Bluepadमदतीला शाळा - दवाखाना की मंदिरे...
Bluepad

मदतीला शाळा - दवाखाना की मंदिरे...

अनिल भुसारी
30th Nov, 2021

Share

*मदतीला शाळा -दवाखाने की मंदिर*
=========== अनिल भुसारी
संपूर्ण जगाला कोरोनाने वेढलेले आहे. भारतात सुद्धा कोरोनाशी लढण्याकरिता इतर उपायांबरोबर दोन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात छोटया उदयोगापासून ते मोठे उदयोग, वेगवेगळी कार्यालय, हॉटेल्स, सभागृह, चित्रपटगृह, शाळा -महाविद्यालय याच बरोबर तुमचा आमचा तारणहार, विघ्णहर्ता, ज्यांला संकटाच्या वेळी बरोबर धावून येतो असं म्हणतात, त्यातले बरेच जागृत असणारे जिथे राहतात ते सर्व धर्माची धार्मिक स्थळे सुद्धा कुलूप बंद आहेत.
कोरोना या आजारावर मात करण्यासाठी सर्वाधिक आरोग्य यंत्रणा काम करत आहे. याच बरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा काम करत आहे. अजून बऱ्याच यंत्रणा बरोबर शिक्षण यंत्रणा सुद्धा काम करत आहे.
मित्रांनो हजारो वर्षा पासून आपले श्रद्धास्थान धर्मस्थळांना (मंदिर, मस्जिद, चर्च, विहार, गुरुद्वारा वगैरे ) मानत आलो आहोत. या धर्म स्थळांचा जीर्णोद्धार, त्यांचे सुशोभीकरण करण्याकरिता आपण मोठया प्रमाणात दान -दक्षिणा देतो. सरकारही त्यावर मोठया प्रमाणात खर्च करतो. (कुंभमेळा) त्यामुळे आज धार्मिक स्थळे व्यापाराची केंद्र बनली आहेत. श्रद्धेच्या नावावर तिथे व्यापार चालतो, हे नाकारू शकत नाही. कल्पनेपलीकडे कोरोना आजाराने जगात धुडगूस घातल्यामुळे मानवावर मोठे संकट आले आहे. माणसाला आपले पृथ्वीवरील अस्तित्व टिकविण्याकरिता धडपड करावी लागत असतांना मदतीला डॉक्टर, नर्सेस, सर्व आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आपला जिव धोक्यात घालून मदतीला धावत असतांना, मात्र आपण ज्याला स्वतःची लेकरे म्हणून घेतो किंवा आपण ज्याला बापाच्या ठिकाणी पाहतो तो 'सबका मालिक एक' मात्र कुठेच मदतीला धावून येतांना दिसला नाही. उलट कोरोनाला घाबरून त्याने सुद्धा स्वतःची दरवाजे बंद करुन, हात वर केले. म्हणून यापुढे आपण दान -दक्षिणा कुठे करावं, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मित्रांनो सुरुवातीला शहरे कोरोना ग्रस्त झाल्यामुळे शहरात गेलेली ग्रामीण भागातील लोक भीती पोटी गावाकडे परतु लागलीत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले. अनेक गावात तर शहरातून येणाऱ्या आपल्याच गावातील लोकांना गावबंदी केल्याचे दिसले. त्यावर उपाय म्हणून बाहेर देशातून, बाहेर राज्यातून, शहरातून लोकं आपल्या गावाकडे येत असतील तर सुरक्षा म्हणून त्यांना चौदा दिवस 'इन्स्टिटयूट कोरोनटाईंन' करावे असं ठरलं. गावात इन्स्टिटयूट कोरोनटाईंन' करायचे म्हणजे कुठं? गावात तर इमारती नाहीत. आम्ही पिढ्यानं पिढ्या जिथं दान दक्षिणा देत आलोत तिथं कुलूप लागलेत. लोकप्रतिनिधीचा आर्थिक निधी मंदिर आणि समाज मंदिरावर खर्च केला; परंतु संकटाच्या काळात त्यांनीच हात वर केलेत. गावात मात्र अशी एक इमारत असते त्या इमारतीत आपली मुलं त्यांच भविष्य घडविण्याकरिता दिवसभर असतात आणि मुलांच्या भविष्याबरोबर तिथे देशाचं भविष्य घडविण्याचे कार्य सुरु असते. त्या इमारतीला आम्ही कधी मदत केलं नाही. (अपवतात्मक काही लोकं आणि गाव सोडून) त्या इमारतीत मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम करणारे, त्या इमारतीत काही सुविधा निर्माण करतात तेव्हा आम्ही सहकार्य करण्याऐवजी तोडफोड करण्याकरिता पुढाकार घेतो. ती इमारत म्हणजे *गावा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा.* *काही महाभाग तर शाळेचे धार्मिकीकरण करण्यात पुढे असतात.* आज संपूर्ण महाराष्ट्रातील गावात जे कोरोनटाईंन सेंटर आहेत त्यातील सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला चौदा दिवस शाळेत कोरोनटाईंन केल्यामुळेच आज आपली गावं सुरक्षित आहेत. कोरोनटाईंन सेंटरमुळे एक वास्तव चित्र समोर आले ते म्हणजे शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असावी, वीज, पंखे, बाग असावे आणि महत्वाचे म्हणजे शाळेची इमारत भक्कम व अधिकच्या खोल्या असावेत. ग्रामीण भागातील ज्या शाळेत या सुविधा आहेत त्या शासनामुळे नाही तर शिक्षकांमुळे आहेत.
कोरोनामुळे शासनाला व जनतेला नवे विचार, नवी दृष्टी, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकाराव लागेल. आरोग्य आणि शिक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. *मेट्रो आणि इतर ग्रहांवरचा शोध आमच्या मदतीला येणार नाही आहे.* आरोग्य आणि शिक्षणाकरिता धनाची कमतरता असेल तर उदयोगपत्यांचे लाड पुरविणे बंद करुन देशातल्या सर्व धार्मिक स्थळातील धन या कार्यात गुंतविण्यास कोणाची ना असण्याचे काही कारण नसावे. कारण संकटात मानवाच्या मदतीला धर्म येत नसतो हे कोरोनाने पुन्हा एकदा सिद्द केलं.
संत तुकाराम महाराज म्हणतात, *"तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी* म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी फक्त दगड आणि पाणी असतो. देवाला कशाची गरज नसते. कर्मयोगी गाडगेबाबा म्हणतात, *"मंदिरात देव नसतो तर पुजाऱ्याचे पोट असते"* तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, *"दगडाचा देव त्याला वडराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, देव अशाने मिळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही."*
आज आठवण येते ते देशाचे पहिले कृषी मंत्री आणि संपूर्ण विदर्भात शिक्षणाचे जाळे विणणारे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख व गाडगेबाबा यांची. डॉ. पंजाबराव देशमुखांनी, *'धार्मिक स्थळी असणारी संपत्ती ही शासनाने अधिग्रहित करावी. '* अशा आशयाचा विधेयक विधीमंडळात मांडला होता. दुसरं गाडगेबाबांनी पंढरपूर येथील त्यांची *'संत चोखामेळा धर्मशाळा'* आणि त्यांच्या खात्यावर असलेले पंधरा हजार रुपये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना *'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'* करिता दान दिले होते. कोणत्याही धार्मिक स्थळाला किंवा बुवा- बापूला दिलं नाही. हे लक्षात घ्यावं. मित्रांनो आता गरज आहे ती, सरकारने पंजाबराव देशमुखांसारखा धाडसी निर्णय घेण्याची आणि प्रजा म्हणून आपणही गाडगेबाबा प्रमाणे दान - दक्षिणा नेमकं कुठं करावं? *आपल्या मदतीला जर शाळा आणि दवाखाने येतात तर आपणही शाळा आणि दवाखान्यांनाच मदत करावी.*हा विवेकवादी विचार करण्याची. आपण यापुढे लोकप्रतिनिधीकडे कामाचा पाठपुरावा करतांना दवाखाना व शाळा याकरिता करावा आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांचा निधी आपापल्या क्षेत्रातील दवाखाने व शाळा करिता खर्च करावा. तसं होईल या अपेक्षेसह थांबतो.
=========== अनिल भुसारी, तुमसर जि. भंडारा

15 

Share


Written by
अनिल भुसारी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad