आपल्या आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखणं एखाद्या आव्हानासमान झालं आहे. जेवणाच्या वेळा, झोपण्या-उठण्याच्या वेळा यांमध्ये तारतम्यच नसल्याने अनेक आजार कमी वयात मागे लागत आहेत. अशा घातक जीवनशैलीला दूर करुन वेळीच बदल केले तरच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखू शकतो. त्यासाठी काय करायचं हे आपण या लेखातून जाणून घेऊ.
१. शरीर – मनाचा समतोल कसा साधायचा?
शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे मन उत्तम हवं असेल तर शरीर उत्तम ठेवावं लागतं आणि शरीर उत्तम ठेवायचं असेल तर मन. आपल्या शारीरिक आरोग्याचा आपल्या भावनिक आरोग्यावरही खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण चांगला आहार घेतला, वेळच्यावेळी व्यायाम केला आणि पुरेशी झोप घेतली तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी मदत होऊ शकते. आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
२. रागाला आयुष्यात जागा का नसावी?
आयुष्यात कोणाविषयीही राग धरु नका, कोणाचा राग आला तर स्वतःच्या आरोग्यासाठी तो सोडून द्या. ही सवय शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेची आहे. आपण राग किंवा वाईट भावनांना आश्रय दिल्याने भावनिक विषारीपणा निर्माण होतो, ज्याचा परिणाम आपल्याच आरोग्यावर होतो. आपण जेव्हा रागावलेल्या अवस्थेत असतो तेव्हा प्रत्येक मिनिटाचा आनंद आपण गमवत असतो. जे क्षण आनंदात घालणं शक्य असतं ते रागात घालून आपण आनंद हरवून बसतो.
३. भावनिक आरोग्य कसं राखायचं?
भावनिक आरोग्य राखण्यासाठी जीवनातील संतुलन महत्त्वाचे आहे. कामावर जास्त भर दिल्याने ताण येतो तसेच शरीरावर आणि मनावरही ताण येतो. हा ताण दूर करण्यासाठी मजा करायला वेळ काढला पाहिजे. समुद्रकिनारी, बागेत फिरायला जा, एखादा चित्रपट बघायला जा. कोणी काही न आवडणारं बोललं तर त्याकडे विनोद म्हणून बघा, असं केल्याने तुम्हाला गोष्टी नवीन आणि अधिक उत्पादक दृष्टीकोनातून दिसतील.
४. मेंदूला सक्रिय ठेवा.
आयुष्यात कंटाळा आला की, त्याचा परिणाम शरीर आणि आरोग्यावर व्हायला लागतो. त्यामुळे स्वतःला उत्साही वाटण्यासाठी आपण नवीन गोष्टी शिकून आणि स्वतःला आव्हानासमान वाटणाऱ्या गोष्टी करुन मेंदूला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. आठवड्यातून एकदा तरी वेगळं काहीतरी करा, गाणी ऐका, कविता वाचा, एखादा उपक्रम राबवा या सगळ्यातून मेंदू सक्रिय रहायला मदत होऊ शकते. हे सगळं केल्याने आपल्या मेंदूतल्या संवेदना हळूहळू जागृत होतात आणि आपोआपच आनंदी वाटायला लागतं.
५. इतरांशी संबंध कसे असावेत?
कधी खूप निराश वाटलं तर आपल्याला झुकण्यासाठी खांदा देणारे, आनंदी वाटलं तर सुखात सहभागी होणारे संबंध ठेवा. अनेकदा आपण आपल्याच समस्या आणि दुःखात इतके अडकून जातो की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील आपल्याला शोधता येत नाही. पण आपलं सुख – दुःख कोणाशीतरी शेअर करणं हे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यामुळे भावना व्यक्त करण्यासाठी जवळची माणसं असतील असे संबंध आपण ठेवले पाहिजे.
६. वर्तमान का महत्वाचा?
माणूस एकतर भूतकाळात अडकतो नाहीतर भविष्याचा विचार करुन तणावात जातो. पण तो वर्तमानाच रहायला विसरतो. भूतकाळ आणि भविष्याचा विचार करुन आपल्याला फक्त तणाव येतो. या तणावाचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो. हळूहळू शरीर आणि मन त्या तणावात खचायला लागतं. त्यामुळे वर्तमानात जगायला शिकणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
७. योग आयुष्यात काय बदल घडवतात?
उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यानधारणा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या दिनक्रमात या तंत्रांचा समावेश आपण करायला हवा. भारतीय संस्कृतीत या दोन्ही तंत्रांना प्राचीन काळापासून महत्त्व आहे. आज जागतिक स्तरावर या तंत्रांचा प्रसार झाला आहे. आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, ताणतणाव दूर करण्यासाठी हे तंत्र अतिशय लाभाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आरोग्यासाठी या तंत्रांचा दिनक्रमात समावेश केला पाहिजे.
हे सगळे मुद्दे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आपलं स्वास्थ्य उत्तम असेल तर आपण आयुष्य अतिशय आनंदात जगू शकतो. प्रत्येक क्षणाचा आनंद आपल्याला लुटता येऊ शकतो. त्यामुळे प्रथम प्राधान्य फक्त मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यालाच असलं पाहिजे. बरोबर ना?