Bluepad | Bluepad
Bluepad
क्वारंटाईन
सतिश घरकर
12th Jun, 2020

Share


सन 2020 मध्ये बहुतांच्या शब्दकोशात नव्याने आलेला हा शब्द.इंग्रजी वाटत असला तरी मूळ इटालियन असलेला हा शब्द आज एक प्रकारची दहशत माजवत आहे.
आपल्याकडे हा शब्द आताच माहित पडला असला तरी युरोप, अमेरिकेत वर्षानुवर्षे ह्याचा उपयोग होत आला आहे.
"क्वारंटा" म्हणजे इटालियन( व्हेनेशियन) भाषेत 40(चाळीस) तर " क्वारंटेना" म्हणजे चाळीस दिवस, त्याचेच पुढे इंग्रजीत क्वारंटाईन असे अपभ्रंश झाले.
इटली मध्ये व्हेनिस नावाचे एक कालव्यांचे शहर आहे आणि तिथेच फार पूर्वीपासून असलेले त्यांचे बंदर आहे.चौदाव्या शतकामध्ये जेव्हा युरोपात प्लेगची भयंकर साथ आली होती तेव्हा व्हेनिसच्या बंदरात बाहेरून आलेल्या बोटींना चाळीस दिवसापर्यंत क्वारंटाईन केले जात असे, म्हणजेच प्लेगचा रुग्ण लागण झाल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा 38 दिवसाचा कालावधी ग्राह्य धरून बोटीतील कोणालाच व्हेनिस बंदरात उतरू दिले जात नसे, तसेच त्यांची वेळोवेळी तपासणी करून प्लेगची लक्षणे बघितली जात असत.असा हा चाळीस दिवसाचा क्वारंटाईन झाल्यानंतरच त्या लोकांना व्हेनिस शहरात प्रवेश दिला जात असे.
तसे बघायला गेले तर युरोपमधील पहिला क्वारंटाईन हा क्रोएशिया मधील आताचे डूबरोवणीक ह्या शहरात 30 दिवसाचा झाला होता. त्यानंतर व्हेनिस चा 40 दिवसाचा क्वारंटाईन जगमान्य झाला.
प्लेग, कुष्ठरोग, कॉलरा, देवी अश्या बऱ्याच साथीच्या, संसर्गाच्या रोगांच्या वेळी युरोप, अमेरिका येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.
सध्याच्या कोरोना विषाणूने तर जगभर धुमाकूळ घातलाय.बऱ्याचशा देशांनी ही क्वारंटाईनची पद्धत अवलंबली आहे.जर आपण हा युरोप, अमेरिकाचा इतिहास बघितला तर अश्या गोष्टींचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. प्रचंड मनुष्यहानी, वित्तहानी झाली तरी त्यातून पुन्हा नव्याने उभारी घ्यायची त्यांची जिद्द आणि ताकद आहे.मग ते विषाणूयुद्ध असो वा पूर्वी झालेली विश्वयुद्ध असोत, त्यातून ह्या देशांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यात.कोणी किती म्हटले तरी महासत्ता होण्याची ताकद त्यांच्यात आहे.
आपल्यासाठी हा एक नवीन अनुभव आहे.मनुष्यहानी, वित्तहानी आपल्याला तितकी परवडणारी नाहीय. पण जिद्द, आताशी कुठे आलेली शिस्त ह्यातून बऱ्याच गोष्टींचा फायदा आपण करून घेऊ शकतो.आता सगळी समीकरणे बदलणार आहेत. त्यासाठी आपल्यालाही स्वतःत बरेचसे बदल करावे लागणार आहेत.
असो, तूर्तास एव्हढेच. आपण काय करू शकतो, कसे परिस्थितीवर मात करून स्वतःचे एक नवीन विश्व् उभे करू शकतो त्यावर नक्कीच पुढे चर्चा करू.

*सतीश* *घरकर*©

5 

Share


Written by
सतिश घरकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad