलाच आहे. तर त्यासाठी आपले मित्र मैत्रिणी महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या सहवासात आपल्या सर्व भावनांचा निचरा होतो. मन मोकळे होते. त्यांच्या सहवासात वयाचा प्रश्नच बाजूला पडतो.
म्हणून खरं तर खूप मैत्र जोडावे. नात्यातही हे मैत्र जोडता आले तर साखरे होऊन गोड! तसे झाले तर आणखी काय हवे?
ह्या सगळ्या नुसत्या सांगायच्या गोष्टी आहेत असे कदाचित मनात येत असेल कारण अनेकांच्या वाट्याला अपवादात्मक परिस्थितीही आहेतच. अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असे वागणे गैरलागू आहे
हेही ध्यानात असू द्यावे. कारण तशा परिस्थितीतही आपण नम्रतेने राहिलो तर तो आपला भित्रेपणा मानला जातो. प्रत्येक वेळेस नाही, तरी आवश्यकतेनुसार जशास तसे या न्यायाने वागावे लागते. पण या झाल्या असाधारण व अपवादात्मक परिस्थिती. साधारण सर्वसामान्य परिस्थितीमध्ये 'लहान मोठे' होणे हेच तत्व मुक्तीचे व सोयीचे आहे. जेवढे आपण ताठर राहू तेवढे दुखावले जाऊ. जेवढी व्यापकता व लवचिकता आपल्या विचारात असेल तेवढी ती आपल्या वागण्यात येईल व अनावश्यक संघर्षाचे प्रसंग कमी होतील.
'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती…'
आराधना कुलकर्णी