Bluepadसंपूर्णपणे स्वयंपूर्ण....
Bluepad

संपूर्णपणे स्वयंपूर्ण....

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
29th Nov, 2021

Share
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अर्थव्यवस्थेला फार मोठं मार्गदर्शन केलं आहे हे तर आपण जाणतोच. आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली Vocal for Local ही हाक सुद्धा अत्यंत काल सुसंगत आहे. याची कारणं देखील आपल्याला माहित आहेत. त्या विस्तारात मी जाणार नाही. पण पंतप्रधानांनी जे म्हटलं आहे ते साध्य कसं करता येईल हा विचार करताना मला काही गोष्टी जाणवल्या त्या मी इथे मांडत आहे.
आपल्या देशात संपूर्णपणे स्वयंपूर्ण उत्पादन झालं पाहिजे. प्रत्येक बारीक सारीक पार्ट्स / वस्तू / उत्पादनाला भारतीय पर्याय मिळाला पाहिजे. बाहेरच्या वस्तू असेम्बल करून भारतीय म्हणून तर अजिबात विकल्या जाऊ नयेत. त्यामुळे परावलंबित्वच अधिक येईल. जोपर्यंत ह्या पर्यायी वस्तू मिळत नाही तोपर्यंत सध्या वापरात असलेल्या वस्तू वापराव्यात पण नवीन विकत घेऊ नयेत.
विदेशी वस्तू जर लोकांनी वापरू नयेत असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारनेच त्यांच्या आयातीवरच टप्प्या टप्प्याने (किंवा वस्तू सापेक्ष शक्यतो सरसकट) बंदी आणावी.
सिगारेटच्या पाकिटावर Statutory Warming लिहिली की आपली जबाबदारी संपली असा खाक्या आता बदलायला हवा. जे अयोग्य आहे त्याची निर्मितीच थांबली पाहिजे.
रासायनिक खतांमुळे कॅन्सर होतोय हे सर्व जण नुसते बोलतात. प्रत्यक्षात अजूनही रासायनिक खतांचाच वापर केला जातोय. आज जर रासायनिक खतांचा वापर बंद केला तर पुढच्या १० वर्षात अन्नसाखळी निकोप होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं असतानाही शेतकरी तरी अजून रासायनिक खतांचा वापर का करत आहेत? कृषी विद्यापीठे पारंपरिक आणि नैसर्गिक खतांच्या वापराचा प्रचार आणि पुरवठा करण्यासंदर्भात नेमक्या कोणत्या धोरणाचा अवलंब करीत आहेत? जर ते तसं करत असतील तर त्याचा परिणाम साधारणपणे कधीपर्यंत समाजावर पाहायला मिळेल, हे त्यांनी स्पष्ट करावं.
संपूर्णपणे स्वयंपूर्ण होताना पर्यावरणाला मारक असा इ - कचरा (e - garbage) होणार नाही याकडे सुरुवातीपासूनच लक्ष द्यायला हवं. नाहीतर करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं व्हायला नको. ज्या वस्तूंच्या उत्पादनात इ - कचरा होऊ शकतो अशा वस्तू बनवूच नयेत. सगळ्याच वस्तू काही जीवनावश्यक नसतात. आज आपल्याला कळून चुकलंय की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. बाकी इतर कोणत्याही गोष्टीशिवाय आपण कुटुंब आणि समाज म्हणून एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहू शकतो. तंत्रज्ञानाच्या शोध आणि विकासाआधी सुद्धा आपण राहत होतोच ना?
अगदी जात, धर्म, पंथ, रंग, वर्चस्व, घमेंड, स्पर्धा, थोतांड आणि सर्व धर्मियांनी करकचून बांधून ठेवलेले देव आणि देवळे ह्या पैकी कशाचीही आपल्याला गरज नसते. गरज असते ती निरक्षीर विवेक बुद्धीची. चांगल्या वाईटाला चाळणी मारण्याची. चांगलं आणि शाश्वत तेच उचलावं. बाकी उरतो तो कोंडा. आणि कोंड्याची भाकरी खाण्याची वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते...' हे सावरकरांनी म्हटलेलं तर लक्षात असू द्यावंच पण नामदेव ढसाळ म्हणतात ते अंगी बाणवावं
"आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे,
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करंडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने."

6 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad