Bluepad | Bluepad
Bluepad
जून महिना – एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या अस्मिता जागवणारा महिना
D
Deepti Angrish M.
13th Jun, 2020

Share


जून महिना – एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या अस्मिता जागवणारा महिना

“आपण सर्व आज असं जाहीर करूया की आपण सर्व समान आहोत हे एक निर्विवाद सत्य आपल्या पूर्वजांनी सेनेका फॉल्स, सेल्मा आणि स्टोनवॉलच्या घटनांच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलं आहे. पण आपण खरंच सर्व समान आहोत तर आपल्या गे बंधु भगिनींना कायद्यान्वये समान वागणूक मिळत नाही तोवर हे सत्य अधोरेखित होणार नाही. पण त्यासाठी आपल्यातील नातं हे प्रेमाचं आणि सौहार्दाचं असलं पाहिजे.”

हे शब्द आहेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २०१३च्या जानेवारी मध्ये सुरू झालेल्या दुसर्‍या सत्राच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणातील. अमेरिकेसारख्या लोकशाही मूल्यांना आपल्या प्राणांपेक्षा अधिक जपणार्‍या देशात समलिंगी संबंधांना मान्यता देण्यात इतका वेळ लागावा यावरूनच आपल्याला दिसतं की माणूस कितीही प्रगत झाला तरी त्याची कोती मनोवृत्ती कमी होत नाही. जे लोक लोकशाही सर्वांसाठी सारखी आहे असं मानतात ते त्या प्रत्येक माणसाला ती मूल्ये उपभोगता यावीत म्हणून त्याला कायद्याचं कोंदण देण्याचा जिवापाड प्रयत्न करतात. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सेनेका फॉल्सचा जो उल्लेख केला ते १८४८ मध्ये स्त्रियांच्या हक्कांसाठी भरलेलं दोन दिवसीय अधिवेशन होतं. तर सेल्माचा उल्लेख १९६४ मध्ये झालेल्या एका मोठ्या जन आंदोलनाचा आहे. १९६४ मध्ये कृष्णवर्णीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी अमेरिकेच्या डल्लास राज्यातील अलाबामा प्रांतातील सेल्मा (याच नावाचा याच घटनेवर आधारित चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला आहे) ते मोन्टगोमेरी पर्यन्त डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्यात किमान २५००० लोकांनी सहभाग घेतला होता. यात फार मोठा हिंसाचार झाला होता पण आंदोलक मागे सरत नव्हते. याचा परिणाम हा झाला की १९६५ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना अश्वेतांच्या “वोटिंग राइट्स अॅक्ट १९६५” वर सही करावी लागली होती. नेहमी पाश्चात्यांचे गोडवे गाणार्‍यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी इथल्या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहुत्या द्याव्या लागल्या होत्या. अशा वेळी जी गोष्ट निसर्ग नियमा विरोधी म्हणून मानली जाते त्या समलिंगी संबंधांना मान्यता मिळवण्यासाठी तिथल्या लोकांनी किती बलिदान केलं असेल याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. ओबामांच्या भाषणातील “स्टोनवॉल” हा त्याच बलिदानाचा उल्लेख आहे.

अमेरिकेत समलिंगी संबंधांना मान्यता मिळावी म्हणून फार पूर्वीपासून संघर्ष सुरू होता. संपूर्ण जगा प्रमाणे अमेरिकेत सुद्धा लेस्बियन, गे, बायसेक्सुअल्स आणि ट्रांसजेंडर व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोण निकोप नव्हता. त्यांच्या सामान्यांपेक्षा वेगळ्या जीवनशैली मुळे त्यांना नेहमी गुन्हेगार म्हणूनच गृहीत धरलं जात होतं. मात्र आपल्या शरीराच्या गरजांना आपल्या आंतरिक उर्मीप्रमाणे पूर्ण करण्यासाठी प्रस्थापित मान्यतांच्या विरोधात बंड म्हणून थोडी भडक जीवनशैली स्वीकारलेले समलिंगी, उभयलिंगी लोक नेहमीच पोलिसांसह माफीयांच्याही रडार वर राहिले आहेत.

न्यू यॉर्कमधील लोअर मॅनहटन जवळच्या ग्रीनवीच गावात असलेला “स्टोनवॉल इन” हा गे समुदायाचा पब आहे. ग्रीनवीच हे गाव पहिल्या महायुद्धानंतर गे आणि लेस्बियन्सचं गाव म्हणून ओळखलं जातं. इथल्या लोकांना “आखूड केसांच्या स्त्रिया आणि लांब केसांचे पुरुष” असं हिणवलं जात असे. इथे मद्य आणि ड्रग्सची विक्री खुलेआम होत असे. त्यामुळे इथले लोक बदनाम होते. ह्या ‘प्रतिसंस्कृतीला’ सुद्धा एक इतिहास असला तरी ही संस्कृती सुसंस्कृत म्हणवणार्‍या बाकी अमेरिकानांना नको होती. त्यांनी अशा जागा रिकाम्या करण्याचा सपाटा लावला होता. २८ जून १९६९ च्या मध्यरात्री पोलिसांची एक टीम ह्या हॉटेलमध्ये आली आणि त्यांनी जाहीर केलं की हॉटेल आता आमच्या ताब्यात आहे, सर्वांनी हॉटेलच्या बाहेर निघावं. पण तिथल्या लोकांनी बाहेर जाण्यास नकार दिला. तेंव्हा पोलिसांना आक्रमक व्हावं लागलं आणि त्यांना उत्तर देण्यासाठी ग्रीनवीचवासी आक्रमक झाले. करता करता ह्या दंगलीचा भडका उडाला जो दोन दिवस सुरू होता. यात अनेक लोक जायबंदी झाले आणि अनेक अटक झाले. मात्र यानंतर गे आणि लेस्बियन यांच्या मनावधिकारासाठी जोरदार चर्चा झडू लागल्या आणि त्यातून अनेक संघटना उभ्या राहिल्या. समलिंगी, उभयलिंगी यांच्या विवाहास मान्यता मिळवण्यासाठी संघर्ष उभा राहिला.

ह्या एलजीबीटीक्यू कम्युनिटीला कोणापुढे ही आपली ओळख आणि देहभान लपवण्याची गरज नाही. आपणा जे आहोत ते आम्ही स्वीकारलं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो अशी भावना त्यांच्यात वाढू लागली होती. त्यांच्यात स्वत:च्या अस्तित्वाच्या अस्मिता जागृत होऊ लागल्या होत्या. याचा परिणाम म्हणून ब्रेंडा हॉवर्ड ह्या उभयलिंगी स्त्री कार्यकर्तीने “प्राइड” अर्थात अभिमान कार्यक्रमांचा पाया रचला. तिला “मदर ऑफ प्राइड” म्हटलं जातं. तिने अनेक कार्यक्रम राबवले जे पुढे येणार्‍या अनेक प्राइड कार्यक्रमांची नांदी ठरले. ह्या कार्यक्रमांचा धडाका आणि त्यांची मागणी इतकी मोठी होती की १९९९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पहिल्यांदा जून महिना हा “गे अँड लेस्बियन प्राइड मंथ” म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले पण त्याचे पालन तेवढ्या प्रमाणावर होत नव्हते. त्यानंतर २००९ साली पुन्हा एकदा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हाच आदेश दिला. पुढे त्यांचे हक्क आणि त्यांच्या विवाहास मान्यता देणार्‍या कायद्यावर २४ जून २०११ रोजी राज्यपाल अँड्र्यू कुमो यांनी शिक्कामोर्तब केलं.

ह्या संपूर्ण जून महिन्यात जगभरातून एलजीबीटीक्यू कम्युनिटी कडून प्राइड मार्च काढले जातात. ह्या कम्युनिटी वर झालेल्या अन्यायाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचा फोडली गेली की न्यूयॉर्क शहर पोलीस आयुक्त जेम्स पी. ओ. नील यांनी ६ जून २०१९ रोजी न्यूयॉर्क शहरातील प्राइड मार्चमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी १९६९ मध्ये स्टोनवॉलमध्ये झालेल्या दंगलीत पोलिसांच्या कृत्याबद्दल एनवायपीडीच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.
भारतात अनैसर्गिक संभोग करणारे म्हणून समलिंगी आणि उभयलिंगी यांना भा.दं.वि. अन्वये ३७७ कलम अन्वये त्यांना शिक्षा केली जात होती. पण हा जून प्राइड मार्चचा विश्वव्यापी परिणाम आहे की आता हे कलम एलजीबीटीक्यू कम्युनिटीला लागू होत नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ६ सप्टेंबर २०१८ रोजी दिला आणि ह्या समुदायात उत्सव साजरा झाला. आजच्या प्रगत समाजाने त्यांना स्वीकारलं आहे असं मानायला हरकत नाही पण अजूनही त्यांच्या विवाहाला मान्यता मिळालेली नाही. तज्ज्ञांचं मत आहे की यास लग्न नाही तर सिव्हिल युनिअन्स किंवा सेम सेक्स पार्टनरशिप म्हणायला हवं. कारण लग्न म्हटलं की तिथे धर्माचा संबंध येतो. तर धर्माचा हस्तक्षेप न होता समलिंगी जोडप्यांनाही भिन्नलिंगी जोडप्यांसारखे कायदेशीर हक्क मिळावेत हा ह्या लढ्याचा पुढचा टप्पा आहे. हा टप्पा फार सोपा नाही. पण तो ही साध्य होईल. पृथ्वीतलावर राहणार्‍या सर्व मानवांना समानतेचा आणि आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीने राहण्याचा अधिकार मिळेल ही अपेक्षा.
विनिशा धामणकर

6 

Share


D
Written by
Deepti Angrish M.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad