पडदा उघडला,
टन, टन, टन, टन,
टन ,टन ,टन, टन
जगात हो भारी होती एक स्वारी
ढोलकी त्याची न्यारी , दुनियेला प्यारी
कहाणी त्याची ही खरीखुरी
सांगायला आले की हो दारी
सत्य आहे कटू जरी
रसिकहो धीर ठेवा तरी
असं वाजवाकी रात गाजवाकी
औसची पूणव होऊ द्या
असं वाजवाकी रात गाजवाकी
औसाची पूनव होऊ द्या
शिनगार साजो संग बाजूबंद माझं अंग
रात अशी जवान राहू द्या
(पावन वाजवाकी , रात गाजवाकी )
असं वाजवाकी रात गाजवाकी
औसची पूनव होऊ द्या
असं वाजवाकी रात गाजवाकी
औसची पुन्हा होऊ द्या
लावणी संपली तसा सुंदरावर पैशाचा पाऊस पडला. सुंदरा जळगावकर, पस्तिशीला आलेली अंगाला हव तिथून खच्चून भरलेली, विशीच्या पोरीनाही लाजवल अशी तमासगिरीन. तीन पस्तीशी गाठली होती तरी तिच्या मागं लाळ गाळणारे कमी नव्हते.
" आक्का, पाटील आल्यात आत पाठवू काय?"- गण्या लगबगीन आत आला आणि धापा टाकत सुंदराक्काला विचारत होता.
गण्या अठरा एकोणीस वर्षाचा तरुण. अंगानं तिडतिडीत लहानपणापासूनच सुंदरक्कासोबत राहिलेला, ना आईचा पत्या ना बापाचा. बायकांचे कपडे धुवायचे, वाळू घालायचे स्वयंपाकात मदत करायची अशी काम तो लहानपणापासूनच करत आलेला. पण गेल्या दोन तीन वर्षापासून जसा तो वयात आला तसा सुंदराक्कान त्याला नाच्या म्हणून कामाला घेतला.
" या की पाटील, गण्या च्या -पाण्याचं बघा "- सुंदरक्का पाटलांना पाहून बोलली.
" नको, चहापाणी राहुद्या ,मला जरा कामाचच बोलायचं होतं, मनी कुठय? दिसना झाली ...."- पाटील आजूबाजूला पाहून बोलत होता.
" मनीचं नाव ऐकताच, पाटलाचा चहा - पाण्यासाठी जाणाऱ्या गण्याचे पाय जागीच थांबले.तो तसाच मागे फिरला, सुंदरआक्काच्या मागे उभा राहून त्याने तिच्या अंगातले दागिने काढायला सुरुवात केली. त्या क्षणी तिथं थांबण्यासाठी त्याला तेवढच सुचलं.
"मनी होय असल की बाहेर तिचं काय ?"- सुंदरक्का मनीचा विषय निघाल्यान जरा पुढे सरसावली.
" येत्या रविवारी आमदार येणारे फडावर ....जर मनिला तवा नाचवली आन ती आमदाराच्या नजरेत एकदा का भरली ........बघ सुंदरा नीट विचार कर ......" - पाटील त्यांन आखलेला प्लॅन सुंदरक्कला सांगत होता.
"मग काय, आमदार लगीन करल होय मनिशी?"- एवढा वेळ गप्प बसलेला गण्या मधेच बोलला.
"आरं येडा का खुळा गनबा तू, तमासगिरनी म्हनजी खरकटी ताट कुणी बी यावं आणि त्यात जेऊन जावं, यांच्याशी कोण करतय लगीन..... अरे आपली मनी देखणी हाय, रंगा रूपाने भल्याभल्यांना लाजवल, उंची, गोरा रंग, नाकी - डोळ, काहीच कमी नाही तिच्यात, एकदा का आमदाराला ती आवडली आणि आमदारांनी तिला रखेल म्हणून ठेवली की तिच्यामार्फत खोऱ्याने पैसा ओढु आपण खोऱ्यान. .." - पाटील
" म्या मणीचे दोन-चार फोटो घेऊन गेलतो आमदाराकडे , त्याला ती आवडली म्हणून तर त्यो रविवारी येणारे ना, तिला बघायला, तशी तयारी ठेवा तिला.... काय म्हणतोय मी ... ?"- पाटील सुंदरक्कला समजावून उठला.
" आणि तू जरा लक्ष ठेव तिच्यावर, हाताला आलेला मासा गेला नाही पाहिजे , कळलं का?"- पाटील जाता जाता गण्याला दम देऊन गेला.
"नशीब काढलं माझ्या पोरीन..... नशीब काढलं ...."- म्हणत आनंदलेली सुंदरआक्का सगळ्यांना आनंदाची बातमी सांगत सुटली. एवढी मोठी संधी हाती आली म्हणून कोणी तिचं कौतुक करत होतं तर ही संधी आपल्याला न भेटता सुंदरआक्काच्या पोरीला भेटली म्हणून कोणी तिच्यावरून बोटं मोडत होतं.
गप्प होता तो फक्त गण्या, तो एका कोप-यात मांडीत डोके घालुन बसला होता.
"गण्या, माझी होडी बघ तुझ्यापेक्षा लांब गेली ये ये ये "चार वर्षाची मनीषा त्याच्या शेजारी उभे राहून टाळ्या वाजवत होती.
" गण्या, आज माझा निकाल लागला मी वर्गात पहिली आले "
"गण्या आज मला स्कॉलरशिप मिळाली आता शिकायचा खर्चा आईला नाही काढावा लागणार"
" गण्या गावडयांचा पप्प्या हाय ना, रोज शाळेत येता-जाता माझ्याकडे बघतो, मला शाळेत आणाय- सोडाय ला येशील ना ,आईला कळलं तर आई शाळा बंद करण."
"गण्या आज दहावीचा निकाल लागला, मी वर्गात पहिली आले. मास्तर मला कॉलेजला तालुक्याला पाठवणारे आन बारावीपुतरचा सगळा खर्च बी करणारे"
" गण्या बघ मी तुला म्हणले नव्हते, बारावी झाल्या झाल्या तुला भेटायला येईल, आले का नाही"
लहानपणापासून त्याच्या डोळ्यापुढे लहानाची मोठी झालेली मनी आज पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होती. दोघंही एकाच वयाची दोघांचा एकमेकांवर जीव. लहानपणापासून गण्याने तिला सांभाळलं कधीकधी तिच्या वह्या - पुस्तकाचा खर्च बी तो त्याच्या पगारातून करायचा. आज त्याची मनीषा कोणा दुसर्याची होणार त्याला सहन होत नव्हतं.
दोन-चार दिवस मध्ये असेच गेले मनीषाची लावणीची तयारी जोरदार चालू होती. रविवारी ती ' अप्सरा आली ' गाण्यावर नाचणारी होती. अप्सरेसारखी दिसणारी मनीषा खरच त्या दिवशी आमदाराला भुरळ पाडणार यात वादच नव्हता. तिला शिकायला फडातल्या अनेक जणी मदत करत होत्या. सुंदराक्का काही नजरेचे बाण कसे सोडायचे, हातवारे कसे करायचे, हे सांगत होती. मुळातच हुशार असलेली मनीषा हे सगळ पटपट शिकून घेत होती. पण हे सगळं सुरू होतं ते तिच्या मनाविरुद्ध.........
"आई मी नदीवरून जाऊन आले " - मनीषा हातातले कपडे नीट ठेवत सुंदररक्कला सांगत होती.
"हा ,जा पण लवकर ये "- सुंदराक्का
" गणा "- मनीषा
"त्यो कशाला "- सुंदराक्का
" सोबतीला कुणी नको होय आणि तसं बी नशीब मान, म्या अंघोळीला जाताना कोणा बाप्याला न्हाई नाच्याला नेते ते "- मनीषा सुंदरक्काला डोळा मारत बाहेर निघून गेली.
"हा तु हो पुढ, आन गणा तू इथं ये"- सुंदराक्का
मनीषा बाहेर गेल्याचा अंदाज घेत सुंदरक्कान गण्याच्या कॉलरला धरून त्याला स्वतःवर ओढल. " हे बघ, गणा ती म्हणती तुला, तु बाप्या न्हाय म्हणून ,पण तू खरंच बाप्या हाय का नाय हे फक्त मला माहिती आणि तुला माहिती, म्हणुन उगा येड बनून पेढा खाऊ नको, फडात लई पोरी हायत, तुला जे पाहिजे ते पुरवायची जबाबदारी माझी.... पण मनीपास्न लांब राहायचं कळलं.. ती फक्त आमदाराचीचे.... निघ आता आणि लवकर या "- सुंदरक्कान त्याची धरलेली कॉलर सोडत त्याच्या छातीवर चापट मार त्याला समजावलं.
"गणा येणारे का, का मंग् मी एकटी जाउ " - मनिषाचा आवाज आला तसा गणा पळत बाहेर आला.
गणा आणि मनीषा दोघही नदीतल्या पान्यात पाय सोडून बसले होते. दोघांमध्ये भरपूर अंतरही होत पण अचानक मनीषा गणाच्या बाजूला सरकली, तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिचे ओले केस त्याला वेड करत होते. तिची बोट त्याच्या मांड्यांशी चाळा करत होती. तिचा गरम श्वासही त्याला जाणवत होते. त्याने कितीही ठरवलं तरी त्याचा तोल सुटत चालला होता.
"गणा खरच तु बाप्या न्हाई?"- मनीषा
" न्हाई " - तिच्याशी खोटं बोलताना त्याला काळीज चिरल्यासारख झालं पण तो तिच्या भल्यासाठीच हे करत होता.
तिने तिचे ओठ त्याच्या मानेवर ठेवले तसं अंगावरून पालीला झटकावी तसं तिला झटकत तो उठून उभा राहिला.
" तू बाप्या नाही ना, मग बाजूला का झाला?"- मनीषाला तिच हवं ते उत्तर मिळालं होतं.
" हे बघ मणा उगाचच माझ्यात गुतू नको, शहाण्यासारखी वाग त्या आमदारापाशी झोपली तर लई पैस भेटत्यान आणि इथन बाहेर पडली तर साहेबीन होऊनच येशील .....काय करायचे ते तू ठरव ..."- गणा तिच्याकडे न पाहताच बोलत होता.
गनाच्या झिडकारन्यान ती अजूनच दुखावली गेली.
" गणा आजपर्यंत माझा विचार कोणी केला र? यांना वाटलं तसं ठरवलं गेलं. आज त्या आमदाराखाली मला झोपायच, पण कोणी मला विचारलं की बाई तुला खरंच असं करायचे का ??? मला तू लहानपणापासून खूप आवडतो पण माझी आवड कोणी लक्षात घेतली का??? मला कॉलेज सोडून इथं यायला लावलं पण खरंच मला कॉलेज सोडायची इच्छा आहे का, हे कुणी विचारलं का?? गणा तुला माहिती मला एन.डी.ए.मध्ये जायचय मला एअर फोर्स मध्ये भरती व्हायचय..... पण माझ्या इच्छा विचारतयच कोण..... माझ आयुष्य ना मग मला ठरवू द्या ना......". - ती रडत तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत होती.
तो खाली बसला त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. "येडी का ग मना तू, मला का नाही सांगितलं हे सगळं आधीच.... आग येडे हा गणा तुझ्या एकटीसाठी जगाच्या विरोधात म्हणलं तरी उभा राहील ..."
"म्हणजे"- मनीषा
" माझ्याकडे आत्ता साडेपाच हजार रुपये आहेत, आज रात्रीच तू मंबईला पळून जा ...लय मोठी सायेब हो .... तुला पाहिजे तेवढा पैसा मी पुरवल... मग तर झालं ..."- तो आईच्या मायेने तिच्या गालावरुन बोटं मोडत होता.
" पण मला एक शपथ दे, जवर तू सायेब होत नाही तोवर तू गावाचं तोंड मी बघणार नाही....."- तो.
त्याच रात्री मनीषा पळून गेली. दिवसामागून दिवस जात होते. महिन्या मागून महिने जात होते. फडातल्या सगळ्यांनीच 'पोराचा हात धरून पळाली' म्हणून तिला बदनाम केली. पुढे पुढे तर सगळेच तिला विसरूनही गेले. अनेकदा मुंबईला जाऊन आलेला एखादा गावचा माणूस कधी मनीषा वेशांच्या कोठ्यात दिसली..... तर कधी कोणा बाप्यासोबत पिक्चरला दिसली .....तर कधी नवरा आणि पोरासोबत भाजी घेताना दिसली म्हणून आफवा उठवायचा कोणाला काही फरक पडत नव्हता.... फक्त गणा सोडून. अशा अफवा ऐकून त्याचं काळीज हेलकवायचं. पण पुन्हा तो स्वतःची समजूत घालायचा, ....ती अशी करणार नाही... ती येईल .... ती येईल.
वर्षामागून वर्षे निघून गेली...आत्ता तिला जाऊन सहा वर्षे झाली होती.
" अटपा ग पोरिंनो पटापटा, ती नवी पोरं कुठय, तीच आवरा, तिची पहिलीच यळ हाय,"- गणा सगळ्यांनाच आवरायची घाई करत होता. तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. तसे सगळेच बाहेर आले. नवीन कोऱ्या फोरविलर मधून मनीषा उतरली, तिच्या अंगावर एअर फोर्सचा युनिफॉर्म होता, हातात हेल्मेट होतं. तिला पाहून गणा मटकन खाली बसला.
" आत नाही घेणार मला.....?"- मनीषा त्याच्याकडे पाहून म्हणाली.
त्याला काय बोलावं ते कळत नव्हतं. त्याचे डोळे फक्त पाणी गाळत होते. ती त्याच्यासमोर दोन पायावर बसली होती, ती त्याचं डोकं आपल्या दोन्ही हातात धरून रडत होती.
बाहेरचा कालवा ऐकून सुंदराक्काही पळतच बाहेर आली. मनीषाला एवढ्या वर्षांनी अशा कपड्यात पाहून तीही खूष झाली होती.
" औक्षणाचा ताट आंना ग पोरीनो, माझी लेक आली, माझी लेक सायब झाली....." - ती जोरजोरात ओरडत होती.
" एक मिनिट, मी इथं फक्त एका व्यक्तीसाठी आले, तो म्हणजे गणा. जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही आता उगाचच हे औक्षण वगैरे करून नसलेल प्रेम दाखवू नको. तुला पैसा पाहिजे ना? पैशासाठी तु मला त्या आमदाराखाली झोपायला लावलं होतं ना ? मी पुरवते तुला पैसा इथून पुढे. दर महिन्याला मी पैसे पाठवेल तुम्हाला सुंदरा जळगावकर, मग तर झालं."- मनीषा तावातावाने बोलत होती.
" आधी त्या नाच्याचा हात सोड "- सुंदरक्का जोरात ओरडली.
" एक मिनिट, तो नाच्या नाही, हे तुम्हालाही माहिती आणि मलाही. ज्या दिवशी मी पळून गेले त्याच दिवशी त्यालाही नेणार होते सोबत, पण तोच नको म्हणाला तो इथं राहिला नाच्या बनुन. मला पळवून लावणारा, मला पैसे पुरवणारा, मला शिकायला - नोकरीला लागण्यासाठी प्रोत्साहित करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून गणाच होता. आज मी आकाशात स्वतःची ओळख बनवली ती अशीच नाही त्यासाठी गणानं स्वतः तो पुरुष आहे या त्याच्या ओळखीचा स्वतःहून बळी दिला म्हणूनच. .." - मनीषा बोलता-बोलता गाडीतून एक डबा उघडून त्याच्यासमोर धरून एका पायावर बसली त्यामध्ये घड्याळ होतं.
तिने ते घड्याळ त्याच्यापुढे धरलं. ..."गणा लग्न करशील माझ्याशी? आज माझ्या आयुष्याचे जे काटे फिरले, माझी ही वेळ आली ती फक्त तुझ्यामुळे. ...करशील का लग्न माझ्याशी? देशील का मला तुझा आयुष्यभराचा वेळ?? मनीषा त्याला लग्नासाठी मागणी घालत होती. त्यानही रडता रडता संमतीदर्शक मान हलवली. त्याक्षणी बाकीच्यांचा विचारही न करता, ती त्याला तिथून घेऊन निघूनही गेली, तेही कायमच.
कसं असतं ना, प्रत्येक वेळेस यशस्वी पुरुषामागे स्त्री असेल असं काही नसतं, अनेकदा यशस्वी स्त्री च्या मागे एक खंबीर पुरुषही असतो. नाही का ??