Bluepadलोककवी अण्णाभाऊ साठे
Bluepad

लोककवी अण्णाभाऊ साठे

Roomi
Roomi
18th Apr, 2020

Share


‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली’ ही लावणी माहीत नाही असा एकही माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रेरणास्थानी राहिलेली ही लावणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलं होतं. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच प्रकारात लेखन केलं. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.
त्यांनी १९४४ ला `लाल बावटा` पथक स्थापन केलं आणि बघता बघता ते शाहीर झाले. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांची ख्याती आपल्या पोवाड्यातून पार रशियापर्यंत पोहोचवली. पुढे त्या पोवाड्याचं रशियन भाषेमध्ये भाषांतर झालं आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा भर तूफान पावसात ते शिवाजी पार्क वर नारा देत राहिले. अण्णाभाऊ यांच्या नुसत्या लेखणीत कामगार वर्गासाठी माया नव्हती तर ते त्यांच्या साठी रस्त्यावर उतरून लढत होते.
अण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. शाहीर अमरशेख त्यांची गाणी आपल्या फक्कड आवाजात पेश करीत असत.
अण्णाभाऊंच्या बहुतेक लावण्या ह्या त्यांच्या लोकनाट्याच्या कथानकाची गरज म्हणून निर्माण झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला प्रश्नोत्तरातून त्यांची लावणी आकारास आलेली दिसते. माझी मैना गावावर राहिली’ ही लावणी त्यांनी छक्कड या सहा ओळींच्या एका विभागात लिहिलेली आहे. ही लावणी रूपकात्मक आहे संयुक्त महाराष्ट्राच्या अभूतपूर्व लढ्यानंतरही महाराष्ट्राला मिळू न शकलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी,  उंबरगाव, डांग या भागातील जनता म्हणजे मैना होय. या मैनेच्या विरहामुळे शाहीर व्याकूळ होतो ते शाहिराचे मन यातून व्यक्त झाले आहे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही हे भाग मिळविण्यासाठी सर्वांना एकजुटीचे आवाहनही त्यांनी केले ते म्हणतात, “आता वळू नका । रणी पळू नका। कुणी चळू नका। बिनी मारायची अजून राहिली। माझ्या जिवाची होतिया काहिली.” अण्णांनी पोवाडे, लावण्या, किसानगीते, मजूर गीते, छक्कड, गण लिहिले तशीच लोकनाट्येही लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या लोकनाट्यांनीही चळवळीत मोठी धमाल उडवून दिली. तमाशातील झगडा या लावणीच्या प्रकाराचा उपयोग अत्यंत कुशलतेनी त्यांनी करून घेतला. महाराष्ट्राची अस्मिता जागती ठेवण्यासाठी अण्णांनी घराकडे दुर्लक्ष करून लढ्याला सर्वस्व वाहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या रूपाने त्यांच्या या समर्पणाची इतिश्री झाली. ते खरे लोककवी होते.

58 

Share


Roomi
Written by
Roomi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad