Bluepad | Bluepad
Bluepad
हरवलेले गवसले
वैशाली जोशी
वैशाली जोशी
12th Jun, 2020

Share


हरवलेले गवसले
हरवलेले गवसले
हरवलेले गवसले


कीर्तने मॅडमचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.मॅडमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व,त्यांची शिस्त,त्यांची कामाप्रती निष्ठा,त्यांचा वर्कोहोलिकनेस ह्याबद्दल त्यांचे सहकारी भरभरून बोलले.हे कौतुकोद्गार ऐकून मॅडम मनातून सुखावत होत्या.मॅडमनी त्यांच्या कारकिर्दीत साध्या कारकुनापासून आयुक्त पदापर्यंत मोठी मजल मारली होती.त्यांचे वरिष्ठ सहकारी काळवीटांनी मॅडमच्या तत्वांचे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे दोन-तीन दाखले दिले.मॅडम अगदी कृतकृत्य झाल्या."याचसाठी केला होता अट्टाहास"असे वाटून गेले त्यांना.

त्यांच्या नोकरीतल्या सततच्या बदल्या, दौरे, मिटींग्स, टार्गेट्स,अचीवमेंट्स यात त्यांच्या वयाची साठी कधी आली हे त्यांना कळलेदेखिल नाही.

कीर्तने मॅडमचे पूर्ण नाव मालिनी नानासाहेब कीर्तने. पण त्यांची ओळख ऑफिसमध्ये, शेजारी-पाजारी,त्यांच्या घरचे कामकरी, आणि परिचितांमध्ये मॅडम अशीच होती आणि त्यांना स्वतःलाही मॅडम म्हणवून घेणे आवडत असे.मॅडम ह्या शब्दांच्या रुबाबात आणि कोषात गुरफटून राहणे ह्याचे त्यांना व्यसनच होते म्हणा ना !

निरोप समारंभाच्या गोड स्मृती मनाशी घोळवत त्या घरी आल्या.घरी आल्यावरही त्यांचा मोबाईल सतत वाजत होता..."पायेगा जो लक्ष्य है तेरा..." ची सतत वाजणारी रिंगटोन ऐकून स्वानंद त्याच्या बोबड्या आवाजात ती गुणगुणत होता.आणि मॅडम फोनवर शुभेच्छांचा स्वीकार करण्यात व्यस्त होत्या.रात्रीच्या जेवणात प्रियाने पुरणपोळीचा बेत केला होता.जेवतानाही त्यांचे फोनवर बोलणे सुरूच होते.जेवणं आटोपली आणि त्या त्यांच्या खोलीत आल्या.बदलीच्या गावाहून आलेले त्यांचे काही सामान नानासाहेबांच्या मदतीने त्यांनी खोलीत रचले.

दिवसभराच्या श्रमानेही त्यांचा डोळा लागेना.उद्यापासून त्यांचे एक नवीन आयुष्य सुरू होणार होते.....

अंथरुणावर पडल्यापडल्या त्यांचा जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.सध्या त्यांच्या घरी त्यांचा पंचकोनी परिवार.पती नानासाहेब,एकुलता एक मुलगा स्वप्निल, त्याची पत्नी प्रिया,चिमुकला नातू स्वानंद आणि त्या स्वतः.

स्वप्निल तर सहा महिन्यांचा असल्यापासून त्याला सांभाळणाऱ्या सुलभा मावशीजवळ वाढला.मॅडमला नेमकेच तेव्हा प्रमोशन मिळाले होते.त्या मात्र स्वप्निलच्या बालपणाच्या क्षुल्लक कारणासाठी ही "ऑपॉर्च्युनिटी" सोडू इच्छित नव्हत्या.त्यांच्या ओळखीतल्या एका तिशीच्या तरुणीला कामाची गरज होती.तिच्याजवळ मॅडमनी सहा महिन्यांच्या स्वप्निलला सोपवले आणि त्या पदोन्नती च्या गावी रुजू झाल्या.त्या मुलीने, सुलभानेही स्वप्निलचे सर्व प्रेमाने आणि मायेने केले. मॅडमचा करियरधार्जिणा स्वभाव लक्षात घेऊन नानासाहेबांनी घरची आणि स्वप्निलची जबाबदारी स्वीकारली आणि नोकरीतले प्रमोशन्स नाकारत घराला आणि स्वप्निलला प्राधान्य दिले.मॅडम तो लहान असताना आठवड्यातून तीन वेळा घरी येत.नंतर तो सुलभाच्या अगदी अंगावर झालाय म्हणून त्या निश्चिन्त झाल्या अन् फक्त शनिवार-रविवारी घरी येऊ लागल्या.
स्वप्निल दुसऱ्या वर्गात असताना त्यांची बदली त्यांच्या गावी झाली.त्या आता घरी राहू लागल्या.पण त्यांच्या वाढत्या पदानुसार त्यांना ऑफिसमध्ये जास्त वेळ देणे गरजेचे होते.वरिष्ठांचे तर त्यांच्याविना पानही हलत नसे.त्यांच्या शाखा प्रमुखांनी सर्वांसमोर दौऱ्यावर आलेल्या क्षेत्रीय व्यवस्थापकांजवळ त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते.त्यामुळे त्यांच्या अंगावर मूठभर मांस तर चढलेच पण अजून काहीतरी भव्यदिव्य कामगिरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली.मग ऑफिसमध्ये सर्व विभागांमधील कामात मॅडमनी प्रभुत्व मिळवले.ऑफिसमध्ये कुठेही कोणतीही समस्या आली तरी मॅडमला पाचारण करण्यात येऊ लागले.त्यासुद्धा ती समस्या सोडवण्यासाठी सहभाग घेऊ लागल्या.शाखा प्रमुखांच्या तर त्या उजव्या हात बनल्या.
इकडे घरच्या आघाडीवर स्वप्निल चौथ्या वर्गात मेरिटमध्ये आला.मॅडमनी त्याचे यश पूर्ण ऑफिसमध्ये पेढे वाटून साजरे केले.तो आता माध्यमिक शाळेत गेला होता.मॅडमनी स्वतः पुढाकार घेऊन शहरातल्या उत्तम कोचिंग क्लासमध्ये त्याची ऍडमिशन घेतली.त्याला सर्व काही वर्ल्ड क्लास मिळावे ह्यासाठी त्या आग्रही होत्या.पण का कोण जाणे स्वप्निल त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या नकळत का होईना पण जरा अलिप्तच राहिला ...

याच काळात त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले व सासूबाई त्यांच्याजवळ राहायला आल्या.वयोमानाप्रमाणे सासूबाईंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे होते.सासूबाईंनी त्यांना ऑफिसमधून दोन-तीन दिवस रजा घेण्यासाठी सुचवले.पण मॅडम कोणतीही परिस्थिती मॅनेज करण्यात तरबेज होत्या.. त्यांनी नानासाहेब, सुलभा आणि त्यांची स्वतःची दोन-दोन तासांची पाळी ठरवून घेतली.आणि ऑपरेशन नंतर डोळ्यात औषध टाकायला, हवं नको बघायला सुलभालाच सांगितले अर्थात् ज्यादा पैसे देऊन.सासूबाई आठवण काढत म्हणून त्यांच्या लेकीला, म्हणजेच स्वतःच्या नणंदेला पंधरा दिवसांसाठी बोलावून घेतलं.आधी स्वैपाकीण बाई फक्त पोळ्या करत.आता त्यांना पूर्ण स्वैपाक करायला सांगितला.हो, उगाच माहेरवाशिणीवर कामाचा बोजा नको !आणि त्यांचेही ऑडिट अगदी तोंडावर आले होते नं !

"ज्या गोष्टी पैश्याने विकत घेता येतात त्यासाठी आपण फुका का राबावे !" हे त्यांचे लाडके तत्त्व होते.आणि दोन पैसे जास्त खर्च करून त्यांनी सासूबाईंची उत्तम सोय तर केली होतीच पण दोन गरजू स्त्रियांना त्या निमित्ताने आर्थिक मदतही केली होती !

स्वप्निल कॉलेजात जाऊ लागल्यावर सुलभा आता सासूबाईंची देखरेख करू लागली होती.मॅडमला पण आतापावेतो आणखी दोन पदोन्नती मिळाल्या होत्या आणि अर्थातच ऑफिसमधील त्यांच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढल्या होत्या ! त्यामुळे ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम करणं तर आलंच !

नानासाहेबांना आणि स्वप्निलला हे काही नवीन नव्हते.ऑफिसचे कामात मॅडमना अतीव समाधान मिळते आणि त्यामुळे त्या समाधानी आणि आनंदी असतात हे त्या दोघांनाही एव्हाना चांगले माहित झाले होते.त्यामुळे ते कधीही मॅडमला घरी थांबण्याबद्दल म्हणत नसत.सासूबाईंचा मात्र सणासुदीला, घरच्यांच्या दुखण्याखुपण्या वेळी, कार्यप्रसंगी त्यांनी घरी रहावे ह्यासाठी आग्रह असे.पण त्यांनी मात्र प्रत्येकवेळी "बी प्रॅक्टिकल, डोन्ट बी इमोशनल फूल" अशा कडक शब्दात त्यांची कानउघाडणी केली आणि पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या त्यांच्या करिअरला प्राधान्य दिलं !

सासूबाई निर्वतल्या तेव्हा मॅडम अहमदाबादला ऑफिसच्या पदोन्नतीपूर्व प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या.नानासाहेब आणि स्वप्निल दोघेही अंतसमयी त्यांच्याजवळ होते.बातमी कळताच मॅडम ताबडतोब विमानाने परतल्या.सासूबाईंच्या इच्छेखातर त्यांनी सगळे मरणोत्तर विधी साग्रसंगीत पार पाडले.

पाहता पाहता स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाले.तो नोकरीला लागला.त्याच्या बालमैत्रिणीशी, प्रियाशी त्याचे सूत जुळले.प्रिया त्यांच्याच कॉलनीत राहणारी.नेहमी स्वप्निलला भेटायला, अभ्यासातल्या अडचणी विचारायला घरी येत असे म्हणे ! नानासाहेबांना दोघांच्या मैत्रीपलीकडल्या नात्याची कल्पना आलीच होती.त्यांनीच स्वप्निलच्या नोकरीचे मार्गी लागताच प्रियाच्या मनात काय आहे ते काढून घेतले आणि ही गोड, सालस प्रिया सून म्हणून घरात आली.

स्वप्निलच्या लग्नानंतर नवीन जोडप्याला एकमेकांसाठी वेळ देता यावा म्हणून त्या जेमतेम आठ दिवस घरी राहून बदलीच्या गावी निघून गेल्या.त्यामुळे प्रियाचा आणि त्यांचा सहवास तसा फार घडलाच नाही.त्या दर शनिवारी घरी येत असत आणि सोमवारी सकाळीच निघत असत.त्यामुळे प्रियाला सासुरवास आणि मॅडम ला सुनवास असा झालाच नाही.सहवासच नाही त्यामुळे मतभेद नाही आणि मनभेदही नाही !! पण आपण सुनेच्या संसारात लुडबूड करत नाही हे समाधान त्यांच्यासाठी फार मोठे होते !

स्वप्निल-प्रियाच्या लग्नानंतर सहा महिन्यातच प्रियाला दिवस गेले.तिचे माहेर कॉलनीतच असल्याने मॅडम तश्या निश्चिन्त होत्या.स्वानंदचा जन्म प्रियाच्या माहेरीच झाला.त्यावेळी नेमके मॅडमचे महत्वाचे दौरे सुरु होते पण तरीही त्या वेळात वेळ काढून बाळाला भेटून आल्या.सोबत "माहेर" दुकानातून डिंक-मेथ्यांचे लाडू आणि लसणाची चटणी न्यायला विसरल्या नाहीत !

बाळाच्या बारश्यालाही त्यांनी स्वानंदला दीड तोळ्याचा गोफ केला आणि "स्मायली बेबी" मधून भारीतला बाळंतविडा आणला.प्रियाच्या आईला आणि वहिनीला अडीच अडीच हजाराच्या साड्या घेतल्या- त्यांनी बाळंतपण केलं म्हणून.अख्ख्या सोसायटीत मॅडमच्या भरगच्च आहेराची चर्चा होती !

स्वानंदचा जन्म झाला अन् नानासाहेब निवृत्त झाले.त्यांना स्वानंदचा फार लळा.त्याचे दुखणे-खुपणे औषधं-लसी, ते सर्व जातीने करत.प्रिया नेहमी म्हणे, "बाबांचा फार आधार आहे म्हणून...".नानासाहेबांना रात्रीची झोप येत नसे त्यामुळे बाळाला रात्री खेळवायचे काम त्यांच्याकडेच असे.

छोटा स्वानंद मॅडम शनिवार-रविवारी घरी असल्या की त्यांच्याकडेच टकामका पाहत राही.पण आजी-नातवाची गट्टी जमेपर्यंत सोमवार उजाडे आणि मॅडम आपल्या कर्तव्याच्या दिशेने चालू लागत.

बघता बघता मॅडमचा साठावा वाढदिवस झाला अन् त्यांना निवृत्तीची चाहूल लागली.आयुष्यभर व्यस्त राहिलेल्या त्यांना निवृत्तीनंतर घरी बसणे मानवणारे नव्हतेच ! निवृत्तीनंतरही त्या एखाद-दोन आठवडे घरी राहून नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन त्या ऑफिसमध्ये लक्ष घालणार होत्या आणि काही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करणार होत्या !

विचारांच्या आवर्तात कधी झोप लागली हे मॅडमना कळलेदेखिल नाही.

सकाळ झाली.मॅडम उठून बसल्या.
"गुड मॉर्निंग, आई" प्रियाने हसून स्वागत केले.
"गुडमॉर्निंग" मॅडमनी प्रतिसाद दिला.

त्यांनी स्वैपाकघरात येऊन बघितले.नंदूबाळाची दूध पिण्यासाठी टंगळमंगळ सुरु होती.प्रियाने त्यांच्या हातात चहाचा कप दिला आणि ती स्वानंदला गोष्ट सांगता-सांगता बळेच त्याला दूध-बिस्कीट देऊ लागली.स्वानंदही त्याचं खरकटं तोंड तिच्या ओढणीत घुसळू लागला अन् मायलेकरांची गोड मस्ती सुरु झाली.

मॅडम त्या दोघांकडे एकटक पाहू लागल्या.त्यांना त्यांची सकाळची घाई अन् स्वप्निल लवकर लवकर दूध पीत नाही म्हणून दणादण दिलेले दोन धपाटे आठवले.

एवढ्यात स्वप्निल आणि नानासाहेब आवरून किचनमध्ये आले.प्रियाने सर्वांना गरम उपम्याच्या डिशेस दिल्या.आणि स्वतः एका ताटलीत थालीपीठ घेऊन खायला बसली.

"हे काय खातेय गं" स्वप्निलनी विचारलं.
"अरे,कालचं वरण उरलं होतं नं त्याचं थालीपीठ"-प्रिया उत्तरली.
"हं ! हे बरंय तुझं ! आम्हाला दिला उपमा आणि स्वतःसाठी मस्त खमंग थालीपीठ !!
"अरे शिळ्या वरणाचं आहे नं ते, मी खाईन" प्रियाचं वाक्य पूर्ण होईपर्यंत स्वप्निलनी तिच्या ताटलीतलं अर्धअधिक थालीपीठ ओढून घेतलं सुद्धा आणि तो ते मिटक्या मारत खाऊ लागला.

त्यांनी प्रियाकडे पाहिलं ती कौतुकाने स्वप्नीलकडेच पाहत होती.
"अगं मला पण चालेल थालीपीठ" मॅडम बोलल्या.
"नको आई.रात्रीचं आहे.तुम्ही कशाला.."प्रिया ओशाळली.

स्वप्निल कामाला निघून गेल्यावर प्रियाने तिची आई, वहिनी आणि शेजारच्या काही बायकांसाठी छोटीशी पार्टी ठेवली होती, मॅडमच्या रिटायरमेंट प्रित्यर्थ .फक्त बायकाच.छोले पुऱ्या आणि श्रीखंड असा मेनू ठेवला होता.प्रियाला काही मदत लागली तर... म्हणून त्या स्वैपाकघरातच थांबल्या.प्रियाच्या लगबगीचं, तिच्या कामाच्या पद्धतीचं, तिच्या टाइम मॅनॅजमेन्टचं मॅडम ला कौतुक वाटलं.ती पूर्णवेळ गृहिणी असली तरी तिचं कामवाल्या बाईशी, इलेक्ट्रिशियनशी संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्या अनुभवी नजरेनं लगेच हेरलं.प्रियाच्या काटकसरी स्वभावानं त्यांना भुरळ घातली.

घरात दहाबारा बायका, छोटी मुलं त्यांचा किलबिलाट, घर उत्साहानी अगदी भरून गेलं होतं.त्यात अनघाने, प्रियाच्या वहिनीने सगळ्यांसाठी छोटे छोटे गेम्स ठेवले होते.ते खेळताना, हसताना-गाताना सगळ्या अगदी लहान मूल झाल्या होत्या.मॅडमनी कामाच्या व्यस्ततेमुळे आजवर अश्या घरगुती पार्टीज कधीच अटेंड केल्या नव्हत्या.
आजची ही धमाल बघत मॅडम विचार करत होत्या -स्ट्रेस बस्टर म्हणतात ते वेगळं काय असतं !!!

दिवसभर त्या घरात वावरत होत्या.घराचं, घरातल्या माणसांचं, वस्तूंचं निरीक्षण करत होत्या.

त्यांच्या राज्यात घराची जबाबदारी सुलभा आणि स्वैपाकीण बाईंची होती.त्यांना तसंही घरात काम फार नव्हतंच.
घरी असल्या तरी त्यांच्या बराचसा वेळ फोनवर बोलण्यात,ऑफिसच्या मिटिंगसाठी प्रेझेंटेशन बनवण्यात आणि वाचन करण्यात जात असे.घरी कोणतेही काम नसताना सहज म्हणून रजा घेणे त्यांना पटत नसे त्यामुळे त्यांनी कित्येक वर्षात निवांतपणासाठी रजा घेतली नव्हती आणि अश्याप्रकारे घरी राहण्याची त्यांना अजिबात सवयच नव्हती.

कधी घरच्यासाठी वेळच न दिल्याने त्यांना अवघडल्यासारखे वाटत होते." स्वतःच्या घरी दूरची पाहुणी मी" अशी त्यांची गत झाली होती.घरात त्यांच्या मुला-सुनेचा हसरा खेळता वावर त्या दुरूनच अनुभवत होत्या.नातवाच्या, स्वानंदच्या बाळलीला निरखत होत्या.पण का कोण जाणे त्यांच्यात आणि त्यांच्या कुटुंबात एक अदृश्य दरी निर्माण झालीये असं वाटत होतं.

नानासाहेबांनी निवृत्तीनंतर एकटेपणाची जाणीव होऊ नं देता स्वप्निल आणि प्रियाच्या संसारात स्वतः ला छान सामावून घेतलं होतं. पण मॅडमला मात्र सर्वांमध्ये असूनही एकटं वाटत होतं आणि करियरच्या नादात ह्या अशा निखळ आनंदाला आपण मुकलो ह्याची खंतही..आयुष्यात खूप काही कमावता कमावता हातून बरंच काही निसटून गेलंय, हरवून गेलंय असं त्यांना वाटू लागलं.

स्वानंद मात्र नेहमी ऑफिसमध्ये जाणाऱ्या आजीला घरी बघून कुतुहलाने दुरूनच न्याहाळत होता.

रात्री जेवणं झाल्यावर मॅडमनी वाचायला पुस्तक हातात घेतलं अन् तसंच अनुकरण करत स्वानंदनी पण ड्रॉवर मधलं त्याचं गोष्टीचं पुस्तक काढलं आणि त्यातील चित्र पाहू लागला.

"आजी, मला तुझ्या पुस्तकातली गोष्ट सांगशील ? सांग नं गं " स्वानंदनी त्यांना एव्हाना खुर्चीवरून जवळ जवळ खाली खेचलं होतं.

"हो.सांगते हं बाळ" स्वानंदच्या डोळ्यात आनंद आणि झोप पसरू लागली.
"आजी,गोष्ट ऐकता ऐकता मी झोपू का तुझ्याजवळ" स्वानंद त्यांना बिलगला.

"होsss"मॅडमनी नव्हे तर,त्यांच्यातील आजीने त्याला प्रेमाने जवळ घेत हुंकार भरला अन् आयुष्याने पुन्हा दिलेल्या ह्या दुसऱ्या संधीचे सोने करण्यासाठी त्या आतुर झाल्या.

7 

Share


वैशाली जोशी
Written by
वैशाली जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad