Bluepadबाल्य कोवळंच रहावं म्हणून...
Bluepad

बाल्य कोवळंच रहावं म्हणून...

Surekha Bhosale
Surekha Bhosale
30th Nov, 2021

Shareमध्यंतरी एक पोस्ट वाचनात आली होती. एक फोटो होता ज्यात एका टपरी वर चहा देणार्‍या एका लहान मुलाचा फोटो होता. आणि पुढे लिहिलं होतं. “तुम्ही ज्याला “छोटू” म्हणून हाक मारता तो कदाचित त्याच्या घरातील थोरला असेल.” हे खरं आहे. आज अशी अनेक मुलं आहेत जी आपल्या कुटुंबाचा भार वाहत आहेत. आई वडील हयात असताना किंवा नसताना ही मुलं त्यांच्या सोबत किंवा अन्य कोणा सोबत लहानसहान कामं करीत आहेत. जिथे मनुष्य बळ जास्त लागतं पण जे श्रमाचं काम नसतं अशा ठिकाणी हमखास मुलांना नोकरीवर ठेवलं जातं. यात मग चहाची टपरी, विडी सिगरेट वळण्याचे कारखाने, पट्टे, पर्स अशा चामड्याच्या वस्तू बनवणे किंवा कन्स्ट्रकशन साईटवर १८ वर्षा खालील मुलांना कामासाठी ठेवलं जातं. ही कामं मोठ्यांच्या मानाने कमी श्रमिक असली तरी ती त्यांच्या ताकतीची नसतात. तरी देखील त्यांना कामावर ठेवलं जातं.

मुलांना अशा प्रकारे कामावर ठेवण्यामागे दोन प्रमुख कारणं असतात ती ही की ह्या मुलांना कमी पगार देऊन हवी तेवढी कामं करून घेता येतात. आणि दुसरं त्यांच्या राहण्याची आणि दोन वेळच्या खाण्याची सोय केली की त्यांचे आई वडील त्यांना सहज पाठवतात. दोन पैसे जास्तीचे घरात येतील या आशेने ते आई वडीलही आपल्या मुलाला मोल मजुरीसाठी पाठवायला तयार होतात. असे प्रकार गरीब आणि आदिवासी मुलांच्या बाबतीत अनेकदा घडतात.

अनेकदा ह्या मुलांचा छळ होतो किंवा त्यांचं शारीरिक शोषण सुद्धा होतं. अशा अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत जिथे लहान मुला मुलींना अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय ठेवून त्यांच्याकडून खूप काम करून घेतलं गेलं आणि त्यांना वेळेवर पगारही दिला गेला नाही. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोलिसांनी अशा मुला मुलींना सोडवलं आहे.
आपल्या देशात १८ वर्षा खालील मुलांना कामावर ठेवणं बेकायदेशीर आहे हे माहीत असताना सुद्धा अनेक सुशिक्षित लोक मुलांचं शोषण करीत असतात. काही लोक तर “आम्ही मुलांना शिक्षण देऊ” असं सांगून मुलांना आपल्या घरी आणतात आणि त्यांना हवं तसं राबवून घेतात. हे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगात सुरू आहे. आफ्रिकेसारख्या देशात तर मुलांना गुलाम म्हणून राबवण्याची पद्धत अजूनही सुरू आहे. या सगळ्याला आळा घालण्यासाठी १२ जून २००२ रोजी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाइज़ेशनने १८२ व्या परिषदेत १९९९ पासून काम सुरू असलेल्या बाल मजदूरी विरोधी प्रस्तावाला मंजूरी दिली. या दिवसापासून हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत बाल कामगार न ठेवण्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जन जागृतीचे कार्यक्रम केले जातात. पण यानंतरही ही अमानवीय पद्धत अजून सुरू आहे.

संपूर्ण जगात ह्या घडीला किमान १५ कोटी २० लाख बालकामगार आहेत. यापैकी सुमारे ५० लाख बालकामगार भारतात आहेत. महाराष्ट्रात २ लाख ६० हजार ६७३ बालकामगार असल्याचे केंद्रीय श्रम आणि रोजगार विभागाची आकडेवारी सांगते. देशातील एकूण बालकामगारांपैकी महाराष्ट्रात ५.२३  टक्के बालकामगार असल्याचे यावरून दिसून येते. यामध्ये मुलींची संख्याही लक्षणीय आहे. सर्वात जास्त म्हणजेच ३५.६२ टक्के इतकी बालकामगारांची संख्या उत्तर प्रदेशात आहे.

खेळण्या बागडण्याच्या आणि शिक्षण घेऊन उद्याची स्वप्न बघण्याच्या वयात ही मुलं आपल्या कुटुंबाचा असहनीय भार वाहत आहेत. त्यांच्यासाठी कायदे आहेत. आपल्याला ते माहीत असतात तरीही कुठे लहान मूल काम करताना दिसलं की आपण आपुलकीने चौकशी करण्या पलीकडे काहीही करीत नाही. आता एवढंच करून चालणार नाही. तुम्हाला त्या मुलांविषयी पोलिसांना सांगावं लागेल. जे लोक मुलांना कामाला ठेवतात ते “पोलिसात कळवल्यास पोलीस त्या मुलांना बाल सुधार गृहात टाकतील” अशी भीती घालतात. पण ही भीती सर्वथा अनाठायी आहे. पोलीस अशा मुलांना चाइल्ड वेलफेअर कमिटी मार्फत त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतात. अशा मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तेथील स्थानिक प्रशासन करतं. अर्थात यात उदासिनता फार मोठ्या प्रमाणावर दिसते. पण कायदे आहेत आणि त्यांचं यथा योग्य पालन केलं तर मुलांना असं कामाला जुंपण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि ही पद्धत मूळापासून बंद होईल. या... बाल मजदूरीचं निर्मूलन करण्यास कटिबद्ध होऊया आणि आजच्या बालकामगार विरोधी दिनी हा संकल्प करूया की मला काम करताना दिसलेल्या मुलास मी त्याचं बालपण पुन्हा मिळवून देईन. त्यांचं कोवळं बाल्य अबाधित राहणं हा त्यांचा अधिकारच आहे.
विनिशा धामणकर

9 

Share


Surekha Bhosale
Written by
Surekha Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad