Bluepad | Bluepad
Bluepad
नैराश्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग कोणता?
S
Sanjana Mohite
15th May, 2022

Share

नैराश्य हा मनुष्याच्या आनंदाला लागलेला असा आजार आहे ज्यातून बाहेर पडणं अनेकांना शक्य होत नाही. एखाद्या दलदलीत अडकल्याप्रमाणे गुदमरवणाऱ्या भावना नैराश्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. त्यासाठी काय करायचं हे या लेखातून आपण जाणून घेऊ.


नैराश्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग कोणता?व्यायाम करा.
दररोज १५ ते ३० मिनिटं चालणं नैराश्य कमी करण्यासाठी मदतीचं ठरतं. योगा करणं, ध्यान लावून बसणं आपल्या मनातला ताणतणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय व्यायामाचे जे प्रकार करताना आपल्याला आनंद मिळतो ते प्रकार आपण केले पाहिजे. शिवाय, एखादा खेळ खेळणं देखील नैराश्याला दूर करण्यासाठी मदतीचं ठरतं. कारण आपल्या मनातले सगळे विचार नाहीसे होऊन आपण खेळामध्ये एकरुप होतो. यातून मनात सकारात्मक विचार येतात आणि आपोआपच नैराश्याला दूर करण्यासाठी मदत होते.

सकस पदार्थ खा.
नैराश्य आणि आपला आहार यांचाही खूप जवळचा संबंध आहे. आपण शरीराचं पोषण होईल असं खात नसू तर त्याचा परिणाम मनावर व्हायला लागतो. शरीराला आवश्यक प्रमाणात सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स, प्रोटिन, लोह इत्यादी सगळं व्यवस्थित प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नैराश्य आल्यावर अनेकांना जेवावं वाटत नाही. अशावेळी जाणीवपूर्वक आपल्या आवडीचं काहीतरी खावं. यामुळे आपला मूड चांगला होण्यासाठी मदत होते. भरपूर फळं, भाज्या आणि धान्य आपल्या पोटात जायलाच पाहिजे. त्याबरोबरच कार्बोहायड्रेट आणि साखर हे पदार्थ टाळायला पाहिजे. पचण्यास हलकं पण पोषक अन्न खाण्यावर भर दिल्यास आपलं शरीरमन आनंदी राहण्यास मदत होते.

समस्यांवर लक्ष देऊ नका.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतातच. त्या समस्या तो कसं हाताळतो हे फार महत्त्वाचं असतं. आपण जर समस्यांवर उपाय शोधण्यापेक्षा समस्या निर्माण झाली आहे हे विचार करत वेळ वाया घालवत असू तर त्यातून आपल्याला नैराश्यच येईल. त्यामुळे समस्यांवर दुर्लक्ष करायला शिका. स्वतःला दोष देऊ नका. आपल्या आयुष्यात काय चुकीचं आहे यापेक्षा काय बरोबर आहे, काय चांगलं आहे यावर लक्ष केंद्रित करा.

स्वतःला व्यक्त करा.
नैराश्यामुळे आपण स्वतःला कमी समजायला लागतो. लोकांच्या नजरेत आपली काही किंमत नाही असं स्वतःच विचार करत आपण व्यक्त होणंही बंद करतो. यातून नैराश्य कमी होण्याऐवजी आणखी वाढतच जातं. कोणी काय म्हणेल याचा विचार न करता बिनधास्त व्यक्त व्हायला शिका. जवळच्या मित्रांशी, कुटूंबियांशी संवाद साधा. जर बोलावं वाटत नसेल तर नृत्य, चित्र, लेखन अशा माध्यमांमधून स्वतःला व्यक्त करा. सोशल माध्यमांवर तुमची एखादी कौतुकास्पद बाब, आठवण टाका. त्यावर लोकांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा तुम्हाला आनंद देतील.

पाळीव प्राण्यांसोबत खेळा.
आपल्या मनातली निराशा दूर करण्यासाठी पाळीव प्राणीदेखील खूप मदतीचे असतात. ज्या लोकांना फारसं बोलायला, व्यक्त व्हायला आवडत नाही अशा लोकांचं नैराश्य दूर करणं बोलणाऱ्यांच्या तुलनेत कठीण असतं. त्यामुळे अशा लोकांनी पाळीव प्राण्यांचा आधार घ्यावा. अनेक माणसं एकटेपणा घालवण्यासाठी पाळीव प्राण्यांची मदत घेतात आणि खरोखरीच त्यांना त्याचा आधारदेखील वाटत असतो.

चांगल्या गोष्टी लक्ष द्या.
नैराश्य व्यक्तीचा गोष्टींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम करतो. फक्त निराशाजनक, नकारात्मक आणि हताश वाटणारे विचारच मनात यायला लागतात. अशावेळी जाणूनबुजून आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आठवून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आसपास जे काही चांगलं आहे त्यावर लक्ष द्यावं. स्वतःविषयी मनात प्रेम वाटू द्या. ही वेळ निघून जाईल असा विश्वास मनात ठेवा आणि काहीसा संयम बाळगा. असं चांगल्या गोष्टींवर लक्ष देणं नैराश्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी आपल्या फायद्याचं ठरु शकतं.

नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या लेखात सांगितलेल्या गोष्टी करणं आपल्या फायद्याचं ठरु शकतं. या भावनेतून बाहेर पडणं ही एक प्रक्रिया आहे. म्हणून नैराश्य मनात खोलवर रुतलं असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला वेळ द्यायला हवा. मगच नैराश्याला दूर करुन आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं.

664 

Share


S
Written by
Sanjana Mohite

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad