Bluepad | Bluepad
Bluepad
मौनाची ताकद सांगते पद्मा गोळे यांची 'ही' सुंदर कविता!
A
AditI Malekar
15th May, 2022

Share

'मौनम सर्वार्थ साधनम्' असं एक वचन आहे. मौनाने अनेक गोष्टी साध्य होत असल्या तरी ज्या ठिकाणी बोलायला हवे त्या ठिकाणी सुद्धा आपण शांतच राहिलो तर अनेक गोष्टी बिघडण्याची शक्यता देखील जास्त असते. शब्द हे भावना पोहचवण्यासाठी असतात. पण त्यांच्यावरचा ताळयंत्र सुटला की अनेक गोष्टी बदलतात, बिघडतात. अशावेळी मौन आपली कमाल दाखवून जाते. जर शांत राहून गोष्टी सुधारण्यास वाव मिळत असेल तर तसे करण्यास हरकत काय? यासाठी सीतेचे उदाहरण अगदीच चपखल बसेल. सीता निष्पाप होती तरी तिला अग्नीपरीक्षेस सामोरे जावेच लागले. पण आपण खरे आहोत व तरीही मी परीक्षा का द्यावी असा कांगावा तिने अजिबातच केला नाही. यातच तिचे मोठेपण सिद्ध होते. कारण त्यावेळी ती एका राणीच्या पदाचे पालन करीत होती. त्यावेळी ती गप्पच होती. पण म्हणून ती दुबळी ठरली नाही तर यातून तिची पतिव्रता वृत्ती आणि धर्मासाठी त्यागाची वृत्तीच दिसून आली.मौनाची ताकद सांगते पद्मा गोळे यांची 'ही' सुंदर कविता!खरे तर मौनामध्ये प्रचंड ताकद दडलेली आहे. मौन अनेक गोष्टी साध्य करून घेते. मग त्यात मानसिक शांतता, डोक्यातल्या विचारांच्या वादळाला शमवणं, आपल्या स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रीत करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यात होतो. सतत वायफळ बडबड करून आपली उर्जा खर्च करणाऱ्या लोकांना ही गोष्ट कळणे तसे दुरापास्तच. म्हणजे मी शाळेत असताना आमचे शिक्षक अगदी १० मिनिटांचे मौन धरण्यास सांगायचे पण आमच्याकडून कधीच ते १० मिनिटे गप्प बसणे शक्य झाले नाही. आता तुम्ही म्हणाल, बोलायला देवाने तोंड दिलेले असताना गप्प बसून नेमके असे साध्य होते तरी काय? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणून मला पद्मा गोळे यांनी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी आठवतात. त्यात त्या म्हणतात,
"शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक, पोटात भलतंच
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन;
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा."

थोडक्यात काय तर मौन साधणं हे काय ‘ऐरागैराचे काम नोहे’ त्यासाठी सीतेसारखी शालीन, शांत, सद्गुणी व्यक्तीच हवी. कारण दुष्ट रावणाने कपटाने सीतेचे हरण केले व तिला अशोकवनात बंदी म्हणून बसवले. त्यावेळी ती आरडाओरड, आक्रोश करू शकली असती पण त्यावेळी तिने मौनाचा उपयोग करून, आहे त्या परिस्थितीचा धैर्याने सामना केला. त्यावेळी तिचे मौन हीच तिची ताकद होती, किंबहुना ती तिची ताकद बनली. कोणत्या परिस्थितीत गप्प रहायला हवे आणि बोलायला हवे याचे भान ज्याला असते तो शब्दाचे महाभारत आणि मौनाचे रामायण अगदी उत्तमपणे खेळू शकतो.

शब्दाला शब्द लागत गेले की भांडण सुरू होते. वाद, कलह यांना फाटे फुटतात. कारण विनाकारण बोललेला एक शब्द खूप मोठा आघात करू शकते. ज्याचा आपल्या वाणीवर अजिबातच ताबा नसतो तो जे मनात येईल ते बोलून मोकळे होण्याला प्राधान्य देतो. पण त्या ओघात आपण नेमके काय बोलून गेलो आहोत, यामुळे कोणाचे मन तर दुखावले गेले नाही ना याची जाणीवही नसते आणि म्हणून शब्दांना 'अंध कौरवांची' उपमा पद्मा गोळे यांनी दिली. मामा शकुनीच्या सांगण्यानुसार पाऊले टाकणाऱ्या कौरवांनी कधीच काय चांगले, काय वाईट हे जाणून घेण्याची तसदी दाखवली नाही आणि म्हणूनच एवढे मोठे महाभारत घडले.

अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात देखील वाद होत असतात. अगदी घरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर आई आणि बाबांचे घेऊ. त्यांच्यात काही वाद झाले तर दोघेही तो वाद ताणण्याचा नाही तर उलट तो मिटवण्याचा प्रयत्न करतात. मग आई किंवा बाबा पैकी कोणी तरी समजुतीने, शांतपणे घेण्याचा प्रयत्न करत असतात. जर दोघांच्याही शब्दांवरचा तोल सुटला तर महाभारत घडलेच म्हणून समजा. मग अशावेळी शब्दांचे महाभारत सोसायला देखील कृष्णासारख्या पाठराख्याची गरज असते. कृष्णाने अर्जुनाची साथ देऊन त्याला युद्ध करण्याचा योग्य मार्ग सांगितला. अगदी तसेच आपल्याही आयुष्यात शब्दांमुळे महाभारत घडले असेल तर चार समजुतीच्या गोष्टी सांगून, मार्गदर्शन करून तो वाद मिटवणारा कृष्णासारखा साथी, सखा प्रत्येकाला मिळायला हवा.

'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असा प्रकार करणारे लोक बऱ्याचदा गोत्यात येतात. त्यामुळे कधी तरी प्रसंग पाहून गोष्टी शांततेत घेणे हिताचे ठरते. त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या चांगल्यासाठी शब्दांची आणि मौनाची योग्य ती ताकद ओळखून जबाबदारीने वागले तर नक्कीच त्याचा उत्तम फायदा होतो. जसे शब्द ही एखाद्याची ताकद असते तसेच मौन कधीकधी त्यांना अधिक धारधार बनवत असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी ताकदीने पेलता येतील एवढं सक्षम प्रत्येकाने व्हावं व आपलं आयुष्य रामायण व महाभारत यातील मध्य साधून आनंदाने जगत राहावं इतकंच.
497 

Share


A
Written by
AditI Malekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad